Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

युतीला पाच आणि आघाडीला तीन जागा
लातूरच्या चुरशीच्या लढतीत आवळे यांनी बाजी मारली
लातूर, १६ मे/वार्ताहर
अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे जयवंतराव आवळे यांनी भारतीय जनता पक्षाचे सुनील गायकवाड यांच्यावर करत ८ हजार १०५ मतांनी मात केली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, संपर्कमंत्री दिलीपराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, अमित देशमुख आदींनी त्यांचे अभिनंदन केले. लातूर मतदारसंघात ८ लाख २९ हजार २२२ (५५.०६ टक्के) मतदान झाले होते. आज मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ते सहाव्या फेरीपर्यंत भा. ज. प.चे सुनील गायकवाड आघाडीवर होते.

अभेद्य बालेकिल्ला
परभणी, १६ मे/वार्ताहर

गद्दारीनंतरही शिवसेनेने परभणी मतदारसंघाचा आपला बालेकिल्ला कायम राखण्यात आज यश मिळविले. शिवसेनेचे उमेदवार गणेश दुधगावकर यांनी तब्बल ३ लाख ८५ हजार ३८७ मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचा पराभव केला. वरपूडकर यांना तीन लाख १९ हजार ९६९ मते मिळाली. दुधगावकर यांनी ६५ हजार ४१८ मते अधिक मिळवून खासदार तुकाराम रेंगे यांना मिळालेल्या मतांचा विक्रमही मोडीत काढला. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील कार्यकर्ते प्रचंड संख्येने आपापल्या वाहनांनिशी आले होते.

खतगावकरांचा दणदणीत विजय
नांदेड, १६ मे/वार्ताहर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आमदार भास्करराव पाटील-खतगावकर ७४ हजार ६१४ मतांनी विजयी झाले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्य़ात कोंडी करण्याचे मनसुबे मतदारांनी उधळून लावल्याने भास्कररावांचा एकतर्फी विजय झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. खतगावकर यांना ३ लाख ४६ हजार ४०० मते मिळाली. भा. ज. प.चे संभाजी पवार यांना २ लाख ७१ हजार ७८६ मते मिळाली.

मतमोजणी
‘खट्टा-मीठा’ मोठा झकास चित्रपट आहे. खूप दिवस पाहायचा राहिला होता. मागच्या आठवडय़ात पाहिला. एक इच्छा अचानक पूर्ण झाली. तसा तो एकदा पाहिला होता. अर्धवटच. त्या पंधरा-वीस मिनिटांमध्येच अशोककुमार आणि कंपनी आवडून गेली होती तेव्हा. त्यालाही दहा र्वष झाली असतील. निवडणुकीचे निकाल होते. बहुतेक लोकसभेच्याच. कार्यालयातील काम संपवून मतमोजणी केंद्रावर गेलो. तिथली मजा पाहायला.

परळी तालुक्यात दिवाळी
परळी वैजनाथ, १६ मे/वार्ताहर

प्रचंड उत्सुकता.. कार्यकर्त्यांसोबतच जनतेचीही उत्सुकता प्रचंड लागलेली अन् गोपीनाथ मुंडे आघाडीवर असल्याची वार्ता धडकली आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी आमदार मुंडे विजयी झाल्याची घोषणा झाली अन् परळी तालुक्याच कानाकोपऱ्यात फटाक्यांची आतीषबाजी सुरू झाली. जनतेने अक्षरश: दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली.

‘हा तर विलासरावांच्या नेतृत्वाचा विजय’
विजयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना - खतगावकर
नांदेड, १६ मे/वार्ताहर

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातून मी एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होईल याची खात्री होती. माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय व विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री अशोक चव्हाणच आहेत, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी दिली.

अंबड शहरात आठ दिवस निर्जळी
अंबड-जालना पालिका आणि जायकवाडी प्रशासनातील थकबाकीचा वाद
अंबड, १६ मे/वार्ताहर
अंबड-जालना संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या शहागड बंधाऱ्यातील पाणी संपल्यामुळे व अंबड व जालना नगरपालिकेकडे जीवन प्राधीकरणाने पाण्याची थकबाकी भरल्याशिवाय जायकवाडी प्रशासन धरणात पाणी सोडत नसल्याने व दुरुस्तीचे काम चालू केल्यामुळे किमान आठ दिवस शहरात निर्जळी राहणार असून, शहराला तीव्र पाणीटंचाईस तोंड द्यावे लागणार आहे.

