Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

पंधराव्या लोकसभेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये अगदी कटोकटीची लढत होईल या ढोबळ अंदाजावर उजाडलेल्या ‘१६ मे’ने हे भाकित सपशेल खोटे ठरवित काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला सत्तास्थापनेचे दरवाजे सताड उघडले आहेत. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा काँग्रेसमध्ये गेल्या सुमारे दोन दशकांत विसरला गेलेला बहुमान मनमोहनसिंग यांना मिळणे हा आता फक्त उपचार राहिला आहे. काँग्रेस आणि यूपीएने महाराष्ट्रासह जवळपास संपूर्ण देशभरात लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यातही विशेष नजरेत भरण्याजोगे यश दक्षिणेने काँग्रेसच्या झोळीत टाकले आहे. तर देशभरात अन्यत्रही काँग्रेसने उल्लेखनीय यश मिळविले आहे. आजच्या विजयाबरोबर काँग्रेसला इतरही अनेक गोष्टी अनुकूल झाल्या आहेत. या विजयामुळे पुढील पाच वर्षे काँग्रेस आघाडीला तुलनेत बऱ्याच निर्विघ्नपणे राज्यकारभार हाकण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. शरद पवार, डावे, लालू-मुलायम- पासवान हे त्रिकुट, मायावती आदी अनेक ‘अडथळे’ आजच्या निकालाने बाजूला झाले आहेत.
दुसरीकडे भाजपला या पराभवाने अनपेक्षित आणि हलाखीच्या परिस्थितीत नेऊन टाकले आहे. ‘पर्यायी सत्ताधारी’ या नामाभिधानावर प्रश्नचिन्ह ठोकले गेले आहे. त्याही पेक्षा ‘पर्यायी पंतप्रधान’ लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारकीर्दीवर आजवरचे सगळ्यात घनघोर मेघ दाटून आले आहेत. अडवाणी यांनी आता ‘विरोधी पक्ष नेतेपद’ स्वीकारण्यासही नकार दिला आहे. आजच्या निकालांनी भारतासारख्या खंडप्राय देशाच्या विकासात अडथळे ठरणाऱ्या छोटय़ाछोटय़ा प्रादेशिक पक्षांना मोठा दणका दिला असून काँग्रेस आणि भाजप या दोन मुख्य राष्ट्रीय पक्षांना पुढील राजकारणात मोठा वाव निर्माण करून दिला आहे. परिणामी गेली सुमारे दोन दशके देशात चालू असलेले ‘खिचडी राजकारण’ संपुष्टात येऊन ‘एकपक्षीय स्थिर’ सरकारचे दिवस पुन्हा येण्याचे संकेतही मिळू लागले आहेत.

राज लाटेचा ‘युटी’ला तडाखा
मुंबई, १६ मे / खास प्रतिनिधी

शिवसेना - भाजपशी पंगा घेत मराठीपणाच्या मुद्दय़ावर एकहाती निवडणूक लढविणाऱ्या ‘कच्चे लिंबू’ राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपली ‘ताकद’ दाखवून दिली. अवघ्या १२ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या मनसेला एकाही ठिकाणी विजय मिळालेला नसला तरी किमान १० जागांवर युतीच्या उमेदवारांना पराभवाच्या खाईत लोटले आहे. या ओघात दोन ठिकाणी मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर बहुतांश ठिकाणी अगदी थोडय़ा फरकाने तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. मनसेच्या या ताकदीचा सगळ्यात मोठा फटका उद्धव ठाकरे (त्यांना खाजगीत ‘युटी’ या नावाने ओळखले जाते.) यांना बसला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थातच त्याचा घसघशीत लाभ मिळाला आहे. या यशापयशातील एक गमतीदार मुद्दा म्हणजे मराठीच्या मुद्दय़ावर लढणाऱ्या मनसेमुळे किमान दोन ठिकाणी ‘अमराठी’ उमेदवार विजयी होण्यास भरीव हातभार लागला आहे. (विस्तर वृत्त)

