Leading International Marathi News Daily
मंगळवार, १९ मे २००९

छप्पर फाड के!
शेअर बाजारात गोल्डन मन्डे..

मुंबई, १८ मे / व्यापार प्रतिनिधी

केंद्रात पुन्हा कॉँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार येणार असल्याने शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी आली. एकाच दिवसात ‘सेन्सेक्स’ तब्बल २१०० अंशांनी वधारल्याने एवढय़ा मोठय़ा भरारीचा एक नवा इतिहास नोंदविला गेला. शेअर बाजाराच्या इतिहासात आजचा दिवस ‘गोल्डन मन्डे’ म्हणून गणला जाईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाही ३.०८ टक्क्यांनी वधारुन ४७.८८वर स्थिरावला.

म्हाडाची लॉटरी आज फुटणार!
मुंबई, १८ मे / प्रतिनिधी

शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या तीन हजार ८६३ घरांसाठीची चार लाख ३३ हजार अर्जदारांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या संगणकीय सोडतीसाठी म्हाडाने जय्यत तयारी केली आहे. सर्व ४२ संकेतांसाठी (कोड) १५ आरक्षित प्रवर्गांच्या एकूण ४३३ सोडती चार सत्रात काढल्या जाणार असून या सोडतींचे निकाल प्रत्येक सत्रानंतर म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत. या सोडतीसाठी उद्या लोकांची तोबा गर्दी उसळेल हे लक्षात घेऊन सभागृहाबाहेर तीन हजार लोकांसाठी मंडप उभारण्यात आला असून दोन मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत.

श्रीलंका लष्कराची चढाई प्रभाकरन ठार
कोलंबो, १८ मे/पीटीआय

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडविणारा तसेच श्रीलंकेमध्ये तामिळी अस्मितेचे रक्षण करण्याच्या नावाखाली गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ दहशतवादाचे थैमान घालणारा एलटीटीईचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन हा लष्कराचा वेढा मोडून नाटय़मयरित्या निसटून जाण्याच्या प्रयत्नात असताना लष्कराने आज त्याला ठार केले. राजीव गांधी यांची हत्या २१ मे १९९१ रोजी घडविण्यात आली होती. योगायोग असा की १८ वर्षे उलटत असताना या घटनेच्या तारखेच्या आसपासच म्हणजे १८ मे रोजी प्रभाकरनलाही ठार करण्यात आले.

‘राजशी कोणत्याही परिस्थितीत समझोता नाही’
सरांचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी धुडकावला

मुंबई, १८ मे/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत समझोता होणार नाही, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला केवळ एका जागेचा घाटा झाला आहे. मुंबई, ठाणे येथे शिवसेनेला फटका बसला असला तरी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता व्यूहरचना करण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख कडाडले
राजशी संबंध आता शक्यच नाही
मुंबई, १८ मे/प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरे यांच्या संपर्कात असून उद्धव व राज यांच्यातील मतभेद मिटविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशा आशयाचे वक्तव्य ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी ‘स्टार माझा’ला विशेष मुलाखत देताना केल्यानंतर सोमवार संध्याकाळपासून राजकीय मैदानात उडालेला धुरळा थेट बाळासाहेब ठाकरे यांनीच असे कोणतेही ‘गुफ्तगू’ नसल्याचे खास ठाकरी शैलीत व भाषेत सांगितल्यानंतर खाली बसला! मराठी माणसांच्या एकजुटीसाठी मी शिवसेना स्थापन केली, ती एकजूट तोडणाऱ्या रक्ताच्या नात्यांची मी पर्वा करीत नाही. राजशी माझा संपर्क नाही. असली ढोंगं मी आयुष्यात कधी केले नाहीत, असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले.
‘स्टार माझा’ला पाठविलेल्या पत्रात बाळासाहेबांनी म्हटले आहे की, जो शिवसेनेच्या व मराठी माणसांच्या मुळावर येतो त्याच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध व संपर्क असू शकत नाही. मराठी माणसांचा दुश्मन तोच माझा दुश्मन. या पत्राद्वारे मनोहर जोशी यांनाही एकप्रकारे फटकारले आहे. शिवसेनाप्रमुखांनी पुढे म्हटले आहे की, शिवसेना व मराठी माणसांच्या मुळावर येणाऱ्यांशी संपर्क का म्हणून ठेवायचा ? ही असली ढोंगं मी उभ्या आयुष्यात केली नाहीत. चांगले संबंध होते तेव्हा नक्कीच राज माझ्या संपर्कात होता. आता ते शक्य नाही. शिवसेनेची स्थापना मी मराठी माणसांच्या भक्कम एकजुटीसाठी केली आहे. ही एकजूट फोडून स्वार्थी राजकारण करणाऱ्या रक्ताच्या नात्याची मी पर्वा करत नाही. माझी बांधिलकी फक्त माझे कडवट शिवसैनिक व आतापर्यंत निष्ठेने साथ देणाऱ्या मराठी बांधवांशी आहे.

गडकरींचाही पुढाकार
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी

मराठी माणूस, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मिलनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी माणसाला असे विभाजन परवडणार नाही. त्याचबरोबर युतीच्या हितासाठी हे आवश्यक आहे. लवकरच उद्धव आणि राज यांच्याशी चर्चा करू. मात्र, एकत्र येणे न येणे हा त्यांचा प्रश्न आहे, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या इनिंगसाठी पंतप्रधान तय्यार
नवी दिल्ली, १८ मे/खास प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत चौदाव्या लोकसभेच्या विसर्जनाच्या शिफारशीचा प्रस्ताव पारित केल्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना आपला राजीनामा सादर केला आणि पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या इनिंगची तयारी केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ्शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी चौदावी लोकसभा विसर्जित करून नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग प्रशस्त केला. उद्या सकाळी संसद भवनातील ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची नेता निवडीसाठी बैठक होत असून त्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

दिल्ली शायनिंग
जोहान्सबर्ग, १८ मे/ पीटीआय

अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ४ धावा आवश्यक असताना रियान हॅरिसने मात्र दोनच धावा काढल्याने पंजाब सुपर किंग्जला उपान्त्य फेरीतील आपली दावेदारी मजबूत करणारा रोमहर्षक विजय साजरा करता आला. आयपीएल स्पध्रेत दुसऱ्यांदा हॅट्ट्रिक नोंदविणारा युवराज सिंग पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डेक्कन चार्जर्सला आता उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. तसेच पंजाबलाही उपान्त्य फेरीत जागा निर्माण करण्यासाठी चेन्नईशी जिंकावे लागणार आहे. दुसऱ्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सने गतविजेत्या राजस्थान रॉयल्सचा १४ धावांनी पराभव केला. उपान्त्य फेरीत आधीच स्थान मिळविलेल्या दिल्लीने १२ सामन्यांत १८ गुण कमवित ‘दिल्ली शायनिंग’चाच प्रत्यय दिला आहे. ७९ धावा काढणारा अ‍ॅबी डिव्हिलियर्स आणि ३३ धावांत तीन बळी घेणार अमित मिश्रा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

युपीएचे संघाकडून स्वागत
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत देशभरात जनतेने दिलेला कौल बघता प्रथमच काँग्रेसप्रणित सरकारला बहुमत मिळाले असून ही देशासाठी चांगली बाब आहे. यानिमित्ताने देशात आता पाच वर्ष स्थिर सरकार राहणार असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे स्वागत करीत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कापूस बियाणे विक्रीच्या वादातून दगडफेक
पारोळ्यात पोलिसांचा हवेत गोळीबार
जळगाव, १८ मे / वार्ताहर

राशी-२ या बीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असताना विक्रीच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्य़ातील पारोळा शहरात बियाणे विक्रीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे पाहून शेतकरी वर्गात प्रचंड उद्रेक झाला. काही जणांनी लुटालूट सुरू केली आणि संतप्त जमावाने दगडफेकही सुरु केल्याचे पाहून पोलिसांनी प्रथम लाठीमार केला, पण जमाव नियंत्रित होत नसल्याचे पाहता पोलिसांना हवेत गोळीबाराच्या फैरी झाडाव्या लागल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, पण जमावाच्या दगडफेकीत जिल्हा पोलीस उप अधीक्षक समाधान पाटील यांच्यासह १५ पोलीस जखमी झाले. राशी-२ नामक बीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीत दरवर्षी मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होतो तसेच बियाण्यांची पाकिटे चढय़ा भावाने विक्री करून काळा बाजार करण्यात येतो, अशा तक्रारी होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी यावर्षी असे प्रकार टाळण्याच्या उद्देशातून बियाणे विक्रीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी