Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

विखे, थोरात यांची हकालपट्टी करा- आठवले
मुंबई, १८ मे / प्रतिनिधी

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपल्या पराभवाला जबाबदार असणाऱ्या बाळासाहेब विखे पाटील आणि बाळासाबेह थोरात यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी आज रामदास आठवले यांनी केली. या मागणीसाठी आपण सोनिया गांधी यांची भेट घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे मुख्यालय असणाऱ्या टिळक भवनवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. आझाद मैदान येथील मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयावरही निदर्शेने करुन रिपाईं कार्यकर्त्यांनी पक्षाचा फलक तोडून टाकला.
विखे पाटील, थोरात यांनी आपल्याला निवडून आणण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून आपण शिर्डीत उभे रोहीलो. मात्र मी निवडून आल्यास या जिल्'ाात ऑट्रॉसिटीच्या घटनांत वाढ होईल, असा प्रचार आपल्या विरोधात करण्यात आला आणि विखे, थोरात यांनी आपल्याला पाडले, अशी आठवले यांची तक्रार आहे. आपला काँग्रेस, राष्ट्रवादीने विश्वासघात केला, मात्र हे पक्ष आणि आपण गेली अनेक वर्षे रिपब्लिकन चळवळीचा विश्वासघात करीत आहेत, त्याचे काय असा प्रश्न विचारला असता आठवले म्हणाले की, आपला पक्ष स्वतंत्र आहे, आपण काही समाजाचा विश्वासघात करीत नाही, पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला नाही. आतापर्यंत कार्यकर्त्यांचा पराभव केला जात होता, मात्र आता आपला पराभव केला म्हणजे विश्वासघात का? यावर आठवले म्हणाले की, विचाराच्या आधारावर या पक्षासोबत आपण आहोत, कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली नाही तरी आपण त्यांच्यासोबत राहिलो. गृहनिर्माणराज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांनी आपल्याकडे राजीनामा दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पराभव झाला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती तोडण्याबाबत, किंवा येणाऱ्या विधानसभेत या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा आपण पराभव करू, असा साधा इशारा देण्याची तयारीही आठवले यांनी दाखविली नाही.
आठवले किंवा अमरावतीत पराभूत झालेले राजेंद्र गवई हे सारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे लाचार आहेत, कणा नसलेले ते नेते आहेत, अशी चर्चा नंतर कार्यकर्ते करीत होते.