Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

अंतर्गत बंडाळीचा फटका
आर. आर. पाटील यांची खंत
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात ताकद असतानाही पक्षाला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत, अशी खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज व्यक्त केली. गेली १० वर्षे काँग्रेसबरोबर आघाडी असतानाही यंदा काँग्रेसचा अपेक्षित फायदा होऊ शकला नाही, असेही त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नऊ खासदार निवडून आले होते. नंतर पोटनिवडणुकीत एक जागाजिंकल्याने संख्याबळ १० झाले होते. या तुलनेत यंदा आठ खासदार निवडून आले आहेत. परिणामी गतवेळच्या तुलनेत पक्षाचे संख्याबळ दोनने घटले आहे. पक्षात इच्छुकांची संख्या जास्त होती. एकाला उमेदवारी दिल्यावर अन्य इच्छुकांचे मन वळविण्यात किंवा प्रचारात त्यांना सक्रिय करून घेण्यात पक्ष कमी पडला. एकूणच पक्षाचे उमेदवार व असंतुष्टांमध्ये मेळ घालण्यात पक्ष कमी पडल्याची कबुली आर. आर. पाटील यांनी दिली. या पराभवाचे आत्मपरीक्षण केले जाईल व या वेळी राहिलेल्या त्रुटी विधानसभा निवडणुकीत दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केले का, या प्रश्नावर आपल्याला कोणावरही दोषारोप करायचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत अशी राज्यातील जनतेची भावना होती. तरीही पक्षाला मते का कमी पडली, याचा आढावा घेतला जाईल. राष्ट्रवादी व शिवसेनेत जवळीक वाढल्याची चर्चा मध्यंतरी झाली होती. त्याचा मात्र फटका बसलेला नाही. कारण जातीयवादी पक्षांबरोबर कधीही आघाडी करायची नाही, असे पक्षाचे धोरण असल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या असल्या तरी राज्यातील जनता शिवसेना व भाजपच्या पाठीशी नाही हे स्पष्ट झाल्याचेही आर. आर. पाटील यांनी सांगितले.