Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नीलेश राणे यांचा निर्विवाद विजय
रत्नागिरी, १६ मे/खास प्रतिनिधी

 

नव्यानेच निर्माण झालेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी व मावळते खासदार सुरेश प्रभू यांचा ४६ हजार ७५० मतांनी पराभव करत निर्विवाद विजय मिळवला. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने हा विजय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिवसेना आणि त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या कोकणामध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार तब्बल सुमारे २९ वर्षांनंतर निवडून आला आहे. तसेच गेल्या सलग चार लोकसभा निवडणुका जिंकलेल्या अनुभवी प्रभू यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.
निवडणूक निकालानंतर उद्योगमंत्री नारायण राणे व उमेदवार नीलेश राणे यांनी आपल्या विजयाचे श्रेय पक्षकार्यकर्ते आणि जनतेला दिले, तर या परभवामागील कारणांचा शोध घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया पराभूत उमेदवार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली.देशातील मतदारसंघाच्या फेररचनेनंतर प्रथमच झालेल्या या बहुरंगी निवडणुकीत राणे व प्रभू यांच्यासह एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. गेल्या २३ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण ५४.५ टक्के मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीमध्ये राणे यांना तीन लाख ५३ हजार ३४८, तर प्रभू यांना तीन लाख सहा हजार ६३८ मते पडली. याशिवाय टपाली मते लक्षात घेता राणे ४६ हजार ७५० मतांनी विजयी झाल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनी घोषित केले. अन्य उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार सुरेंद्र बोरकर यांना १८ हजार ८५८, तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ. जयेंद्र परूळेकर यांना १५ हजार ४४३ मते पडली.
डॉ. राणे हे कोकणातून निवडून आलेले सर्वात तरुण खासदार आहेत. त्यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. येथील फिनोलेक्स महाविद्यालयामध्ये या लोकसभा मतदारसंघातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक मतदारसंघांमध्ये १४ टेबले याप्रमाणे एकूण ८४ टेबलांवर प्रत्येक फेरीची मतमोजणी करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २४ फेऱ्या झाल्या. त्यामध्ये दुसऱ्या फेरीचा अपवाद वगळता डॉ. राणे यांनी प्रथमपासूनच आघाडी घेतली आणि ती अखेपर्यंत वाढवत नेली. त्यामुळे सुमारे निम्मी मतमोजणी झाल्यावरच राणे यांचा विजय निश्चित झाला व मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

सोन्यापेक्षा मौल्यवान दिवस
आपल्या आयुष्यातील आजचा दिवस सोन्यापेक्षा मौल्यवान असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री नारायण राणे यांनी निकालानंतर व्यक्त केली आणि तरुण डॉ. नीलेश यांच्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिल्यानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले. या निवडणुकीत ‘राणे फॅक्टर’ नव्हे, तर ‘जनता फॅक्टर’ प्रभावी ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आपल्याला अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याचीही कबुली दिली, मात्र याबाबत आपण आता जास्त काही न बोलता योग्य वेळी बोलू, असे राणे यांनी स्पष्ट केले.