Leading International Marathi News Daily

सोमवार, १८ मे २००९

‘हाता’ला साथ देण्यासाठी चढाओढ
नवी दिल्ली, १७ मे/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांमध्ये २०५ जागाजिंकून केंद्रातील सत्तेत परतलेल्या काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक मंगळवारी होत आहे. या बैठकीत संसदीय पक्ष नेत्याची तसेच संसदीय पक्षाच्या अध्यक्षाची निवड करण्यात येईल. लोकसभा निवडणुकांमध्ये मोठय़ा विजयानंतर आज अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यासाठी कोणत्या पक्षांशी बोलणी करायची याचा निर्णय काँग्रेस पक्ष युपीएतील घटक पक्षांशी चर्चा करून घेणार आहे.

प्रभाकरनची आत्महत्या?
श्रीलंकेच्या लष्कराचा एलटीटीईवर विजय
कोलंबो, १७ मे/पीटीआय
श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे हे आज जॉर्डनहून मायदेशी परत आले सून,लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेवर लष्करी विजय मिळवल्याचे त्यांनी जाहीर केले. संघर्षांच्या अखेरच्या टप्प्यात ७० तामिळ बंडखोर मारले गेले असून, एलटीटीईचा प्रमुख व्ही. प्रभाकरनसह सुमारे ३०० तामिळ बंडखोरांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, एलटीटीईचा प्रमुख व्ही. प्रभाकरन हा मरण पावल्याचा दावा श्रीलंकेच्या लष्कराने केला.

राज्यातील खासदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस
शिंदे व वासनिक यांचा समावेश निश्चित, कामत, देवरा, प्रिया दत्त, कलमाडी प्रयत्नशील
मुंबई, १७ मे / खास प्रतिनिधी
राज्यातून काँग्रेसचे १७ खासदार निवडून आल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राला गतवेळप्रमाणेच चांगले प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे व काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. याशिवाय गुरुदास कामत, मुरली देवरा किंवा त्यांचे पूत्र मिलिंद, सुरेश कलमाडी, प्रिया दत्त यांच्या नावांची चर्चा आहे. सोलापूरमधून निवडून आलेले सुशीलकुमार शिंदे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित आहे. शिंदे यांच्या नावाची चर्चा लोकसभा अध्यक्षपदासाठी सुरू झाली आहे.

युवराजची हॅटट्रीक; पंजाबची किक्
दिल्ली शायनिंग
जोहान्सबर्ग, १७ मे/ पीटीआय

अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावा आवश्यक असताना रियान हॅरिसने मात्र दोनच धावा काढल्याने पंजाब सुपर किंग्जला उपान्त्य फेरीतील आपली दावेदारी मजबूत करणारा रोमहर्षक विजय साजरा करता आला. आयपीएल स्पध्रेत दुसऱ्यांदा हॅट्ट्रिक नोंदविणारा युवराज सिंग पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डेक्कन चार्जर्सला आता उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. तसेच पंजाबलाही उपान्त्य फेरीत जागा निर्माण करण्यासाठी चेन्नईशी जिंकावे लागणार आहे. दुसऱ्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सने गतविजेत्या राजस्थान रॉयल्सचा १४ धावांनी पराभव केला. उपान्त्य फेरीत आधीच स्थान मिळविलेल्या दिल्लीने १२ सामन्यांत १८ गुण कमवित ‘दिल्ली शायनिंग’चाच प्रत्यय दिला आहे. ७९ धावा काढणारा अ‍ॅबी डिव्हिलियर्स आणि ३३ धावांत तीन बळी घेणार अमित मिश्रा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

निर्माते-दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचे निधन
मुंबई, १७ मे/पी.टी.आय.
अमिताभ बच्चन या अभिनेत्याला ‘जंजीर’द्वारे प्रथम यश मिळवून देणारे व या अभिनेत्याला अ‍ॅन्ग्री यंग मॅनचा किताब मिळवून देणारे नामवंत चित्रपट निर्माते व दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचे येथील रुग्णालयात दीर्घ आजाराअंती निधन झाले. ६९ वर्षांंचे मेहरा यांना गेले अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, रविवारी सकाळी सात वाजून ५० मिनिटांच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. न्यूमोनिया आणि शरीरातील प्रमुख यंत्रणा निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. जेव्हा अमिताभ बच्चन हे १५ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात भेटावयास गेले व त्यांच्याविषयी त्यांनी जेव्हा आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले तेव्हाच लोकांना मेहरा आजारी असल्याची माहिती मिळाली होती. ‘जंजीर’ या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांना प्रकाश मेहरा यांनी प्रथमच मोठे यश मिळवून दिले आणि नंतर या जोडीने मुक्कदर का सिकंदर, लावारीस, नमकहलाल, हेराफिरी, शराबी असे जंजीरसह सहा चित्रपट ओळीने हिट दिले.

अक्सा समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू
मुंबई, १७ मे / प्रतिनिधी

रविवारच्या सुटीची मजा लुटण्यासाठी मालवणी येथील अक्सा किनाऱ्यावर गेलेले तिघेजण पोहोताना आज दुपारी पाण्यात बुडाले. जीवरक्षकांनी एकाला वाचविले असून त्याच्यावर भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबलू विश्वकर्मा (१८), गुलामउद्दीन इक्बाल अली (३५) आणि पंकज राजभर (२१) या तिघांचा बुम्डून मृत्यू झाला, तर अजय भारद्वाज (२१) याला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. यातील अली हा मालवणी येथील व बबलू, राजभर व भारद्वाज हे मालाडच्या आप्पा पाडा येथील राहणारे आहेत. पोलीस उप निरीक्षक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही मित्र एकत्रितपणे कॅटर्सचा व्यवसाय करीत असत. आज रविवार असल्याने ते सुटीची मजा लुटण्यासाठी अक्सा येथे गेले होते. मात्र समुद्रात मस्ती करीत असताना चौघेही बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून अन्य पर्यटकांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. जीवरक्षकही त्यांना वाचविण्यासाठी पोहोचले. मात्र जीवरक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत बबलू, अली आणि राजभर समुद्रात बुडाले, तर भारद्वाजला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले.

मायकेल जॅक्सन याला त्वचेचा कर्करोग
लंडन, १७ मे/वृत्तसंस्था

पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला त्वचेचा कर्करोग झाला आहे. अर्थात हा रोग जीवावर बेतणारा नसल्याने व तो बरा होऊ शकत असल्याने त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. काही आठवडय़ांपूर्वीच्या वैद्यकीय तपासणीत ही बाब उघड झाली. मायकेल जॅक्सन याच्या मानेवर कर्करोगाच्या पेशी तर चेहऱ्यावर कर्करोगाआधी निर्माण होणाऱ्या पेशी असल्याच्या खुणा डॉक्टरांना आढळल्या आहेत. मध्यंतरी कोर्ट केसनंतर जॅक्सन पुन्हा अडचणीत आला आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी