Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘लाखमोला’च्या मनसे उमेदवारांना मिळणार विधानसभेची उमेदवारी
संदीप आचार्य
मुंबई, १६ मे

 

मुंबई-ठाण्यात शिवसेना-भाजपला ‘दे धक्का’ देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘लाखमोला’च्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार असून संपूर्ण राज्यात मनसे जवळपास दीडशे जागा लढविणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. लोकसभेसाठी निवडक जागा लढविण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय योग्य होता हेच मनसेच्या नवख्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट होत असून विधानसभा निवडणुकीत मोठय़ा संख्येने मनसेचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेचा उल्लेख ‘इधर से उधर से’ असा करत मनसे कोणताही प्रभाव पाडू शकत नाही, अशी खिल्ली उडवली होती. या पाश्र्वभूमीवर मनसेच्या उमेदवारांनी मुंबईतील सहाही मतदारसंघात एक लाखांहून अधिक मते मिळवली असून ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातही एक लाखाहून अधिक मते मिळवली आहेत. दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर यांना एक लाख २२ हजार मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचे मोहन रावले हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. उत्तर-पूर्व मतदारसंघात मनसेच्या शिशिर शिंदे यांनी एक लाख ९४ हजार मते मिळवली आहेत तर उत्तर मुंबईत मनसेच्या शिरीष पारकर यांनी तब्बल एक लाख २६ हजार मते मिळवली आहेत. ठाणे येथे मनसेच्या राजन राजे यांना मिळालेली एक लाख ३४ हजार मते ही शिवसेनेसाठी झटका ठरला आहे. मनसेला मुंबई व ठाण्यात मिळालेली मते ही शिवसेना-भाजपसाठी धोक्याची घंटा असून लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालिम असल्याचे मत मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. सुशिक्षित उमेदवार देण्याचे राज यांचे धोरण आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असून पक्षबांधणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तळापर्यंत पक्षबांधणी झाली असती तर लोकसभेत मनसेला काही जागा मिळाल्या असत्या हे स्पष्ट झाल्याने मतदारसंघनिहाय पक्षबांधणीचा आढावा घेण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेने विदर्भ व मराठवाडय़ात एकही उमेदवार उभा केला नव्हता. प्रामुख्याने शहरी भागातील जागा लढविल्या. मात्र विधानसभेसाठी विदर्भ व मराठवाडय़ातही मोठय़ा प्रमाणात जागा लढविण्यात येणार आहेत. मुंबईत विधानसभेच्या ३६ तर ठाणे येथे २४ जागा असून नाशिक व पुणे यासह विदर्भ व मराठवाडय़ात उमेदवार उभे करताना त्यांचे शिक्षण तसेच तेथील कामाचा व पक्षबांधणीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.