Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

उत्तमराव पाटील यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी

 

यवतमाळचे माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलातर्फे करण्यात आली आहे. याकरिता राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशाराही क्रांती दलाचे सरचिटणीस अरविंद राठोड यांनी दिला.
भारतीय जनता पक्षातून बाहेर पडल्यावर बंजारा समाजाचे नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली मात्र, माजी खासदार उत्तमराव पाटील यांनी हरिभाऊ राठोड यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असा आरोप राठोड यांनी केला. ज्या पाटील घराण्याने काँग्रेसच्या भरवश्यावर गेली ३५ वर्षे सत्ता उपभोगली त्यांनीच पक्षाच्याविरोधात प्रचार केला, त्यामुळे बंजारा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. बंजारा समाज हा नेहमीच काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे . येत्या २२ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील बंजारा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्तमराव पाटील यांचा निषेध करून त्यांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचे राठोड यांनी पत्रकात म्हटले आहे.
हरिभाऊ राठोड यांच्या प्रचारार्थ सोनिया गांधी यांनी यवतमाळ येथे जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी राठोड सहज निवडून येतील, अशी परिस्थिती असताना उत्तमराव पाटील यांनी विरोधात काम करून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांचा पराभव झाला. राठोड यांचा पराभव देशातील भटके, विमुक्त बंजारा दलित मुस्लिम यांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे काँग्रेसने उत्तमराव पाटील यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीत बंजारा समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा अरविंद राठोड यांनी दिला.