शिवसैनिकांचा जल्लोष!
औरंगाबाद, १६ मे/प्रतिनिधी

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय निश्चित झाला आणि शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केली. सायंकाळी ५ वाजता गुलालाची उधळण आणि ढोलताशांच्या गजरात संस्थान गणपती येथून खैरे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.दोन्ही बाजूने उभे असलेल्या जनतेच्या उघडय़ा जीपमधून शुभेच्छा स्वीकारीत ही मिरवणूक पुढे सरकत होती. गुलमंडीवर अनेकांनी खैरे यांच्यावर पुष्पवर्षांव केला. आतापर्यंत लढलेल्या निवडणुकीत खैरे कधीच पराभूत झाले नाही.या मिरवणुकीत आमदार सर्वश्री संदीपान भुमरे, अण्णासाहेब माने, नामदेव पवार, किशनचंद तनवाणी, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विकास जैन, जयंत ओक, अनिल पोलकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अतुल सावे, महापौर विजया रहाटकर, माजी महापौर डॉ. भागवत कराड, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, महेश माळवदकर, नंदकुमार घोडेले, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीला आऊलवार, श्रीमती वैजयती खैरे सहभागी झाल्या होत्या.

दानवे यांच्या विजयाचा भोकरदनमध्ये जल्लोष
भोकरदन, १६ मे/वार्ताहर

जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार रावसाहेब दानवे यांचा विजय जाहीर होताच भोकरदनमध्ये मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला. खासदार दानवे यांच्या निवासस्थानी फटाके फोटून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केल्यानंतर त्यांची पत्नी निर्मला दानवे, मुलगा संतोष यांच्या नेतृत्वाखाली विजयी मिरवणूक काढण्यात आली. यात गुलाल उधळीत घोषणा देत मोठय़ा संख्येने नागरिक सहभागीझाले होते.

शिवसैनिकांचा जल्लोष
वसमत, १६ मे/वार्ताहर

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी मताची आघाडी घेताच वसमत शहरात पहिल्या फेरीपासून शिवसैनिकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला. वसमत विधानसभा हा शिवसेनेचा गड आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

निलंग्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
निलंगा, १६ मे/वार्ताहर

लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार जयवंत आवळे हे विजयी झाल्याचे समजताच निलंग्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाकेबाजी करून जल्लोष साजरा केला.या विजयाबबात काँग्रेसचे युवा नेते तथा अंबुलगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर व जि. प. उपाध्यक्ष पंडितराव धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यावर विश्वास व्यक्त करून काँग्रेसने जिल्ह्य़ात, राज्यात, केंद्रात केलेल्या विकास कामाची पावती म्हणून तालुक्यातील व जिल्ह्य़ातील जनतेने कौल दिला आहे. या विजयाबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

पाणीटंचाईत मोफत पाणीपुरवठा करणाऱ्या सरपंच मुलतानी यांचा सत्कार
सिल्लोड, १६ मे/वार्ताहर

तालुक्यातील तांडा बाजार येथील तरुण सरपंच आरेफ मुलतानी यांनी भीषण पाणीटंचाईच्या काळात मोफत पाणीपुरवठा करून सर्व गावाला पाणीपुरवठा केला व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली. यानिमित्ताने तालुका पंचायत समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. भीषण पाणीटंचाईच्या काळात स्वत:च्या शेतातील विहिरीतून गावापर्यंत सव्वादोन किलोमीटर अंतरावर स्वखर्चाने पाईपलाईन करून तसेच स्वत:बरोबर इतर दोघांच्या विहिरींचेही पाणी या विहिरीत टाकून गावाला पाणीटंचाईपासून मुक्त केले. हा उपक्रम स्तुत्य असून सर्व गावांतील सरपंचांनी मुलतांनींचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार सत्कारप्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तेजराव ढगे यांनी काढले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अरुण शिंदे, रामचंद्र मोरे, निजाम पठाण, हलीम देशमुख, नासेर पठाण, बनाबाई इंगळे, रुबिनाबी मुलतानी या पंचायत समिती सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.

