Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

सुरुवातीच्या पिछाडीनंतर गांधींची वेगाने आगेकूच
नगर, १६ मे/प्रतिनिधी
क्रिकेटच्या ट्वेन्टी-२० सामन्यातील थरार नगर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीने आज अनुभवला. सुरुवातीच्या काही फेऱ्यांत हळूहळू आगेकूच करणारे राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले त्यानंतर प्रत्येक फेरीत वेगाने मागे पडत गेले व अखेरीस भाजपच्या दिलीप गांधी यांनी तब्बल ४६ हजार ७३१ मतांनी बाजी मारली.

वाकचौरे ठरले ‘जायंट किलर’!
नगर, १६ मे/प्रतिनिधी
राजकारणात अलीकडेच प्रवेश करून थेट शिर्डी लोकसभा निवडणुकीत उतरलेले शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे खऱ्या अर्थाने ‘जायंट कीलर’ ठरले! त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रिपाई नेते रामदास आठवले यांचा १ लाख ३२ हजार ७५१ मतांनी दणदणीत पराभव केला. शिर्डी मतदारसंघातील सर्वच तालुक्यांत वाकचौरे यांना मताधिक्य मिळाले. सर्वाधिक मताधिक्य श्रीरामपूरमधून मिळाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी त्यांनी कायम ठेवली.

गांधींच्या ‘कमिटेड’ मतांत आणखी भर!
नगर मतदारसंघ
नगर, १६ मे/प्रतिनिधी
भाजपचे दिलीप गांधी यांनी प्रचारातील पिछाडी थेट मतदानातच भरून काढली. प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत वातावरणनिर्मितीत कमी पडलेल्या गांधी यांची नगर मतदारसंघात ‘कमिटेड’ मते अबाधित राहिली. काँग्रेसचे बंडखोर राजीव राजळे यांची उमेदवारी त्यांना फायद्याची ठरली. मात्र, राजळे यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांना पराभवाचा सामना करावा लागला.

वाकचौरेंच्या विजयाने साखर सम्राटांना धक्का!
शिर्डी मतदारसंघ
श्रीरामपूर, १६ मे/प्रतिनिधी
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपने बाजी मारली. त्यामुळे साखर सम्राटांना मोठा धक्का बसला आहे. नऊ वेळा खासदार झालेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे, त्यांचे चिरंजीव व शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात, तसेच काँग्रेसचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार खासदार रामदास आठवलेंना २५ हजारांपेक्षा अधिक मतांची पिछाडी मिळाली आहे.

छायाचित्रकार


ए कशे सत्तर वर्षांपूर्वी
छायाचित्रणाचा शोध लागला.
विसाव्या शतकात त्याला
‘कला’ म्हणून मान्यता मिळाली
आणि आता तर तो
प्रचंड मोठा उद्योग झाला आहे.

‘आपला माणूस’ म्हणून वाकचौरेंना पसंती
नेवासे
नेवासे, १६ मे/वार्ताहर

‘आपला माणूस’ म्हणून शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केलेला प्रचार नेवासेकरांना चांगलाच भावला. प्रचारात घेतलेली आघाडी मोठय़ा विजयात परावर्तीत करण्यातही त्यांना यश मिळाले. या उलट काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवलेंचा पराभव तालुक्यातील नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा ठरला.

शिवसेनेतील एकजूट वाकचौरेंच्या पथ्यावर
कोपरगाव
कोपरगाव, १६ मे/वार्ताहर

बाहेरून लादलेला उमेदवार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या चर्चेमुळे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, तसेच नेत्यांनी दडपण आणूनही कार्यकर्त्यांची भावना रामदास आठवलेंना विजयी करण्यात कुचकामी ठरली. दुसरीकडे आमदार अशोक काळे यांचे पाठबळ, तसेच सेनेतील अंतर्गत वाद बाजूला ठेवून शिवसैनिकांनी एकजुटीने केलेला प्रचार भाऊसाहेब वाकचौरेंना तालुक्यातून अपेक्षित भरघोस मताधिक्य मिळवून देण्यास पूरक ठरला.

विखेंच्या बालेकिल्ल्यात आठवले पिछाडीवर
राहाता
राहाता, १६ मे/वार्ताहर

अ‍ॅट्रॉसिटीची भीती व बाहेरचा उमेदवार यामुळे मतदारांनी खासदार रामदास आठवले यांना नाकारत शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंना पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते. शिर्डीतून आठवले यांना ३६ हजार ८३०, भाजप-सेनेचे उमेदवार वाकचौरे यांना ६४ हजार ३६७, तर अपक्ष उमेदवार प्रेमानंद रूपवते यांना २ हजार ३१९ मते मिळाली.

