Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

नगरला काँग्रेसची मिरासदारी संपुष्टात!

 

‘काँग्रेसचा बालेकिल्ला’ ही बिरुदावली नगर जिल्ह्य़ाने मोडीत काढली. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने जिल्ह्य़ातील पारंपरिक मक्तेदारी संपुष्टात आणली. व्यक्तिकेंद्रीत राजकारणात रामदास आठवलेंसारख्या भारिपच्या नेत्याला जिल्ह्य़ात मोठय़ा पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसची राज्यातील निवडणूक प्रचारप्रमुखाची धुरा बाळासाहेब विखे यांच्यावर, तर राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी गोविंदराव आदिक यांच्यावर होती. या दिग्गजांना घरच्या उमेदवारांना मात्र निवडून आणता आले नाही.
नगर मतदारसंघात भाजपचे दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांचा, तर शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी आठवले यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसच्या दृष्टीने गट-तट व व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचा हा परिपाक आहे. नगरमध्ये काँग्रेसचे राजीव राजळे यांच्या बंडखोरीमुळे गांधी यांचा विजय सुकर झाला. जिल्ह्य़ात काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करू शकते, यावर या निकालाने शिक्कामोर्तब केले. आजवरची परंपरा पाहता अपवाद वगळता काँग्रेसवाले तुटेपर्यंत ताणत नव्हते. या वेळी ठरवून तुटेपर्यंत ताणण्यात आले की काय, असा संशय घ्यावा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर आठवलेंच्या पराभवाने जिल्ह्य़ाच्या राजकारणाचे ध्रुवीकरण होण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने प्रस्थापितांना त्याचा जाब द्यावा लागेल. खासदार बाळासाहेब विखे, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, गोविंदराव आदिक, यशवंतराव गडाख अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात आठवले यांना पराभव स्वीकारावा लागला.
त्याला आठवले यांची व्यक्तिगत प्रतिमा व उमेदवारीतील घोळही कारणीभूत ठरला.
नगर मतदारसंघात राष्ट्रवादीला प्रामुख्याने कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे राजीव राजळे यांची बंडखोरी नडली. जिल्ह्य़ातील या दोन्ही मतदारसंघातील निकालाने काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. व्यक्तिगत सुभेदाऱ्या वाढविण्यासाठी वेळप्रसंगी पक्षाला फाटय़ावर टांगण्याची ही प्रवृत्ती भविष्यात प्रस्थापित नेत्यांनाही अडचणीत आणणारी ठरेल. विधानसभेच्या येत्या निवडणुकीतच त्याचा प्रत्यय येईल, असे दिसते.
महेंद्र कुलकर्णी