Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

मंडलिक-शेट्टींचा यूपीएला बाहेरून पाठिंबा?
कोल्हापूर, १८ मे / विशेष प्रतिनिधी

स्थानिक राजकारणाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या अटीवर केंद्रात काँग्रेस आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्यावर कोल्हापूचे दोन्ही अपक्ष खासदार राजी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असा प्रस्ताव घेऊनच खासदार सदाशिवराव मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दुपारी दिल्लीकडे प्रयाण केले असून, मंडलिकांसारखा मोहरा राष्ट्रवादी विरोधात प्रचारासाठी आपल्या हातात राहण्याकरिता राज्यातील काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते सक्रिय झाल्यामुळे पवारांविरुद्ध दंड ठोकून बंड करणाऱ्या मंडलिकांच्या गळय़ात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे.

शरद पवारांचे पितळ उघडे पडले- मंडलिक
कोल्हापूर, १८ मे / विशेष प्रतिनिधी

माझ्या कोणत्याच आरोपांना उत्तर देता येत नाही, असे लक्षात येताच शरद पवारांनी निवडणूक प्रचारात माझे मानसिक संतुलन बिघडल्याचा शेरा मारून मला वेडे ठरविण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकसभेच्या निवडणूक निकालात मला ४ लाख २५ हजार मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे माझे, मतदारांचे की आणखी कोणाचे मानसिक संतुलन बिघडले, याचे शरद पवारांनी वेळ मिळाला तर जरूर आत्मचिंतन करावे. या आत्मचिंतनाचा त्यांना, लोकांना आणि आम्हालाही जरूर फायदा होईल, असा उपरोधिक टोला खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

मटका सूत्रधाराकडे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा
कोल्हापूर, १८ मे / प्रतिनिधी

मटका जुगाराचा एक मुख्य सूत्रधार विजय पाटील याच्याकडे गुन्ह्य़ात आरोपी न करण्याच्या बदल्यात ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आनंदा भाऊसाहेब ऊर्फ ए.बी.पाटील याच्याविरुद्ध पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला असून संबंधित पोलीस कॉन्स्टेबल पाटील हा रजेचे कारण दाखवून गायब झाला आहे. पाटील याने आजच जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला आहे. या अर्जावर दि.२० मे रोजी सुनावणी होणार आहे.

टेंभूचे पाणी २६ मे रोजी कडेगाव, कराडला देणार
सांगली, १८ मे / प्रतिनिधी

ऐन उन्हाळ्यात टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी भागाला मिळणे गरजेचे असल्याने दि. २६ मे रोजी पाणी उपशास प्रारंभ करून कडेगाव व कराड तालुक्याला पाणी दिले जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली. सांगली व सोलापूर जिल्ह्य़ाच्या लाभक्षेत्रातील सर्वच तालुक्यांना टेंभू योजनेचे पाणी मिळणे आवश्यक असून त्यासाठी अग्रहक्काने निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
टेंभू योजनेद्वारे कृष्णा नदीतून पाणी उचलून ते सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी भागाला दिले जाणार आहे.

झांबियात टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेज पुढील वर्षांपासून सुरु
इचलकरंजीच्या डीकेटीईशी अंतिम करार
इचलकरंजी, १८ मे / वार्ताहर

कॉपरवेल्ट युनिव्हर्सिटी, झांबिया व येथील डीकेटीई यांच्या संयुक्त विद्यमाने झांबियामध्ये टेक्स्टाईल इंजिनिअिरग महाविद्यालय मार्च, २०१० पासून सुरू होणार आहे. यासाठी सीबीयू (कॉपरबेल्ट युनिव्हर्सिटी) डीकेटीई इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी या योजनेत झांबिया शासनाने रीतसर मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी झांबिया शासन ३० कोटी रुपये खर्च करणार असून याबाबत कॉपरबेल्ट युनिव्हर्सिटी व डीकेटीई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सुशीलकुमारांच्या विजयाच्या शिरपेचात राष्ट्रवादीचा ‘तुरा’
जयप्रकाश अभंगे / एजाजहुसेन मुजावर
सोलापूर, १८ मे

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेते, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मिळविलेल्या शानदार विजयामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंहाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेससह पराभूत भाजप-सेना युतीला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. विशेषत अक्कलकोटमध्ये अत्यल्प मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसचे ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.

फलटणमध्ये वादळी पावसाने हानी
फलटण, १८ मे/ वार्ताहर

फलटण तालुक्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसामुळे अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.सुसाट वाऱ्यासह काल रात्री अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाचा व वाऱ्याचा वेग इतका होता, की अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले. विजेच्या तारा तुटून पडल्या, तर शेकडो वृक्ष उन्मळून पडले. राजाळे येथे तब्बल ४१ घरांची पडझड होऊन सहा लाख तीन हजारांचे, निंबळक येथे ३ घरांचे १० हजारांचे, ठाकूरकी येथे चार घरांचे एक लाख ५९ हजारांचे, जाधववाडी येथे ९ घरांचे एक लाख २० हजारांचे, सांगवी येथे एका घराचे पाच हजारांचे तर वडले येथे दोन घरांचे आठ हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले आहे.फळबागांचेही २ ते ३ लाखांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. निंबळक येथील कुमार आडके यांच्या गुरांच्या गोठय़ावर वीज पडून एक देशी गाय व तिचा खोंड मृत झाला आहे. यामध्ये त्यांचे ९५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल यंत्रणेकडून पंचनामे करण्याचे काम सर्वत्र सुरूच असून, दोन दिवसांत नुकसानीचा खरा आकडा स्पष्ट होईल.

लग्नाच्या आमिषाने बलात्कार; मिरजेत एकास अटक
मिरज, १८ मे / वार्ताहर

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी अटक केली. संबंधित अल्पवयीन मुलीने येथील शासकीय रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला असून त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. मालगाव (ता. मिरज) येथील सागर प्रकाश आवटी याने शेतात मोलमजुरी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यांच्या संबंधातून या मुलीने येथील शासकीय रुग्णालयात १५ मे रोजी एका मुलीला जन्म दिला. ही बाब मुलीवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. कुमारी माता असल्यामुळे मुलीचे काही बरेवाईट होण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हालचाल करून संबंधित मुलीचा जबाब घेतला असता बलात्काराची ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सागर आवटी याला अटक केली आहे.