Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

सिक्कीममध्ये एसडीएफ, आंध्रमध्ये काँग्रेस, ओरिसामध्ये बीजेडी पुन्हा सत्तेत येणार
हैदराबाद, १६ मे/पीटीआय

 

सिक्कीममध्ये विधानसभेच्या सर्वच्या सर्व ३२ जागांवर विद्यमान सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटने (एसडीएफ) विजय मिळविला आहे तसेच या राज्यातील लोकसभेच्या एकमेव असलेल्या जागेवरही विजय मिळविला. दरम्यान ओरिसामध्ये बिजू जनता दल पुन्हा सत्ता काजीब करण्याची चिन्हे आहेत.आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत जनतेसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली होती. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये राज्य विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५५ जागांवर विजय मिळवून काँग्रेसनेसत्तासूत्रे आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे.
सिक्कीममध्ये विधानसभेच्या सर्वच्या सर्व ३२ जागांवर विद्यमान सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटने विजय मिळविला आहे. या विजयामुळे एसडीएफला सिक्कीममध्ये सरकार स्थापन करण्याची चौथ्यांदा संधी मिळणार आहे. या पक्षाचे प्रमुख पवनकुमार चामलिंग यांनी पोकलोक-कामरंग व नामची-सिंगिथांग या दोन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. चामलिंग यांच्यावर निवडणुकीदरम्यान गैरप्रकार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला नाही हे ही येथे लक्षात घेण्यासारखे आहे.
दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभेच्या २९४ जागांपैकी काँग्रेसने १५५ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी सांगितले की, वैयक्तिक लाभाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी हाच आमच्या विजयासाठी सर्वात परिणामकारक असा मुद्दा ठरला. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगु देसम पक्षाने (८९), प्रजा राज्यम पार्टी (१८), तेलंगण राष्ट्र समिती (१०), भाजप (१), माकप (३), भाकप (२), एआयएमआयएम (६), लोकसत्ता (१) व अन्य (१३) जागांवर विजय मिळविला आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षांनी चित्रपट तारे-तारकांच्या मदतीने पक्षप्रचार केला होता पण त्याचा त्या पक्षांना फारसा फायदा झाला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
ओरिसा विधानसभेच्या एकुण १४७ जागांपैकी ३३ जागा बिजू जनता दलाने जिंकल्या असून अजून ६० जागांवर या पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ओरिसातील विद्यमान सत्ताधारी बिजू जनता दलाच्या हातीच पुन्हा सारी सत्तासूत्रे असतील हे स्पष्ट झाले आहे. अशा रीतीने नवीन पटनायक सलग तिसऱ्यांदा ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील.
या राज्यात काँग्रेसने विधानसभेच्या चार जागा जिंकल्या असून २४ जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजपने ४ जागांवर विजय मिळविला असून या पक्षाने ८ जागांवर आघाडी घेतली आहे. हिंजीली विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढविणाऱ्या मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी रघाब परिदा यांचा ६०७८६ मतांनी पराभव केला.
भदरवा पोटनिवडणुकीत मोहम्मद शरीफ नियाझ विजयी
जम्मू-काश्मीरमधील भदरवा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद शरीफ नियाझ हे विजयी झाले. ही पोटनिवडणुक गेल्या २३ एप्रिल रोजी पार पडली होती. नियाझ यांना आपले निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार दलीपसिंग यांच्यापेक्षा २७४७ मते अधिक मिळाली.