Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

मनसे फॅक्टरचा युतीला काही प्रमाणात फटका बसणार हे सर्वच राजकीय धुरीणांनी जवळपास गृहीत धरले होते, पण लोकसभेच्या पटलावर मुंबईतून शिवसेनेचा एकही उमेदवार जाऊ शकणार नाही, असे कुणालाही वाटले नव्हते. अगदी स्पष्टच सांगायचे झाले तर सहाही जागा गमाविलेल्या शिवसेनेची मुंबईतून काँग्रेसने जवळपास हकलपट्टीच केली आहे. केवळ मनसेच्या करिष्म्यामुळेच हे शक्य झाल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेचा कैवार घेणाऱ्या मनसेच्या पारडय़ात तरूणांनी भरभरून मते टाकल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट होत आहे. मनसेला लोकसभेत खाते उघडता आले नसले तरी सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना अ‍ॅडव्हान्टेज असेल. हाच या निकालाचा अन्वयार्थ आहे.

देवाचा धावा करणाऱ्या रावले यांचा त्रिफळा
प्रसाद रावकर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवार सकाळपासूनच ठिय्या मांडला होता. मतमोजणी जसजशी पुढे सरकत होती, तसतशी पिछाडीवर असलेल्या उमेदवारांची घालमेल होत होती, तर आघाडीवरील उमेदवार आपण पाठी पडणार नाही ना या काळजीत होते. निवडणुकीच्या निकालाचा कानोसा घेण्यासाठी मुंबईकर सकाळपासूनच टीव्हीसमोर बसले होते आणि निरनिराळ्या वृत्तवाहिन्यावरील चर्चेचा आढावा घेत होते. मात्र याच वेळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार देव दर्शनात व्यस्त होते.

प्रतिनिधी
वेळ दुपारी साडेबाराची.. वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज झळकू लागल्या.. भाजपचे राम नाईक अडचणीत.. सेनेचे दक्षिण मुंबईतील शिलेदार मोहन रावलेंची तिसऱ्या क्रमांकावर घसरण.. गजाजन कीर्तिकरांचा गुरूदास कामतांनी पत्ता कापला.. मनसेच्या धक्क्याने सेना-भाजप युतीचा धुव्वा.. अशा प्रकारे टीव्ही वाहिन्यांवरून झळकणाऱ्या बातम्यांतून दुपारी एकपर्यंत मुंबईतील जवळपास सर्वच्या सर्व सहा जागांचे चित्र स्पष्ट झाले.. केवळ विजयाच्या घोषणेचा सोपस्कार होणे शिल्लक होते.. अखेर अडीच वाजता ‘मनसे’ कृपेमुळे मुंबईतल्या सहाही जागा काँग्रेसच्या खिशात गेल्याचे जाहीर झाले.. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाईल? कुणाच्या पारडय़ात मतदारराजा सत्तेचे दान टाकेल?याबद्दल आज सकाळी आठपर्यंत म्हणजेच प्रत्यक्ष निकालांची आकडेवारी वृत्तवाहिन्यांवर झळकेपर्यंत कुणीही सांगू शकत नव्हते. प्रचाराला सुरूवात झाल्यापासूनच धास्तावलेल्या उमेदवारांची परिस्थिती आज सकाळी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत आणखी बिघडली होती.

नव्या ‘विक्रम वेताळ’ची जादू चालेल ?
लहानपणी चांदोबा पुस्तकात वाचलेल्या विक्रम आणि वेताळाच्या गोष्टी आता दूरचित्रवाणी विश्वात विविध वाहिन्यांवरून निरनिराळ्या मालिकांच्या रूपात वेळोवेळी प्रसारीत होत असतात. ‘कलर्स’ वाहिनीवर आजपासून सुरू होणाऱ्या ‘कहानियाँ विक्रम वेताळकी’ या मालिकेचे ‘प्रोमो’ गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय बनले आहेत. सागर प्रॉडक्शनने मालिकेच्या जुन्याच कथानकांना ‘सीजीआय’(कम्प्युटर जनरेटेड इमेजरी) तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे नव्या अवतारात आणले आहे. नवीन कलाकार, खऱ्याखुऱ्याचा आभास निर्माण करणारे स्पेशल इफेक्ट्स, असे नव्या ‘वेष्टना’तील विक्रम वेताळ आजच्या पिढीला आपले वाटतील का, याचे उत्तर येत्या काही दिवसांतच उलगडणार आहे..

विकतचा उपदेश!
हे करा, ते करू नका, हा बदल घडला पाहिजे, तो तुम्ही घडवला पाहिजे वगैरे चर्चा महाविद्यालयीन पातळीवरील वादविवाद, निबंध स्पर्धा इत्यादी ठिकाणी होतच असतात. चित्रपटातून ‘युवा शक्ती’ दाखवायची असेल तर तगडी पटकथा, तरुणाच्या मनात असलेल्या भावना प्रकट करणाऱ्या व्यक्तिरेखा हव्यात. यापूर्वी आलेल्या ‘युवा’, ‘लक्ष्य’, ‘रंग दे बसंती’ या चित्रपटांमध्ये हे पाहिले आहे. ‘बेधुंद’मधील ‘युवा शक्ती’ मात्र शाब्दिक चर्चामध्ये खर्ची घातली आहे. प्रत्यक्षात त्या शक्तीचे प्रदर्शन केवळ २० टक्केच दिसले आहे. त्यामुळे ‘बेधुंद’ चित्रपट हा प्रेक्षकांसाठी ‘विकतचा उपदेश’ ठरतो.