‘बुद्धांचा विचारच समृद्धीचा’
लातूर, १६ मे/वार्ताहर

भगवान बृद्धांचा विचार जगाला समृद्ध बनवू शकतो, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांनी केले. वैशाली बुद्धविहार बौद्धनगर लातूर येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त भदंत उपगुप्त महाथेरो यांचे प्रवचन झाले आर. पी. गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘तथागतांच्या धम्मात पौर्णिमेचे महत्त्व’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी त्यांच्या हस्ते झाले.

खंजिराचा धाक दाखवून ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड, १६ मे / वार्ताहर

बहिणीसमवेत मोटारसायकलवर गावी जाणाऱ्या तरुणाला खंजिराचा धाक दाखवून अज्ञात चोरटय़ांनी ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. नांदेड-मुदखेड रस्त्यावर रात्री साडेबारा वाजता ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, मुदखेड तालुक्यातल्या पिंपळकौठा येथील संतोष वरगंडे हे गुरुवारी रात्री आपल्या बहिणीला घेऊन कंधार येथून मोटारसायकलवर गावी जात होते. मध्यरात्री १२.३० वा. अज्ञात चोरटय़ांनी शंकतीर्थ गावाजवळ त्यांची गाडी अडविली. खंजिराचा धाक दाखवून चोरटय़ांनी दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मुदखेड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हर्सूल तलावात युवक बेपत्ता
औरंगाबाद, १६ मे/प्रतिनिधी

हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सुमारे २० वर्षे वयाचा युवक बेपत्ता झाला आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. रात्रीपर्यंत या युवकाचा शोध लागला नव्हता. अग्निशामक दलाचे जवान तलावात शोध घेत होते. त्या युवकाचे नाव समजू शकले नाही. काठावर कपडे काढून तो पोहण्यासाठी गेला होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने त्यांनी आरडाओरड केली. याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात येत होता.

मानसिंग पवार यांचा सत्कार
औरंगाबाद, १६ मे/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अ‍ॅग्रीकल्चर या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मानसिंग पवार यांचा सिडको एन-२ व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रबोधनकार ठाकरेनगर, एस. टी. कॉलनी, महालक्ष्मी चौक, कासलीवाल गार्डन, कामगारचौक या सिडको एन-२ परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापारी संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या वतीने मानसिंग पवार यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. तसेच या निमित्त संघटनेचा वर्धापनदिनही साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, सचिव राजन हौजवाला, जोहेब येवलावाला, अजय शहा, जगन्नाथ काळे, माजी उपमहापौर भगवान घडामोडे आदी उपस्थित होते. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी सर्वाचे स्वागत केले.

उपाहारगृहातील नाश्त्यामुळे १५ कार्यकर्त्यांना विषबाधा
बीड, १६ मे / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी माजलगावहून येत असलेल्या १५ जणांना वडवणी येथील उपाहारगृहामध्ये पुरी-भाजी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली. सर्वानाच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बीड मतदारसंघातील मतमोजणीसाठी माजलगाव येथील २० ते २५ वयोगटातील कार्यकर्ते एका गाडीने बीडकडे येत असताना रस्त्यात वडवणी येथे त्यांनी सकाळी ११ च्या सुमारास जय सोमनाथ उपाहारगृहात पुरी-भाजी खाल्ली. यावेळी अतुल रावसाहेब उगले यांच्या प्लेटमध्ये पालीचे अवशेष आढळले आणि काही वेळात सर्वानाच उलटय़ांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात बबन झोणे, बाळासाहेब तुकाराम साबळे, उद्धव लक्ष्मण देवणे, सुनील प्रल्हाद धोत्रे, विष्णू श्रीकृष्ण भोजने, गणेश आनंदराव निभोळे, विठ्ठल गोविंद तिडके, प्रवीण शिवाजी खुणे, विजय नागुराव दराडे, माणिक गायके व सय्यद शाकेर (सर्व रा. फुलेनगर, माजलगाव) यांचा समावेश आहे.