Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

अजित पवारांना घरचा आहेर

 

पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री आणि राज्याचे सर्वात पॉवरफुल मंत्री अजित पवार यांच्या सत्तेला आणि सत्ताकारणाला पुणे जिल्हय़ात ओहोटी लागल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिसू लागले आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मिळालेले मताधिक्य, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असूनही मावळ मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराला पत्करावी लागलेली हार, स्वत:ची सारी ताकद पणाला लावूनही शिरूर मतदारसंघात झालेला शिवसेनेचा विजय आणि पुणे महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर सुरेश कलमाडी यांचा पाडाव करण्यासाठी शरद पवार यांचा आदेश धुडकावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कलमाडी यांच्या विरोधात काम करण्यास सांगूनही कलमाडी यांचा झालेला निसटता विजय या साऱ्या गोष्टी पुणे जिल्हय़ातील अजित पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या ठरल्या आहेत.
अजित पवार यांच्यासह पक्षातील अनेकांनी विरोध करूनही पुण्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी विजय मिळविला. मात्र त्यांचे गेल्या वेळचे मताधिक्य लक्षणीयरीत्या कमी झाले, याला या विरोधासह प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काही प्रमाणात बहुजन समाज पक्ष कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे यांना भरभक्कम मताधिक्य अपेक्षित असणाऱ्या कोथरूड, पर्वती आणि कसबा या तीन विधानसभा मतदारसंघांनी त्यांची निराशा केली, मात्र काँग्रेसच्या मानल्या जाणाऱ्या शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी या तीन मतदारसंघांनी काँग्रेसला भरभक्कम आघाडी मिळवून दिली. काँग्रेसच्या या भागातील आघाडी मोडून काढण्याइतपत साथ भाजपचे भाग देऊ शकले नाहीत. त्यामुळे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कलमाडी यांनी आघाडी घेतली, ती अखेपर्यंत कायम ठेवली. कोथरूड या भाजपच्या भागाने अखेरच्या टप्प्यात त्या पक्षाला चांगली मते मिळवून दिली, मात्र इतर ठिकाणी काँग्रेसने घेतलेली आघाडी मोडण्यास ती पुरेशी ठरली नाही. त्यामुळे भाजप प्रथमपासूनच मागे पडला. मनसेकडे सर्वपक्षीय तरुण आकर्षिला गेल्याचेही स्पष्ट झाले. मनसेचा सर्वाधिक फटका भाजपला बसला. कॅन्टोन्मेंटच्या काही भागांत तर काँग्रेसपाठोपाठ बसप दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. परिणामी, कलमाडी यांचा विजय सोपा होत गेला. कलमाडी यांना गेल्या निवडणुकीत ७३ हजारांचे अधिक्य मिळाले होते. यंदा ते २८ हजारांच्या आसपासच राहिले. त्याला प्रामुख्याने मनसेच कारणीभूत ठरला.
शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त करणाऱ्या शरद पवारांच्या उमेदवाराला सेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून जो फटका बसला आहे, त्यावरून पवारांनी हा मतदारसंघ का सोडला, याचा अंदाज येऊ शकतो. या मतदारसंघात राज्याचे ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील आणि खुद्द अजित पवार यांनी मोर्चेबांधणी करूनही त्यात त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवरील मतदारांचा राग आणि आढळराव यांनी सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे ही निवडणूक पूर्णपणे मतदारांच्या हाती गेली होती. आढळराव यांना १ लाख, ७८ हजार एवढे मताधिक्य मिळणे ही बाब पवारांना निश्चितच झोंबणारी आहे. या लोकसभा मतदारसंघात सेनेचा एकही आमदार नाही. तरीही वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आढळराव यांना ३० हजारांचे मताधिक्य मिळाले, हे विशेष!
बारामती मतदारसंघ हा परंपरागत पवारांच्या ‘मालकी’चा राहिला आहे. तेथे या वेळी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मताधिक्य किती मिळेल, एवढाच चर्चेचा विषय होता. प्रत्यक्षात त्यांना त्यांच्या पिताजींएवढे मताधिक्य मात्र मिळवता आले नाही. त्यांच्या प्रतिस्पर्धी कांता नलावडे यांना दीड लाख मते मिळाली आणि त्यामुळे सुळे यांचे मताधिक्य ३ लाख ३५ हजार एवढे झाले. खडकवासला आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघांत सुप्रिया सुळे यांना किमान ५० हजारांचे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या दोन्ही ठिकाणी हे मताधिक्य २५ ते ३० हजार एवढेच मिळाले.
मावळ मतदारसंघात प्रथमपासूनच शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे तेथे सेनेचे गजानन बाबर आणि राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांच्या चुरस होती. हे दोघेही उमेदवार पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. या दोघांचाही संपर्क चांगला आणि गेली अनेक वर्षे ते राजकारणात काम करणारे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत बाबर यांनी पानसरे यांचा पराभव केला होता. आता लोकसभा मतदारसंघातही पानसरे यांना बाबर यांच्याकडूनच हार पत्करावी लागली आहे. याही मतदारसंघात अजित पवार यांनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक जातीय समीकरणांकडे ओढली गेली आणि त्याचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. पानसरे यांच्या उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांकडूनच मोठय़ा प्रमाणावर विरोध होता, त्याचाही फायदा बाबर यांना झाला. पुणे जिल्हय़ातील चार लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेला दोन, काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादीच्या वाटय़ाला फक्त एक जागा येणे, ही बाब जिल्हय़ाच्या भावी राजकारणाच्या दृष्टीने सूचकच म्हणावी लागेल.
मुकुंद संगोराम/सुनील माळी