Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच आरपीआयची पाटी कोरी
बंधुराज लोणे
मुंबई, १६ मे

 

राज्यात प्रमुख शक्ती असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या एकाही गटाला या वेळी खाते खोलता आले नाही. त्यामुळे पंधराव्या लोकसभेत रिपब्लिकन खासदार दिसणार नाही. गेल्या दीड दशकात पहिल्यांदाच असे घडले आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीने विश्वासघात केला, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
गेल्या दीड दशकात कधी रामदास आठवले तर कधी प्रकाश आंबेडकर लोकसभेत होते. रामदास आठवले तर तीन वेळा निवडून आले. रा. सू. गवई मध्यंतरी राज्यसभेवर होते. पंधराव्या लोकसभेसाठी शिर्डीतून रामदास आठवले, अकोल्यातून प्रकाश आंबेडकर तर अमरावतीमधून डॉ. राजेंद्र गवई रिंगणात होते. लातूरमध्ये टी. एम. कांबळे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. शिर्डीमधून उमेदवारी देण्यासाठी रामदास आठवले यांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. मात्र प्रचारात काँग्रेसने मदत केली नाही, असा आरोप आठवले यांचे समर्थक करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीला त्यांच्या अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या आठवले यांनी या दोन्ही पक्षाने वाऱ्यावर सोडले, असे बोलले जात आहे. राजेंद्र गवई यांनाही काँग्रेसने म्हणावी तशी मदत केली नाही, असे निकालावरून दिसत आहे. लातूरमध्ये टी. एम. कांबळे यांना शब्द देऊनही काँग्रेस नेतृत्वाने उमेदवारी नाकारली. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वबळावर मैदानात होते. मात्र या सर्व उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला. राज्यात सुमारे सहा टक्के असणाऱ्या बौद्ध समाजाचा एकनाथ गायकवाड वगळता दुसरा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने निवडून आणला नाही, असा संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र बसून येणाऱ्या विधानसभेसाठी रणनीती ठरवावी, असा आग्रह कार्यकर्ते करीत आहेत.