Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

उत्तर महाराष्ट्रात भाजपची मुसंडी
नाशिक, १६ मे / प्रतिनिधी

 

बहुरंगी लढती व परस्परांना छेद देणारी समीकरणे यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय गुंतागुंतीच्या पाश्र्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातल्या सहा मतदारसंघांपैकी चार जागांवर आघाडी घेत भाजपने मुसंडी मारली. काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात अस्तित्व उरले नसून नाशिकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारत मनसेने सर्वानाच जोरदार धक्का दिला. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी मनसेच्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला तर शिवसेनेचे दत्ता गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. नंदुरबारमध्ये काँग्रेसचे माणिकराव गावित यांनी सलग नवव्यांदा लोकसभेत प्रवेशकेला तर दिंडोरीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्यावर विजय मिळविला. जळगाव जिल्हयातील दोन्ही जागांवर भाजपने विजय संपादन केला असून धुळ्यातील चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे अमरीश पटेल यांच्यावर भाजपच्या प्रताप सोनवणे यांनी सुमारे १९ हजार मतांनी मात केली. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरविल्यामुळे नाशिकची निवडणूक यंदा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. जातीय समीकरणाचा आधार घेत सेनेने दत्ता गायकवाड यांना त्यांच्याविरोधात उतरविल्याने आणि त्यातच अखेरच्या क्षणी मनसेचीही चांगलीच हवा तयार झाल्याने येथील निकालाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते. नाशिक शेजारच्या दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी ३७ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांचा पराभव केला. काँग्रेसने धुळ्यातून अमरीश पटेल यांना दिलेली उमेदवारी व त्यामुळे पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीररित्या व्यक्त केलेल्या नाराजीमुळे धुळ्याची निवडणूक चांगलीच गाजली. येथे प्रत्येक फेरीगणिक गणिते बदलती राहिल्याने सर्वाची उत्सुकता ताणली गेली. अखेर शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये घेतलेली आघाडी टिकवत भाजपचे प्रतापदादा सोनवणे यांनी काँग्रेसचे पटेल यांचा १९ हजारहून अधिक मतांनी पराभव केला. परंपरेने काँग्रेससोबत राहणाऱ्या नंदुरबार मतदारसंघात या वेळी या पक्षाचे माणिकराव गावित यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांनी दंड थोपटले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी समाजवादी पार्टीचे तिकीट घेतल्याने उभयतांच्या मतविभागणीत भाजपचा लाभ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. तथापि, आपला गड राखण्यात माणिकरावांनी यश मिळविले. भाजपचा बालेकिल्ला म्हणविल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ातील दोन्ही जागांवर अपेक्षेनुसार भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवला.