Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

क्रीडा

मुंबई इंडियन्स ‘आऊट’
पोर्ट एलिझाबेथ, १६ मे/पीटीआय

मॅथ्यू हेडन याने केलेल्या शैलीदार व नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सात विकेट आणि पाच चेंडू राखून पराभव करून उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. तथापि, इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामातही मुंबई इंडियन्सवर साखळीतच आव्हान संपुष्टात होण्याची नामुष्की ओढवली आहे. विजयासाठी चेन्नईपुढे १४८ धावांचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी नियोजनबद्ध खेळाच्या जोरावर पार केले. मात्र त्यासाठी त्यांना शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली.

डेक्कन फुल चार्ज!
जोहान्सबर्ग, १६ मे/पीटीआय

अखेरच्या षटकात २१ धावा फटकावण्याचे शिवधनुष्य रोहित शर्माने लीलया पेलल्यामुळे डेक्कन चार्जर्सने कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान सहा विकेटस् राखून पार केले आणि आयपीएल क्रिकेट स्पध्रेच्या उपान्त्य फेरीतील स्थानाकडे आगेकूच केली. मश्रफी मोर्तझाच्या अखेरच्या षटकात रोहितने वेणूगोपालच्या साथीने २६ धावा कुटल्या आणि डेक्कन चार्जर्सची तीन पराभवांची मालिका खंडित केली. रोहितने तीन चौकार आणि दोन षटकारांसह फक्त १३ चेंडूंत ३२ धावा केल्या.

पंजाबचा पंच
ब्लोम्फोनटेन, १६ मे/ वृत्तसंस्था

उपान्त्य फेरीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून पराभूत करीत जोरदार ‘पंच’ लगावला आहे. वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अवघ्या १५ धावांत तीन बळी घेत दिल्लीचे कबंरडे मोडले.

उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी राजस्थानला हवी‘रॉयल व्हिक्टरी’
आज गाठ दिल्ली डेअरडेव्हिल्सशी
ब्लोएमफोन्टीन, १६ मे / पीटीआय
मुंबई इंडियन्सविरुद्ध ‘मंत्र’मुग्ध करणारा विजय संपादन केल्यावर आत्मविश्वास दुणावलेला गतविजेता राजस्थान रॉयल्सचा संघ उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत उद्या डेक्कन डेअरडेव्हिल्सला नामोहरम करण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिल्लीनंतर डेक्कनवर स्वारी करायला पंजाब सज्ज
जोहान्सबर्ग, १६ मे/ पीटीआय

उपान्त्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न उराशी बाळगून उर्वरित सर्व सामने जिंकायला निघालेला युवराज सिंगचा किंग्ज इलेव्हन पंजाब दमदार घौडदौड करीत आहे. शक्रवारी अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केल्यानंतर उद्याच्या सामन्यात डेक्कन चार्जर्सवर स्वारी करण्यासाठी पंजाब सज्ज झालेला दिसत आहे.

युवराज को गुस्सा क्यों आता है!
ब्लोमफाऊंटन, १६ मे/पीटीआय

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली डेअर डेव्हिल्सवर विजय मिळविल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार युवराजसिंग निश्चिंत असला तरी जेव्हा आपला संघ चांगली कामगिरी करत नाही हे पाहिल्यावर आपला पारा लगेचच चढतो, हे तो स्वत:च मान्य करतो. युवराज म्हणाला की, माझ्याकडून असे नकळत घडते. असे का होते हे मला माहीत नाही. दिल्ली डेअर डेव्हिल्सवर किंग्ज इलेव्हन पंजाबने सहा गडी राखून विजय मिळविल्यानंतर युवराज पत्रकारांशी बोलत होता. या विजयामुळे आयपीएल स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात प्रवेश मिळविण्याच्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आशा टिकून आहेत.

टोटल कप क्रिकेट : अमूल्य पांद्रेकर, ऋषी आरोठे चमकले
मुंबई, १६ मे / क्री. प्र.

टोटल कप (१४ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेतील दोन्ही लढतीत पहिला डावही पूर्ण न झाल्याने अनिर्णीत राहिल्या. गोवा संघाने आज उपाहारापर्यंत फलंदाजी करून ३०० धावांची मजल मारली. अमूल्य पांद्रेकर (४८) आणि नीरज यादव (नाबाद ३८) यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेली ८० धावांची भागीदारी या लढतीत विशेष ठरली.

प्रतिस्पध्र्याची दाणादाण उडविणे हेच माझे ध्येय -ब्रेट ली
ब्लोएमफोन्तेन, १६ मे/पीटीआय

बाद फेरीसाठी विजय अनिवार्य असताना प्रतिस्पध्र्याची दाणादाण उडविणे हेच माझे ध्येय होते असे किंग्ज पंजाब इलेव्हनच्या विजयाचा शिल्पकार ब्रेट ली याने येथे सांगितले. किंग्ज पंजाब संघाने काल दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला. या सामन्यात ब्रेट ली याने सामन्याचा मानकरी पारितोषिक पटकाविले. या सामन्यात त्याने अचूक दिशा व टप्पा ठेवीत प्रभावी कामगिरी केली. या कामगिरीविषयी त्याने समाधान व्यक्त केले. आम्ही या सामन्यात चांगली सांघिक कामगिरी केली त्यामुळेच आम्ही विजय मिळवू शकलो असे सांगून ली म्हणाला, चार षटकांत प्रतिस्पर्धी संघातील महत्त्वाचे मोहरे बाद करायचे हेच माझे ध्येय होते आणि ते मी साध्य केले. दिल्लीस मर्यादित धावसंख्येत रोखून ठेवल्यानंतर आमच्या फलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडली. आमच्या संघातील अन्य गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. खेळपट्टीवर चेंडू हळू येत होता, मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी केलेल्या चुका आमच्या फलंदाजांनी टाळल्या यामुळे आम्ही नियोजनपूर्वक विजय मिळवू शकलो असेही ब्रेट ली याने सांगितले.

पराभवाने मनोधैर्य खचलेले नाही- सेहवाग
ब्लोम्फोन्टेन, १६ मे / पीटीआय

किंग्ज इलेव्हन पंजाबने अव्वल स्थानावरील दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केले असले तरी यामुळे संघाचे मनोधैर्य खचलेले नाही, असे मत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे. मला असे वाटत नाही की, या पराभवाने संघातील खेळाडू खचून जातील. यंदाच्या हंगामात उपान्त्य फेरीत जागा मिळवणारा आमचा संघ पहिला आहे. त्यामुळे या पराभवाचा स्पर्धेतील आव्हानावर काहीही परिणाम होणार नाही. पण पराभवाची कारणे मात्र आम्हाला शोधावी लागतील, असे सेहवागने सांगितले. तो पुढे म्हणाला की, हा पराभव नक्कीच जिव्हारी लागणारा आहे. जर आम्ही याच पद्धतीने सामने गमवायला लागलो तर यापुढे स्पर्धा आम्हाला अधिकाधिक कठीण होऊ शकते. गोलंदाजांमुळे सामना गमवावा लागला का, असे विचारल्यावर सेहवाग म्हणाला की, आशिष नेहरा आणि डर्क नॅन्स हे चांगली कामगिरी करीतच आहेत. त्याचबरोबर रजत भटिया, प्रदिप सांगवान आणि तिलकरत्ने दिलशान हे सुद्धा त्यांना सुयोग्य साथ देत असल्याने गोलंदाजीत आम्ही कमी पडलो असे मी म्हणणार नाही.

निमंत्रित हॉकी स्पर्धा; पिल्ले अकादमी व ओरिसा यांच्यात अंतिम लढत
पुणे, १६ मे/प्रतिनिधी

राजेश पिल्ले अकादमीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय निमंत्रित हॉकी स्पर्धेत विक्रम पिल्ले अकादमी व ओरिसा इलेव्हन यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विक्रम पिल्ले अकादमीने मध्यंतरास ०-१ अशा पिछाडीवरून पुणे शहर पोलीस संघाचे आव्हान ३-२ असे संपुष्टात आणले. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीतही ओरिसा इलेव्हन संघाने ०-१ अशा पिछाडीवरून बेळगावच्या मराठा लाईट इन्फन्ट्री ‘अ’ संघाला २-१ असे हरविले. पिल्ले अकादमीविरुद्ध पोलीस संघाने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. त्यांचा हा गोल विनोद मानगुडे याने ३० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा केला. मात्र उत्तरार्धात पिल्ले अकादमीच्या विनोद पिल्ले याने सामन्याच्या ४० व्या मिनिटाला एन.राजेंद्र याच्या पासवर गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली.

