Leading International Marathi News Daily

रविवार, १७ मे २००९

गंगाआली हो, सायबर अंगणी!
संजय बापट

महापालिकेमध्ये आपल्या मागण्या मान्य करून घेताना, कामगार आणि त्यांच्या संघटना नेहमीच अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या मागण्या प्रशासनाकडून मान्य करवून घेतात. अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची नुसती भाषा जरी केली तरी प्रशासन हबकून जाते, कारण या कर्मचाऱ्यांच्या हाती शहराच्या दैनंदिन नाडय़ा असतात. परंतु या कोंडीवरही माहिती-तंत्रज्ञानाने मात केली असून, अशीच एक नवी प्रणाली ठाणे महानगरपालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ासारखी अत्यावश्यक सेवा पूर्णत: संगणकाच्या एका क्लिकवर चालणार असून, नदीतून उचलले जाणारे पाणी, सर्व प्रक्रियेअंती थेट ठाणेकरांच्या घराघरात पोहोचणार आहे. तेही एका क्लिकवरच! अ‍ॅटोमेशन ही आगळीवेगळी प्रणाली वापरणारी ठाणे महानगरपालिका ही केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलीवहिली महानगरपालिका ठरली आहे. सद्यस्थितीत पालिकेची पाणीपुरवठा योजना पूर्णत: पालिका कर्मचाऱ्यांच्या पारंपरिक (मॅन्युअली) कार्यपद्धतीवर अवलंबून आहे. यातील बहुतांशी कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान नसल्याने आणि ते त्यांच्या सोयीनुसार पाणीपुरवठा योजनेवर काम करीत असल्याने अनेकदा गोंधळ उडतो. तसेच एखाद्या यंत्रणेत बिघाड आल्यास ती पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागतो.

सायबर विश्वात मुलांचे संरक्षण
इंटरनेटचा वापर आता मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने त्याद्वारा होणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळेच आजच्या जागतिक दूरसंचार दिनाचा यावर्षीचा विषय ‘सायबर विश्वात बालकांचे संरक्षण’ असा ठरविण्यात आला आहे. त्याविषयी.. हल्ली विविध प्रकारचे ‘डे’ साजरे होताना आपण बघतो. त्यामधला एक दूरसंचार दिन असे मात्र समजू नये. दूरसंचार क्षेत्रातील तत्कालीन समस्यांचा विचार करण्यासाठी आटीयूने (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने) सुचवलेल्या विषयावर परिसंवाद जगभर आयोजित केले जातात. भारतामध्ये भारत संचार निगम तसेच महानगर संचार निगम या सरकारी कंपन्यांमध्ये या दिवशी संचारश्री इत्यादी पारितोषिके दिली जातात. इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) आणि इन्स्टिटय़ुशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आयईटीई) या दोन्ही संस्थांच्या शाखांमध्येही आयटीयूने दिलेल्या विषयावर चर्चासत्र आयोजिली जातात. यंदा पुण्यामध्ये १७ मे २००९ होणाऱ्या समारंभात मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले असल्यामुळे या विषयावरची माहिती मी जमवली आहे आणि ती वाचकांसमोर ठेवीत आहे. तत्पूर्वी थोडे आयटीयूबद्दल.

पर्यावरण आणि आपण
श्रीयांस कानविंदे

सुमारे दोन-अडीच वर्षांपासून मार्स नेचर एक्सप्लोरर या संस्थेच्या माध्यमातून अमोल हेंद्रे व मी पर्यावरण, वाइल्डलाइफ, निसर्ग जतन-संवर्धन हे विषय नव्या रीतीने लोकांपुढे पोहोचवावे, जेणेकरून समाजाला निसर्ग पर्यावरणाची जाणीव होईल आणि निसर्गाची होणारी हानी थोडय़ाफार प्रमाणात का होईना पण टळू शकेल, या उद्देशाने आम्ही खारीचा वाटा उचलायचे ठरवले. पर्यटनाच्या रूपातून वेगवेगळे उपक्रम राबवून उद्देश आणि उद्दिष्ट हळूहळू साध्य होत आहे. मनुष्यजीवनाची समतोलता राखण्यात पर्यावरणाचा महत्त्वाचा हात आहे. पूर्वी शाळेत असल्यापासून पर्यावरणाबद्दल आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात बरंच काही रुजवून देण्यात आलं होतं, पण ते त्या अभ्यासक्रमापुरतंच राहिलं. पण नंतर त्याचा उपयोग व्यक्तिगत जीवनात कधीच झाला नाही आणि म्हणूनच याची राहून राहून खंत वाटते की, असे गंभीर विषय जेव्हा शाळा-कॉलेजातून राबवले जातात, तेव्हा त्यांचा व्यक्तिगत जीवनात त्या विद्यार्थ्यांला किंवा विद्यार्थिनीला कसा उपयोग होईल आणि अप्रत्यक्षरीत्या समाजालासुद्धा त्याचा उपयोग आपोआप होईल याची जाणीव ठेवली पाहिजे.