Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

रालोआला लागले ‘लोअर सर्किट’, तरीही विरोधी पक्षनेतेपदी अडवाणी कायमच
नवी दिल्ली, १८ मे/खास प्रतिनिधी

 

पंतप्रधानपदाचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतरही लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी लालकृष्ण अडवाणीच कायम राहणार आहेत. मात्र, भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ गळतीच्या ‘लोअर सर्किट’मध्ये सापडल्याने आज रालोआची बैठक रद्द करण्यात आली. रालोआतील प्रमुख घटक पक्ष जदयुचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार दिल्लीत पोहोचले नाही. त्याचवेळी अजित सिंह यांचा राष्ट्रीय लोकदल आणि तेलंगण राष्ट्रसमिती हे रालोआतील घटक पक्ष युपीएमध्ये सामील होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्यामुळे आजची बैठकच रद्द करण्यात आली.
तत्पूर्वी, अडवाणी यांच्या निवासस्थानी आज भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजप संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदी कायम राहण्यासाठी भाजप नेते तसेच रा. स्व. संघाने केलेल्या ‘आग्रहा’मुळे अडवाणींनी आपला निर्णय बदलला. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आज अडवाणी यांच्या निवासस्थानी भाजपशासित मुख्यमंत्री व संसदीय मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी उपस्थित होते. शिवाय भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह अरुण जेटली, सुषमा स्वराज, अनंतकुमार, वेंकय्या नायडू, डॉ. मुरली मनोहर जोशी आदी सदस्य उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद अडवाणींनीच भूषवावे, अशी गळ त्यांना घालण्यात आली आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची ही विनंती मान्य केली. अडवाणींचा उत्तराधिकारी होण्यासाठी भाजपमधील दावेदारांमध्ये सुरु झालेल्या राजकारणावर संघाने नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. संघाचे पदाधिकारी मदनदास देवी आणि सुरेश सोनी यांनी अडवाणींना भेटून विरोधी पक्षनेते स्वतकडेच ठेवावे, अशी सूचना केली. सायंकाळी अडवाणींच्याच निवासस्थानी रालोआची बैठक होणार होती. पण या बैठकीला नितीशकुमार, अजित सिंह आणि चंद्रशेखर राव उपस्थित राहणार नसल्याची पूर्वकल्पना आल्यामुळे ही बैठक बेमुदत कालावधीसाठी रद्द करण्यात आली. रालोआचे नेते पराभवाच्या कारणमीमांसेत व्यस्त असल्यामुळे दिल्लीत येऊ शकले नाहीत, असे कारण रालोआचे संयोजक शरद यादव यांनी सांगितले.