मुष्टियुध्द : भारताला तीन कांस्य पदके
नवी दिल्ली, १६ मे/पीटीआय

चेक प्रजासत्ताकातील उस्तीनाद लॅबेम येथील युरोपियन ग्रां. प्रि. बॉक्सिंग स्पर्धेत भारताने तीन कास्यपदकांची कमाई केली आहे. विजेंदरपाठोपाठ आज मनोज कुमार आणि जय भगवान या दोघांनाही उपान्त्य फेरीत पराभूत झाल्याने कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. जय भगवानला लाइटवेट (६० किलो) गटात आर्यलडच्या एरिक डोनोवानविरुद्ध २-५ असा पराभवाचा सामना करावा लागला. लाइट वेल्टर गटातील राष्ट्रीय विजेता असणाऱ्या मनोज कुमारलाही आर्यलडच्याच फिलिप सप्लीसी याच्याकडून ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला. तत्पूर्वी ऑलिम्पिक कास्यपदकविजेत्या विजेंदर यालाही उपान्त्य फेरीत पराभवाचा धक्का बसून त्यालाही कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. भारतातर्फे केवळ सुरनजय सिंग यानेच ५१ किलो गटात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

भारतीय मुष्टियोद्धय़ांच्या संघास मायदेशी परतण्यात अडचणी
नवी दिल्ली, १६ मे/पीटीआय

बीजिंग ऑलिंपिक स्पर्धामध्ये उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारा भारताचा मुष्टियोद्धा जितंदर कुमार याच्यासह कझाकस्तान येथील अल्माटी येथे गेलेल्या भारतीय मुष्टियोद्धय़ांच्या संघास नोंदणीप्रक्रियेतील विलंबामुळे ताटकळत राहावे लागले. प्रशिक्षण आणि स्पर्धासाठी दहा जणांचा हा संघ कझाकस्तानला गेला आहे. प्रशिक्षक जयदेव बिश्त यांच्याबरोबर कझाकस्तानला गेलेला हा संघ मंगळवापर्यंत मायदेशी परतण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारताला एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदके मिळाली आहेत.

आशियाई वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी
नवी दिल्ली, १६ मे/पीटीआय

कझाकस्तानमधील ताल्दीकोर्गान येथे पार पडलेल्या आशियाई वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय खेळाडू पदक जिंकण्यास अपयशी ठरले असले तरी भारताला महिला गटात चौथे आणि पुरुष गटात पाचवे स्थान मिळाले. मागील वर्षी जपानमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला एक रौप्य व दोन कांस्यपदके मिळाली होती. यंदा भारताने या स्पर्धेसाठी सात महिला आणि आठ पुरुष खेळाडूंचे पथक पाठविले असून, भारताला एकही पदक मिळविता आले नाही. यंदाच्या स्पर्धेत सोनिया चानूने उत्कृष्ट कामगिरी केली. ४८ किलो गटात एकूण १६७ किलो वजन उचलून तिने चौथा क्रमांक मिळविला. २००४ व २००५ च्या स्पर्धामध्ये पदक जिंकणाऱ्या गीता राणीने ७५ किलोपेक्षा जास्त वजन गटात सहावा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत इराणचा संघ ५८३ गुण मिळवून विजयी ठरला. इराणने या स्पर्धेत एकूण १५ पदके मिळविली. पदकतालिकेत यजमान कझाकस्तान दुसऱ्या, तर चीन तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

