Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसच्या कार्यालयांसमोर जल्लोष तर राष्ट्रवादी, आरपीआय पक्षाच्या कार्यालयाबाहेर सन्नाटा !
मुंबई, १६ मे / प्रतिनिधी

 

राज्यात आणि मुंबईत काँग्रेसला निवडणुकीत मिळालेल्या यशाचा आनंद प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. इतकेच नव्हे तर हा जल्लोष त्यांच्या कृतीतून प्रकर्षांने जाणवला तो मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयाबाहेर केलेल्या जल्लोषातून. निकाल जाहीर होताच काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जमले तेच मुळी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या माळा घेऊन. ही सगळी सामग्री पुढील जल्लोषाची नांदी ठरविणारीच होती. काँग्रेसबरोबरच असलेल्या राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टीच्या कार्यालयात त्याचवेळी दिसणारा शुकशुकाट अगदीच भकास वाटत होता.
आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर केंद्रीय मंत्री मुरली देवरा आणि गृहराज्यमंत्री नसीम खान यांचे आगमन झाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. त्यापाठोपाठ कार्यकर्ते ढोल-ताशे आणि पक्षाचे झेंडे घेऊन आले आणि त्यांनी चक्क तालावर आनंदाने बेभान होऊन नाचायलाच सुरुवात केली.
धनसे, तनसे, तर नव्हेच पण ‘मनसे’ही आमच्या विजयाचे शिल्पकार नाहीत, असे ओरडतच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या कार्यालयासमोरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) कार्यालय आहे.
रिपब्लिकन पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा असला तरी त्यांचे नेते रामदास आठवले यांना पराभव पत्करावा लागल्याने त्या कार्यालयात अन्य वेळी दिसणाऱ्या लगबगीचा मागमूसही दिसत नव्हता.
बाहेरगावाहून येणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाचे कार्यालय कोठे आहे याची माहिती व्हावी या हेतूनेच ते कार्यालय उघडे ठेवण्यात आले असल्यासारखे चित्र दिसत होते.
नरिमन पॉइण्ट येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू असतानाच शेजारीच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मात्र शुकशुकाट होता. काँग्रेसचे कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात नाचत असताना राष्ट्रवादीच्या कार्यालयात सन्नाटा पसरलेला दिसत होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पेढे, मिठाई वाटण्यात आली आणि अभिनंदनाच्या हारतुऱ्यांचा वासही वातावरणात रेंगाळत राहिल्याचे चित्र दिसत होते.