Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मनसेमुळे काँग्रेसचा लाभ
उद्धव ठाकरे यांचा आरोप
मुंबई, १६ मे/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मराठी माणसाला नव्हे काँग्रेसला लाभ झाला, असा थेट आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत अतिरेकी हल्ला झाला, रेल्वेत बॉम्बस्फोट झाले तरीही काँग्रेसला लाभ कसा झाला त्याचा नक्की अभ्यास केला जाईल, असे सांगत ठाकरे यांनी मुंबईतील पराभवावर विधानसभा निवडणुकीत नक्की मात करीन, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे फटका बसला हे उद्धव ठाकरे यांनी मान्य केले नाही. दिल्लीत मनसे नव्हता न बिनसे तरीही काँग्रेसला यश कसे मिळाले, असा प्रतिसवाल त्यांनी केला. गेले दोन वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करीत राहिलो व त्यांनी निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली त्याबद्दल त्यांना ठाकरे यांनी लाख लाख धन्यवाद दिले. पश्चिम महाराष्ट्र या शिवसेनेच्या गडात सेनेलाही राष्ट्रवादी काँग्रेसएवढय़ाच तीन जागा मिळाल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १२ खासदार विजयी झाले होते. यावेळी ११ जागांवर विजय मिळाला, याकडे लक्ष वेधून युतीच्या अपयशाकरिता कुणाची चूक झाली त्यावर बोलण्याची ही वेळ नव्हे, असेही ते म्हणाले. मागील लोकसभा निवडणुकीत मुंबईत युतीचा केवळ एक सदस्य निवडून आला होता. सिंधुदुर्गमधील जागा दोन लाख मतांनी जिंकण्याची भाषा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली होती. प्रत्यक्षात काय झाले याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.