Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भात फिफ्टी-फिफ्टी
काँग्रेस-राष्ट्रवादी पाच,सेना-भाजप पाच
नागपूर, १६ मे / प्रतिनिधी/ जिल्हा वार्ताहर

 

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात एकमेव जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने यावेळी जोरदार मुसंडी मारली असून दहापैकी पाच जागा जिंकल्या आहेत तर गेल्या निवडणुकीत अकरापैकी दहा जागा जिंकणाऱ्या सेना-भाजप युतीवर यंदा फक्त पाच जागांवर समाधान मानण्याची वेळ आली. काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार (नागपूर), दत्ता मेघे (वर्धा), काँग्रेसचे अ.भा. सरचिटणीस मुकुल वासनिक (रामटेक), मारोतराव कोवासे (गडचिरोली-चिमूर) आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (भंडारा-गोंदिया) यांचा तर भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये हंसराज अहीर (चंद्रपूर), संजय धोत्रे (अकोला) यांचा आणि शिवसेनेच्या विजयी उमेदवारांमध्ये भावना गवळी (यवतमाळ-वाशीम), प्रतापराव जाधव (बुलढाणा) आणि आनंदराव अडसूळ (अमरावती) यांचा समावेश आहे.
विदर्भात काँग्रेसने चार, शिवसेनेने तीन, भाजपने दोन तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे. नागपूर, रामटेक, वर्धा, गडचिरोली-चिमूर या चार मतदारसंघात काँग्रेस तर भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला. अकोला आणि चंद्रपूरमध्ये भाजपला तर बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ-वाशीममध्ये शिवसेनेला मतदारांनी कौल दिला. बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ-वाशीम शिवसेनेने राखले, तर रामटेकचा बालेकिल्ला गमावला. अकोला आणि चंद्रपूरची जागा राखण्यात भाजपला यश आले, तर भंडारा आणि वर्धेची जागा भाजपला गमवावी लागली. राष्ट्रवादीला एका जागेचा फायदा झाला. भंडारा-गोंदियात प्रफुल्ल पटेल यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. काँग्रेसने नागपूरची जागा कायम राखत गडचिरोली-चिमूर, वर्धा आणि रामटेक हे आणखी तीन मतदारसंघ अक्षरश: खेचून आणले.
पराभूत झालेल्या दिग्गजांमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे, भाजपची खासदारकी उपभोगल्यानंतर बंडखोरी करून काँग्रेसची उमेदवारी मिळवणारे बंजारा नेते हरिभाऊ राठोड, सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते बाबासाहेब धाबेकर, भारिप-बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, बिहारचे राज्यपाल रा.सू. गवई यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई, चंद्रपुरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेश पुगलिया, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आमदार वामनराव चटप, भाजपचे वर्धेचे खासदार सुरेश वाघमारे, भंडाऱ्याचे खासदार शिशुपाल पटले, बंडखोरी करून काँग्रेसचा राजीनामा देणारे माजी आमदार नाना पटोले, नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बसपाची कास धरणारे राजे सत्यवान आत्राम, भाजपचे आमदार अशोक नेते, बहुजन-रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे यांचा समावेश आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत कलहाने चर्चेत आलेल्या नागपूरमधून केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी साऱ्यांना काटशह देत निसटत्या आघाडीने भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांच्यावर मात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले नागपूर शहर काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे मुत्तेमवारांच्या विजयाने पुन्हा सिद्ध झाले. सर्वात धक्कादायक पराभव गडचिरोलीतील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा झाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या नेतेंना काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी अर्धी मतमोजणी झाल्यावर मागे टाकले आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवली. अकोल्यात काँग्रेसचे दिग्गज नेते बाबासाहेब धाबेकर यांना मतदारांनी चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले.
