Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मनसेच्या सुरुंगामुळे युतीची माती!
ठाणे, १६ मे/ प्रतिनिधी

 

ना कुठली लाट, ना कुठला झंझावात. होता फक्त मनसेचा दणका. त्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना लोकांनी निवडून दिले आहे. भाजपची पाटी मात्र कोरीच राहिली. शिवसेनेने महत्त्वाचे ‘ठाणे’ गमावले, पण कल्याणची सुभेदारी टिकवली. काँग्रेसने भिवंडीवरील पकड आणखी पक्की केली, पण पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर पुरस्कृत अपक्षापुढे गुडघे टेकले. संजीव नाईक यांच्या विजयाने राष्ट्रवादीला ठाण्यात हात-पाय पसरण्यास वाव मिळणार आहे. अर्थातच, या साऱ्या जय-पराजयापेक्षाही चर्चा होत राहिली, ती मनसेने लोकसभा निवडणुकीच्या पदार्पणातच मारलेल्या जोरदार मुसंडीची!
मनसे फॅक्टरमुळे शिवसेनेच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यास यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांनी ४९ हजार २० मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला.
शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांना ठाणेकरांनी नाकारत मनसेचे राजन राजे यांच्या पारडय़ात एक लाख ३४ हजार ८४० मते टाकल्याने युतीचे समीकरण बिघडले. आजवर शिवसेनेचे प्रभाव असलेल्या ठाणे, कोपरी-पाचपाखाडीत मनसे फॅक्टरमुळे सेनेला केवळ अल्पशी आघाडी मिळाली, तर मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, बेलापूर, ऐरोलीत नाईकांनी घसघशीत आघाडी घेतली. मतमोजणी केंद्रात नाईक हे ठाण मांडून बसले असताना दुसऱ्या फेरीच्या निकालानंतर चौगुलेंनी केंद्र सोडले. यामुळे १९८४ नंतर प्रथमच आघाडीला ठाणे जिंकता आले. ठाणेकरांच्या आशीर्वादानेच विजयी झालो असून, पुढील २५ वर्षे खासदार राहीन, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी दिली. तर राजे म्हणाले, हा कसला बालेकिल्ला, आम्ही आल्याने तो ढासळला. तर पराभव मान्य करीत चौगुले यांनी मतदारांचे आभार मानले.
जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंद परांजपे विजयी झाले असून, त्यांनी विधान परिषदेचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा २४,१९७ मतांनी पराभव केला. परांजपे यांना २,१२,६६४ मते मिळाली, तर विजयाची हमी देणाऱ्या वसंत डावखरे यांना एक लाख ८८ हजार २६७ मतांवर समाधान मानावे लागले. मनसेच्या वैशाली दरेकर यांनी दोन्ही उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळविताना मतमोजणी दरम्यान अनेकदा बाजी मारली, मात्र मतमोजणीच्या शेवटी त्यांना एक लाख दोन हजार ५६ मतांवर समाधान मानावे लागले. बसपाचा हत्ती मात्र पूर्णत: ढेपाळला. या पक्षाचे कमरुद्दीन खान यांना १५ हजार ६०६ मते मिळाली. निवडणुकीपूर्वीच सहा महिने अगोदर डावखरे यांनी या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती, तर आनंद परांजपे यांना ऐनवेळी मैदानात उतरविण्यात आले होते. या विजयाबद्दल बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, मुळातच हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित होता. फक्त यापुढे मनसेच्या या भागातील वाढलेल्या मतांची आम्हाला दखल घ्यावी लागेल. गाफील राहून चालणार नाही. युतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघावरील आपली हुकूमत कायम राखण्यात काँग्रेला यश आले असून, या मतदारसंघातून आघाडीचे सुरेश टावरे विजयी झाले. त्यांनी भाजपचे जगन्नाथ पाटील यांचा ४१ हजार ३६४ मतांनी पराभव केला. टावरे यांना एक लाख ८२ हजार ७८९, तर पाटील यांना एक लाख ४१ हजार ४२५ मते मिळाली. मनसेचे देवराज म्हात्रे यांनी या दोन्ही उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे केले होते. त्यांना एक लाख सात हजार ९० मते मिळाली. कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांना ७७ हजार ७६९, तर भिवंडी हा आपला बालेकिल्ला समजणाऱ्या समाजवादी पक्षाचे उमेदवार आर.आर. पाटील यांना केवळ ३२ हजार ७६३ मते मिळाली.
टावरे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. या विजयाबद्दल बोलताना टावरे म्हणाले की, भिवंडीचा महापौर असताना आपण या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते. या विजयामुळे जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळाली असून, ही सेवा आपण यापुढील काळातही प्रामाणिकपणे करू. आजचा हा विजय काँग्रेस- राष्ट्रवादी व आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचेही टावरे यांनी सांगितले. टावरे यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली.
ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊनही बहुजन विकास आघाडी व कॉ. गोदुताई शामराव परुळेकर मंचच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे विजय मिळाला. वसई विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई, विरार, बोईसर परिसरात जी विकासकामे केली, त्याचाही मला फायदा मिळाला, अशी प्रतिक्रिया पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार बळीराम जाधव यांनी व्यक्त केली. जाधव विजयी होताच वसई, विरार परिसरात कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करून आपला आनंद साजरा केला.
पालघर लोकसभा मतदारसंघातून जाधव यांनी भाजप-सेना युतीचे उमेदवार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचा १२ हजार ३६५ मतांनी पराभव केला. जाधव यांना दोन लाख २३ हजार २३४, तर वनगा यांना दोन लाख १० हजार ६७४ मते मिळाली. सात वेळा डहाणूतून खासदार म्हणून निवडून गेलेल्या काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यांना एक लाख ६० हजार ५७० मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर माकपचे लहानू कोम यांनी ९२ हजार २२४ मते मिळविली.
जव्हार, डहाणू व विक्रमगड या तीन विधानसभा मतदारसंघांत फारसा परिचय नसूनही कार्यकर्त्यांनी जाधव यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत केली. अवघ्या १५ ते २० दिवसांत मतदारसंघ पिंजून काढला. वसई, विरार, बोईसर, नालासोपारा भागात वसई विकास आघाडीने केलेल्या विकासकामांमुळेही मतदारांनी जाधव यांना पसंती दिली, तर कॉ. गोदुताई शामराव परुळेकर मंचाच्या कार्यकर्त्यांनीही प्रचारात झोकून दिल्याने विजय सोपा झाला, अशी प्रतिक्रिया आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली.
हा विजय बहुजन विकास आघाडीचा नसून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याची प्रतिक्रिया वनगा यांनी व्यक्त केली. जाधव यांना राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा होता. भाजप-सेना व श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले, अशी पावतीही वनगा यांनी दिली.