‘प्यार किया तो डरना क्या?’
‘मुगल-ए-आझम’चं भन्नाट विडंबन

गेल्या काही वर्षांत मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकांचं पेव फुटलेलं असलं तरी खऱ्या अर्थानं उत्तम विनोदी नाटक मात्र एकही आलेलं नाही. ‘वस्त्रहरण’ आणि ‘यदा कदाचित’सारख्या अफलातून पौराणिक देशी फार्सनंतर त्या तोडीचं किंवा किमान त्याच्या जवळपास जाऊ शकेल असं कुठलंच नाटक आलेलं नाही. हा प्रदीर्घ दुष्काळ आता संपलेला आहे. राजेश मुंढे लिखित, प्रियदर्शन जाधव रंगावृत्तीत आणि दिग्दर्शित ‘प्यार किया तो डरना क्या!’ हे नवं नाटक ऐतिहासिक विडंबनाचा अस्सल नजराणा घेऊन रसिकांच्या भेटीला आलेलं आहे. ‘मुगल-ए-आझम’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचं कोळी बोलीतील भन्नाट विडंबन या नाटकात आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दस्तावेजीकरण!
गोवा आणि मुंबईचे हवाई चित्रण करणारी दोन पुस्तके, पोर्ट्रेट ऑफ इंडियाज लाईट हाऊसेस हे भारतातील दीपगृहांचे चित्रण करणारे पुस्तक अशी काही गाजलेली पुस्तके गाठीशी असलेले हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे यांचे ‘गॉडेस महालक्ष्मी टेम्पल अ‍ॅट कोल्हापूर शक्तीपीठ’ हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची सचित्र माहिती देणारे नवेकोरे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले. सिद्धीशक्ती पब्लिकेशनने हे १०९ पानी पुस्तक प्रकाशित केले आहे. खरे तर हे पूर्णपणे रंगीत असे कॉफीटेबल बूक आहे.

‘चिन्ह’चे दृश्यरुप आणि मी
चित्रकलेविषयी समीक्षात्मक लिखाणाची नवी दृष्टी देणाऱ्या ‘चिन्ह’ या नियतकालिकातील काही लक्षणीय लेखांच्या ‘निवडक चिन्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार १९ मे रोजी होणार आहे. या पुस्तकातील सुप्रसिद्ध चित्रकार दत्ता पाडेकर यांच्या लेखातील हा काही भाग.. ‘चिन्ह’शी माझं नातं जुळलंय ते गेली वीस र्वष.. ‘निवडक चिन्ह’च्या या अंकाचं मुखपृष्ठ करताना अजूनही जाणवतं की, आजही प्रत्येक वेळेस तेवढीच उत्सुकता असते, तेवढंच चॅलेंज असतं, जेवढं ते एकोणीस- वीस वर्षांपूर्वी होतं. सतीशनं पहिल्यांदा मला चित्रकलेच्या अंकाची कल्पना सांगितली तेव्हा मी इतर कुठलाही विचार न करता त्याला होकार दिला.

सन्नाटा@शिवसेना भवन
कैलास कोरडे

देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी असताना दादर येथील शिवसेना भवन कार्यालयात मात्र सन्नाटा आढळला. कार्यकर्त्यांऐवजी तिथे पोलिसांचा ताफाच आढळला. शिवसेना भवनात तेथील कर्मचारी निकालाचा अंदाज घेत असताना दिसले. उमेदवारांचे विजय, पराजय यावर खमंग चर्चा त्यांच्याकडून ऐकण्यास मिळाली. तशीच परिस्थिती मनसेच्या राजगड कार्यालयात तर राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी होती.

बाजी पालटली..
बंधुराज लोणे

गोरेगाव येथील मतदान मोजणी केंद्रावर भाजपचे राम नाईक, काँग्रेसचे संजय निरुपम सकाळीच पोहोचले. थोडय़ा वेळाने गुरुदास कामत पत्नी आणि मुलासोबत या ठिकाणी आले. पहिल्या फेरीचा कल येण्यास थोडा उशीर झाला होता. मात्र वायव्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कामत पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. कामत यांनी ही आघाडी शेवटपर्यंत कामय ठेवली. राम नाईक सुरुवातीला पुढे होते. मात्र दुपारी बारानंतर संजय निरुपम यांनी नाईकांना मागे टाकले. या दोघांत कधी हा पुढे तर कधी तो असा खेळ शेवटपर्यंत सुरू होता. मात्र अखेर निरुपम यांनी बाजी मारली.