अडवाणी यांचे सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत
विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच
नवी दिल्ली, १६ मे/खास प्रतिनिधी

भावी पंतप्रधान म्हणून पाच वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वाटय़ाला अखेर घोर निराशाच आली. दहा वर्षांंपूर्वी अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत येण्याची करामत ‘लोहपुरुष’ अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजपला साधली नाही. पंतप्रधानपदाकडे डोळे लावून बसलेल्या अडवाणींचे स्वप्न अखेर अपुरेच राहिले आणि पंधराव्या लोकसभेतील दारुण पराभवानंतर त्यांना सक्रिय राजकारणातून जवळजवळ निवृत्ती पत्करणे भाग पडले. भाजपच्या दारुण पराभवानंतर अडवाणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग केला असून त्यामुळे भाजपमधील दुसऱ्या पिढीतील नेत्यांमध्ये आता पक्षनेतृत्वासाठी संघर्ष तीव्र होणार आहे.
भाजपचा धुव्वा उडविणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यानंतर अडवाणी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केल्याचे वेंकय्या नायडू यांनी सांगितले. मात्र, आपण लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका बजावणार नाही, असे अडवाणी यांनी स्पष्ट केले असून त्यांची ही इच्छा पक्षातील नव्या पिढीतील नेत्यांनी मान्यही केली आहे. आजच्या ‘धक्कादायक’ निकालांनंतर अडवाणी आपल्या ३०, पृथ्वीराज रोड या निवासस्थानातून बाहेरही पडले नाहीत आणि त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या पत्रकारांनाही भेटले नाही. मतमोजणीचे कल उलगडत जात असताना अडवाणी यांचे सांत्वन करण्यासाठी दुपारी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, पक्षप्रवक्ते प्रकाश जावडेकर आणि गुरुमूर्ती त्यांना भेटून गेले. त्यानंतर सायंकाळी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत अडवाणींनी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसह भाग घेऊन राजकीय संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण भाजपनेत्यांनी ‘आग्रह’ करून त्यांना परावृत्त केले. पण सक्रिय राजकारणाला पूर्णविराम देण्याचा त्यांचा विचार नाईलाजाने मान्य करावा लागला. पंधराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषविणार नसल्याचे अडवाणी यांनी आजच्या बैठकीत स्पष्ट केल्याचे पक्षाचे सरचिटणीस अरुण जेटली यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. अडवाणींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते सोडण्याचा इरादा जाहीर केल्यामुळे आता या पदासाठी भाजपमध्ये इच्छुकांचा संघर्ष तीव्र होणार आहे.
पंधराव्या लोकसभेत भाजपचे राज्यसभेतील चार प्रमुख नेते पोहोचले असून त्यात अध्यक्ष राजनाथ सिंह, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते जसवंत सिंह, ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि राज्यसभेतील उपनेत्या सुषमा स्वराज यांचा समावेश आहे. यापैकी कोणाला विरोधी पक्षनेत्याची भूमिका सोपविली जाते यावरून रण माजण्याची शक्यता आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणजे सोळाव्या लोकसभेतील पंतप्रधानपदाचा उमेदवार असा अर्थ होणार असल्यामुळे या चारही नेत्यांमध्ये अडवाणींनी रिक्त केलेले पद पटकाविण्यासाठी जबरदस्त चुरस असेल. त्यातच लोकसभेवर निवडून न येता पक्षाची सूत्रे हाती घेण्याची इच्छा ठेवणारे अरुण जेटली तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर डोळा आहे. त्यामुळे पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षनेतेपद डमी नेत्यापाशी असावे, असाही त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे राजनाथ सिंह किंवा सुषमा स्वराज या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांकडे विरोधी पक्षनेतेपद जाऊ नये व जसवंत सिंह किंवा मुरली मनोहर जोशी यांच्याकडे हे पद जावे, असा त्यांचा प्रयत्न असू शकतो.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी