Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

उरण परिसरात यापुढे पक्षीदर्शन दुर्लभ
मधुकर ठाकूर

विश्वात निसर्ग, प्राणी, पक्षी यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. त्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक योजना राबवून कित्येक अब्ज खर्च केले जातात, मात्र याला जेएनपीटी अपवाद असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. कारण चौथ्या बंदराच्या आणि जेएनपीटी सेझच्या उभारणीसाठी सुमारे १५०० एकर खाडी परिसरात मोठय़ा प्रमाणात माती-दगडाचे भराव करण्यास सुरुवात केली आहे. विकासाच्या नावाने सुरू असलेल्या भरावाच्या कामामुळे मात्र पक्ष्यांसाठी असलेली आश्रयस्थाने नष्ट होऊ लागली आहेत. याचे भान जेएनपीटीसह पर्यावरणवादी व पक्षीप्रेमींनाही राहिले नसल्याचे दिसते.
जेएनपीटी परिसरातील फुंडे हायस्कूल, पाणजे-डोंगरी, न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील परिसर, पोर्ट युजर बिल्डिंगच्या सभोवार परिसर म्हणजे विविध पक्ष्यांची आश्रयस्थाने आहेत. जेएनपीटी परिसरातील विस्तीर्ण जलाशये व खाडय़ा पावसाळी हंगामानंतर विविध जातींच्या व विविध रंगांच्या आकर्षक पक्ष्यांनी अक्षरश: नेहमीच गजबजून जातात. विविध गणांतील पेलिकन, उघडय़ा चोचींचा करकोचा, स्नेक बर्ड, वंचक, रंगीत करकोचा, मोठा करकोचा, पाणकोंबडी, पट्टय़ांचा हंस, कलहंस, रानटी बदक, काणूक, तिरंदाज, सारस, छोटा मराल, राखी बदक, डॅबचिक आदी अनेक प्रकारच्या जलचर पक्ष्यांबरोबर स्थलांतरित रोहित पक्षीही मोठय़ा प्रमाणात या भागात जूनपर्यंत वास्तव्यास असतात. जेएनपीटी परिसरातील विस्तीर्ण जलाशये, खाडय़ा व समुद्रकिनाऱ्यावर जलचर पक्ष्यांना लागणारे शेवाळ, खुवे, शिंपले, मासे, जीवजंतू आदी खाद्य विपुल प्रमाणात मिळते. यामुळे विविध जातीच्या हजारो पक्ष्यांची रेलचेल नेहमीच या परिसरात असते. दरवर्षी स्थलांतरित रोहित पक्षी व इतर आकर्षक रंगीबेरंगी पक्ष्यांच्या मोहक हालचाली कॅमेऱ्याद्वारे टिपण्यासाठी आणि पक्ष्यांचे निरीक्षण करून आकर्षक पक्ष्यांच्या सान्निध्यात आनंद लुटण्यासाठी दूरदूरहून पक्षीप्रेमी तासन्तास परिसरात डेरा टाकून असतात.

हो जाये दुध का दुध और पानी का पानी..
जयेश सामंत

बाबांनो मी तुमच्या पाया पडतो. पावसाळा तोंडावर आलाय, आता तरी रस्त्यांची खोदकामे थांबवा. जरा लोकांचा विचार करा. तुम्ही रस्ते खोदायचे आणि आम्ही ते बुजवायचे. आतापर्यंत ठीक होते, पण पावसाळ्यात हे सहन करण्यापलीकडे आहे. ही प्रतिक्रिया एखाद्या सर्वसामान्य नागरिकाची आहे, असे आपणाला वाटेल. मात्र ही वक्तव्यं आहेत ती खुद्द नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नाहटा यांची. पावासाळ्यात अतिवृष्टी झाल्यास शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी गेल्या आठवडय़ात बोलावलेल्या एका बैठकीत एमटीएनएल, एमएसईबी, महानगर गॅस यांसारख्या निमशासकीय संस्थांच्या अधिकाऱ्यांची उत्तरे ऐकून आयुक्तही काहीसे हतबल झालेले दिसले. १५ मेपर्यंत शहरातील एकही रस्ता कोणत्याही कारणास्तव खोदलेला मला चालणार नाही, असा आक्रमकपणाही आयुक्तांनी या बैठकीच्या उत्तरार्धात दाखविला खरा, त्यामुळे युद्धपातळीवर बोलावण्यात आलेली ही बैठक खऱ्या अर्थाने लक्षवेधी अशीच ठरली. २६ जुलैच्या धसक्यानंतर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था आता पूर्वीपेक्षा सजग झालेल्या आपल्या नजरेस येते. नवी मुंबई हे मुंबई, ठाण्याप्रमाणे वसलेले शहर नाही. सिडकोने या शहराचा अगदी नियोजनबद्धरीत्या विकास केला आहे. मुंबईप्रमाणे नवी मुंबईदेखील समुद्रसपाटीखाली वसलेले शहर आहे. या शहराच्या प्रत्येक उपनगराला खाडीकिनारा लाभला आहे.