अमरावतीत पुन्हा शिवसेना
बुलढाण्याहून अमरावतीला (राखीव) आयात केलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी अपेक्षेप्रमाणे भगवी लाट कायम ठेवली. अडसूळ यांनी ३ लाख १४ हजार २८६ मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित रिपब्लिकन गवई गटाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांचा ६१ हजार ७१६ मतांनी पराभव केला. गवई यांना २ लाख ५२ हजार ५७० मते मिळाली. अपक्ष राजेंद्र जामठे यांनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊन ६४,४३८ मतांची तर बसपचे गंगाधर गाडे यांनी ४१ हजार ५७५ मतांची कमाई केली.
वर्धेत दत्ता मेघे
राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा करून काँग्रेसमध्ये प्रवेशणारे विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी वर्धेत भाजपचे सुरेश वाघमारे यांना ९५ हजार ९३४ मतांनी चारीमुंडय़ा चीत केले. दत्ता मेघे यांनी ३ लाख ५२ हजार ५५७ मते घेतली तर सुरेश वाघमारे यांना २ लाख ५६ हजाप ६२३ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले बसपचे तरुण उमेदवार बिपीन कंगाले यांचा पराभव झाला असला तरी पहिल्याच लोकसभा निवडणुकीत १ लाख ३१ हजार ५४२ मते घेऊन त्यांनी साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे
अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांनी भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा ६३,७३२ मतांनी पराभव करून विजयाचा झेंडा रोवला. तिरंगी लढतीत संजय धोत्रे यांना २ लाख ८७ हजार ५२६ तर प्रकाश आंबेडकर यांना २ लाख २२ हजार ६७८ मते मिळाली. काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. धाबेकरांना १ लाख ८२ हजार ७७६ मते मिळाली. संजय धोत्रे यांनी दुसऱ्यांदा येथून विजय मिळवल्याने या मतदारसंघावर अद्यापही सेना-भाजपची पकड असल्याचे सिद्ध झाले. मागील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या काँग्रेसला यावेळी मतदारांनी तिसरी पसंती दिली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भारिप बहुजन महासंघाने सारी ताकद प्रकाश आंबेडकरांच्या पाठिशी उभी केली होती. तरीही विजयाची माळ भाजपचे संजय धोत्रे यांच्या गळ्यात पडली.
बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव
बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी काँग्रेसचे उमेदवार व राज्याचे आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांचा २८,०७८ मतांनी पराभव केला. प्रतापरावांना ३,६३,६७१ तर पराभूत राजेंद्र शिंगणे यांना ३,२५,९९३ मते पडली. बसपचे वसंतराव दांडगे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी ८१,७६३ मते घेतली. आजच्या विजयामुळे प्रतापराव भगवा झेंडा खांद्यावर घेऊन पहिल्यांच लोकसभेत प्रवेश करणार आहेत. प्रतापराव तीनवेळा मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत.
गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेसचे मारोतराव कोवासे
गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी मतमोजणी अर्धी झाल्यानंतर अनपेक्षितपणे मुसंडी मारत भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना जबर हादरा दिला. चुरशीच्या निवडणुकीत कोवासे यांनी २८ हजार ५८० मतांनी धक्कादायक विजय मिळवला. मारोतराव कोवासे यांना ३ लाख २१ हजार ७५६ मते मिळाली, तर अशोक नेते यांनी २ लाख ९३ हजार १७६ मते घेतली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले बसपचे उमेदवार राजे सत्यवानराव आत्राम यांना १ लाख ३५ हजार ७५६ मते मिळाली.
चंद्रपूरमध्ये भाजपचे हंसराज अहीर
चंद्रपूरची जागा कायम राखण्यात भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहीर यांना यश आले. अहीर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांचा ५७,४४२ मतांनी पराभव केला. अहीर यांना ३ लाख १ हजार १४५ मते तर पुगलियांना २ लाख ६८ हजार ५९९ मते मिळाली. स्वतंत्र भारत पक्षाचे नेते आमदार वामनराव चटप यांनी १ लाख ६८ हजार ८१८ मते घेतली. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बसपचे अ‍ॅड. दत्ता हजारे चवथ्या स्थानी आले. त्यांना ५७,४४२ मते मिळाली.