Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

दुर्लक्षित सपा विरोधात बसणार,
लालूंना अजूनही सत्तेची आशा
नवी दिल्ली, १८ मे/खास प्रतिनिधी

 

केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नव्या युपीए सरकारला एकतर्फी समर्थनाची घोषणा केल्यावरही साधी दखलही घेतली जात नसल्याचे बघून आज समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, लालूप्रसाद यादव यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याची अजूनही आशा आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीला सत्तेतून दूर राखण्यासाठी बहुजन समाज पार्टीकडून काँग्रेस-युपीए सरकारला बिनशर्त पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढली आहे.
मुलायमसिंह यादव यांच्या पक्षाचा पाठिंबा घेतल्यास उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विस्तार होणार नाही, अशी भूमिका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक नेत्यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. त्यामुळे सरकारमध्ये सामील होण्याचे सपाचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. सपाने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. पण सपाचा पाठिंबा घेतल्यास मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार असल्यामुळे काँग्रेसने सपाच्या प्रस्तावाला थंड प्रतिसाद दिला आहे.दुसरीकडे युपीएचा घटक पक्ष असलेल्या राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमीच असली तरी त्यांनी आशा सोडलेली नाही. लालूंनी नव्या सरकारला बिनशर्त समर्थन देण्याची घोषणा केली. लालूंच्या पक्षाने चार जागा जिंकल्या असल्या तरी बिहारमध्ये त्यांनी काँग्रेसशी युती तोडून निवडणूक लढली होती. काँग्रेसचे नेते युपीएतील घटक पक्षांच्या नेत्यांना अपमानित करीत असल्याची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तक्रार करीत लालूंनी आपली ‘व्यथा’ बोलून दाखविली. महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवाव्या, अशी मागणी करून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अपमानित करीत असल्याचा आरोप लालूंनी केला. पण या मुद्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा शरद पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले.काँग्रेसला सपाची डोकेदुखी नको असली तरी बहुमतापेक्षा किमान ३० अतिरिक्त खासदारांचे पाठबळही हवे आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सपाचा प्रतिस्पर्धी बसपकडून बिनशर्त समर्थन मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लोकसभेत बसपच्या २१ जागा आहेत. आज मुख्यमंत्री मायावती यांचे खास विश्वासू सतीशचंद्र मिश्रा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतल्याची चर्चा होती. सत्तेत वाटा मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या सपाऐवजी बसपचे समर्थन घेणे कधीही सोयीचे असल्याचे काँग्रेसला वाटते.