वनमंत्र्यांना चपराक!
श्रीगोंदे
श्रीगोंदे, १६ मे/वार्ताहर

भाजप-सेना युतीच्या दिलीप गांधींना श्रीगोंद्यातून १४ हजार मतांची मिळालेली आघाडी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या कारभाराला चपराक आहे. एरवी तालुक्यात विरोधाचे राजकारण करून कार्यकर्ते व मतदारांच्या भावनेशी खेळणाऱ्या व आता एकत्र आलेल्या पाचपुते-नागवडे या द्वयींना मतदारांनी दिलेला हा इशारा आहे.

कर्जतकरांचा दुसऱ्यांदा गांधींच्या विजयाला हातभार
कर्जत
कर्जत, १६ मे/वार्ताहर

भाजपचे दिलीप गांधी यांना तालुक्यातून दुसऱ्यांदा विजयी आघाडी मिळाली. या वेळी सुमारे १० हजार मतांचे अधिक्य देताना तालुक्यातील मतदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या धुरिणांना पुन्हा धक्का दिला. गाडय़ांचा मोठा फौजफाटा, मंत्र्यांसह मान्यवर पुढाऱ्यांची प्रचारात हजेरी अशी तयारी शिवाजी कर्डिले यांच्या दिमतीला होती, तर दुसरीकडे कोणताही गाजावाजा नाही, तुरळक गाडय़ा, परंतु तळमळीने प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची रसद युतीच्या दिमतीला होती.

नगर शहरातील अर्धी मते गांधींच्या पारडय़ात
नगर
नगर, १६ मे/प्रतिनिधी

नगर शहर कोणाचे? तर भाजप-सेनेचे! गेली २० वर्षे प्रत्येक निवडणुकीत मतपेटीतून हेच एकमेव उत्तर येते. शहरात जसा गेल्या २० वर्षांत फारसा बदल झालेला नाही, तसाच या उत्तरातही झालेला नाही! गांधी यांना शहर विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या तब्बल १८ हजार १०६ मतांच्या आघाडीने तेच सिद्ध केले.

अकोल्याच्या भूमिपुत्राने घडविला इतिहास
अकोले
अकोले, १६ मे/वार्ताहर

अकोल्याच्या भूमिपुत्राने आज इतिहास घडविला. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयामुळे अकोल्याचा माणूस इतिहासात प्रथमच दिल्लीत पोहोचला आहे. त्यांच्या विजयात अकोलेकरांचा मोठा वाटा आहे. आपल्या माणसाला मात्र आघाडी देण्यात अकोलेकर काहीसे मागे पडण्याचे चित्र आहे.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही वाकचौरेंची मुसंडी
संगमनेर
संगमनेर, १६ मे/वार्ताहर

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर मतदारसंघात अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा प्रभावी ठरल्याने आघाडीचे उमेदवार रामदास आठवले पिछाडीवर गेले. मतदारांनी सेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना भरभरून मते दिली. अपक्ष प्रेमानंद रूपवते यांनाही अपेक्षित मते मिळाली नाहीत.

होमग्राऊंडमध्ये राजळेंना अल्प आघाडी
पाथर्डी
पाथर्डी, १६ मे/वार्ताहर

अपक्ष राजीव राजळे यांना होमग्राऊंडवर केवळ १५ हजारांचे मताधिक्य मिळू शकले. भक्कम आघाडीबाबत मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. भाजपचे दिलीप गांधी त्यांची मोठी आघाडी रोखण्यात यशस्वी ठरले.

गांधींना मताधिक्य देऊन ‘बालेकिल्ल्या’वर मोहोर!
जामखेड
जामखेड, १६ मे/वार्ताहर
दिलीप गांधींना तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यावरून भाजपचा बालेकिल्ला म्हणून जामखेडने पुन्हा मोहोर उमठविली. राष्ट्रीय नेत्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वानी प्रचारास हजेरी लावूनही मतदारांचे मतपरिवर्तन घडविण्यात काँग्रेस आघाडीला अपयश आले.

नगर तालुक्याकडून कर्डिलेंचा अपेक्षाभंग
नगर तालुका
नगर, १६ मे/वार्ताहर

माजी खासदार दादापाटील शेळके यांची साथ मिळूनही राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना नगर तालुक्यात केवळ १० ते १२ हजारांची आघाडी मिळाली. आघाडीबाबत अपेक्षाभंग झाल्याने कर्डिलेंना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी तालुक्यातून चांगली मते खेचली.

स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे - काळे
नगर, १६ मे/प्रतिनिधी

कुटुंबात किंवा समाजात स्त्रियांनी आपले कर्तृत्व दाखवून आपली प्रतिमा उज्ज्वल करावी. सासूच्या भूमिकेत गेल्यावर मुलाला व सुनेला स्वातंत्र्य देऊन समाजातील गरजू, गरीब मुलांना आईचे प्रेम द्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक वैजयंती काळे यांनी केले. जिल्हा वाचनालयाने आयोजिलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कोणत्याही शहराची समृद्धी चार गोष्टींवर अवलंबून असते, असे सांगून श्रीमती काळे म्हणाल्या की, समृद्ध वाचनालय, वस्तूसंग्रहालय, रंगभूमी व आर्ट गॅलरी या चार गोष्टींमुळे शहराची समृद्धी समजते. या चारही गोष्टी नगरच्या वैभवात भर घालणाऱ्या आहेत. आजच्या स्त्रीपुढे स्वतचेच आव्हान आहे. स्त्रीला जर प्रगती करायची असेल, तर तिला भोवतालच्या जगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सेतू कार्यालयातून विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यास सुरुवात
नगर, १६ मे/प्रतिनिधी
तहसील कार्यालयातील सेतू विभागात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. दहावी व बारावीच्या निकालापूर्वी विद्यार्थी व पालकांनी दाखले घेऊन जाण्याचे आवाहन सेतू विभागाचे संचालक सुनील लांगोरे व पाराजी चितळकर यांनी केले आहे. पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना जातीचा, नॉन क्रिमिलेअर, उत्पन्नाचा व रहिवासी दाखले जोडणे बंधनकारक असते. निकालानंतर या दाखल्यांसाठी सेतू कार्यालयात गर्दी होऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

एसटीच्या चाकाखाली सापडल्याने महिला जखमी
कोपरगाव, १६ मे/वार्ताहर
कोपरगाव आगारातून सांगवी भुसारकडे जात असलेल्या एसटी (एमएच १२ एक्यू ८१४४) आवाराबाहेरील वळणावर असताना शीलाबाई भाऊसाहेब काजळे (वय ५०, रा. कान्हेगाव) ही महिला बसच्या पुढील चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने डॉ. उंबरकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिर्डीतील रुग्णालयात हलवण्यात आले. ही बस चालक सादिक शेख चालवत होते. आगारप्रमुख रामदास व्यवहारे यांनी घटनास्थळी भेट दिली. हा अपघात संध्याकाळी ६.१५ला झाला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी बसच्या काचा फोडल्या.

नेत्यांची एकजूट होऊनही कर्डिलेंना माफक अधिक्य
राहुरी, १६ मे/वार्ताहर
तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ, माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी एकत्र येऊनही शिवाजी कर्डिले यांना तालुक्यात अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. प्रचारात कर्डिलेंनी आघाडी घेतली असली, तरी मतदानात मात्र दिलीप गांधींनी त्यांना चांगलेच झुंजविले. भाजपचे नेते आसाराम ढूस, मोरेश्वर उपाध्ये, माजी शहराध्यक्ष प्रकाश पारख, संभाजी तनपुरे, प्रमोद सुराणा, शहराध्यक्ष बापूसाहेब वराळे, रामदास धुमाळ यांच्या गटाचे नगरसेवक सुभाष वराळे आदींनी गांधी यांचा प्रचाराचा किल्ला लढविला. धुमाळ व तनपुरे एकत्र येऊनही मतदारांनी मात्र विरोधात कौल दिल्याचे दिसून आले. चंद्रशेखर कदम यांच्या विरोधात पक्षातीलच एक गट गांधी यांच्यासाठी प्रथमपासूनच कार्यरत होता.

पराभव झाला तरी राजकारणात सक्रिय राहू - राजीव राजळे
नगर, १६ मे/प्रतिनिधी

पराभव झाला तरी राजकारणात आपण सक्रिय राहणार आहोत. या निवडणुकीत जनतेने मला स्वीकारले नाही एवढेच, अशी प्रतिक्रिया नगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार राजीव राजळे यांनी व्यक्त केली. पराभव मला मान्य आहे. जनतेने दिलेला तो कौल आहे. निवडणुकीनंतरही आपण जनतेची कामे चालूच ठेवणार आहोत. पराभवाचा बाऊ न करता काँग्रेसचे गट सक्रिय ठेवणार आहोत. ज्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यांच्यासाठी आपण काम करू, त्यांच्यामागे उभे राहू, असे राजळे म्हणाले. निकालानंतर आमदार राजळे यांच्या निवासस्थानी ठिकठिकाणचे कार्यकर्ते भेटण्यासाठी येत होते. मतदारसंघनिहाय मतांची चर्चा त्यांच्यात सुरू होती.