अ‍ॅन्डरसनने उडविली विडिजची भंबेरी
चेस्टरले स्ट्रीट, १६ मे/ पीटीआय
सलामीवीर अ‍ॅलिस्टर कूक आणि रवी बोपारा यांच्या शतकानंतर पॉल कॉलिंगवूड आणि यष्टिरक्षक मॅट प्रायर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सहा विकेट्सच्या मोबदल्यात ५६९ धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅन्डरसनने वेस्ट इंडिजचे तीन विकेट घेत त्यांची भंबेरी उडविली आणि इंग्लंडला सामन्यावर पकड मिळवून दिली. दोन वेळा अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे तर एकदा पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. दिवसअखेर वेस्ट इंडिजची ३ बाद ९४ अशी अवस्था होती आणि रामनरेश सारवान (नाबाद ४१) आणि शिवनारायण चंदरपॉल (नाबाद ३) हे खेळत होते. सामन्याच्या सुरुवातीलाच गुरुवारी नाइट वॉचमन म्हणून आलेला जेम्स अ‍ॅन्डरसन बाद झाला. तर पहिल्या दिवशी शतक झळकाविलेला अ‍ॅलिस्टर कूकही (१६०) द्विशतकी खेळी साकारू शकला नाही, त्याला सुलेमान बेनने बाद केले. त्यानंतर लगेचच केव्हिन पीटरसनही (१४) बाद झाल्याने इंग्लंडचा संघ आता पाचशे धावांचा टप्पा गाठणार नाही असे वाटत होते. पण त्यानंतर पॉल कॉलिंगवूड (नाबाद ६०) आणि मॅट प्रायर (६३) यांनी सहाव्या विकेटसाठी ९५ धावांची भागी रचली. वेस्ट इंडिजची पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. ख्रिस गेल (१८) , ड्वेन स्मिथ (७) आणि लेन्डल सिमोन्स (८) यांना अ‍ॅन्डरसनने तंबूत धाडले.

सानिया-चुआंग जोडीचे आव्हान संपुष्टात
माद्रिद टेनिस स्पर्धा
माद्रिद, १६ मे/पीटीआय

भारताच्या सानिया मिर्झा व चीन तैपेईची चाई जुंग चुआंग यांना माद्रिद टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत चुरशीच्या लढतीनंतर उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. मिर्झा व चुआंग यांना तृतीय मानांकित क्वेटा पेश्को व लिसा रेमंड यांनी ७-६ (७-४), ६-४ असे हरविले. हा सामना त्यांनी एक तास व २६ मिनिटांत जिंकला. सानिया व चुआंग यांनी या सामन्यात सात ब्रेक पॉईन्ट्स गमावले तर तीन ब्रेक पॉईन्ट्स वाचविले. त्यांच्या प्रतिस्पध्र्यानी सहा ब्रेक पॉईन्ट मिळविले. सानिया हिला महिला एकेरीतील पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.

अमृतराज, मंकड यांची दुहेरीत आगेकूच
एटीपी टेनिस स्पर्धा
नवी दिल्ली, १६ मे/पीटीआय

भारताच्या प्रकाश अमृतराज व हर्ष मंकड यांनी आपापल्या सहकाऱ्यांसमवेत एटीपी टेनिस स्पर्धेत दुहेरीत अंतिम फेरीकडे आगेकूच केली. प्रकाश याने अमेरिकेचा सहकारी राजीव राम याच्या साथीत तुर्कस्तानमधील इझमीर टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. उपान्त्य फेरीत त्यांनी तृतीय मानांकित मिचेल एल्गीन व अ‍ॅलेक्झांडर कुद्रियात्वेसेव यांचा ७-६ (१०-८), १-६, १०-५ असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांची अग्रमानांकित जोनाथन एलरीच व हॅरेल लॅवी यांच्याशी गाठ पडणार आहे. अमेरिकेत लाँगबोट की येथे सुरू असलेल्या सारासोटा टेनिस स्पर्धेत मंकड व अमेरिकन खेळाडू केस व्हॅन्ट हॉफ यांनी उपान्त्य फेरीत अग्रमानांकित खेळाडू बॉल कर्स्टन व ट्रॅव्हीस रेटरमेयर यांच्यावर २-६, ६-३, १०-५ असा रोमहर्षक विजय मिळविला. तृतीय मानांकित मंकड व हॉफ यांना व्हिक्टर एस्ट्रेला (डॉमिनिक रिपब्लिक) व सॅन्टियागो गोन्झालिस (मेक्सिको) यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.