Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘मराठा तितुका मेळवावा’मुळे ओबीसींनी दिला राष्ट्रवादीला फटका
मुंबई, १८ मे/प्रतिनिधी

 

काँग्रेसच्या राज्यात तब्बल १७ जागा निवडून आल्या असताना आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप करण्याला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी समाजाने धडा शिकवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते खासगीत मान्य करीत आहेत. राष्ट्रावादीतील एका शक्तीशाली नेत्याने विनायक मेटे यांना दिलेले मोकळे रान आणि त्यामुळे मेटे यांनी मराठा एकीकरणाची घेतलेली भूमिका यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ओबीसी समाजाने मत दिले नसल्याचे आता पक्षात बोलले जात आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादीने गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात ‘वाजवा तुतारी हाकला वंजारी’ ही घोषणा दिली होती. भाजपच्या निती व धोरणांवर टीका न करता जातीय पातळीवर राष्ट्रवादी उतरल्याने केवळ बीडच नव्हे तर आजुबाजुच्या मतदारसंघातील ओबीसी समाजही एकवटला. नाशिकमध्ये ‘वाजवा टाळी हाकला माळी’ ही घोषणा दिल्याने भुजबळांना अठरापागड ओबीसी जातींनी पाठिंबा दिला. मात्र या सगळ्याचा परिणाम झाल्याने दिंडेरी, जळगाव, रावेर या जागांवर ओबीसींनी राष्ट्रवादीला धूळ चारली. एकीकडे काँग्रेसच्या मराठा उमेदवारांकडे ओबीसी मते ‘ट्रान्स्फर’ होतानाच राष्ट्रवादीच्या मराठा तितुका मेळवावा या भूमिकेचा ओबीसींनी समाचार घेतला.राष्ट्रवादीच्या आठ जागांपैकी शरद पवार, सुप्रिया सुळे, डॉ. पद्मसिंह पाटील, उदयनराजे भोसले, प्रफुल पटेल, समीर भुजबळ या व्यक्तीगत करिष्म्यावर निवडून आलेल्या असून, संजय पाटील व संजीव नाईक या मनसेच्या मतविभागणीमुळे आलेल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे नेटवर्किंग या निवडणुकीत गायब झाल्याचेच चित्र होते. यामुळे शरद पवार अत्यंत नाराज झाल्याचे पक्षात बोलले जात आहे. हीच परिस्थिती कायम राहीली तर विधानसभा निवडणुकीत मराठय़ांना पुन्हा एकदा पानीपतचा अनुभव घ्यावा लागेल, असे राष्ट्रवादीतीलच ज्येष्ठ नेत्याने सांगितले.अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आदी दिग्गजांच्या बालेकिल्ल्यांमध्ये मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली. केवळ करडय़ा आवाजात केलेली दादागिरी आणि पैशाची पुडकी यांच्या जीवावर राजकारणात पुढे जाता येत नाही, त्यासाठी सर्व समाजात लोकसंपर्क आणि सर्वसमावेशक राजकारणाची गरज असते, असा टोला आता त्यामुळेच काँग्रेसमधील नेते मारू लागले आहेत.आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातून आणि छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची विधानसभेच्या २८८ मतदारसंघातील विभागणी कशी आहे, याचा अहवाल पाठविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एखाद दोन आठवडय़ानंतर शरद पवार पक्षातील दिग्गजांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी करणार असल्याचे बोलले जाते. जयंत पाटील यांनी सांगली मतदारसंघात प्रतिक पाटील यांच्या विरोधात उघड प्रचार केल्याने काँग्रेसने हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविल्याचेही राष्ट्रवादीतील नेत्यांचे म्हणणे आहे. या सगळ्याचा आढावा घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षात व सरकारमध्ये रंगसफेदी करण्यात येणार असल्याचे समजते.