Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

वादळ-विजेचे चार बळी
वीज पडून दोघांचा मृत्यू; झाड पडून दोन ठार
परभणी, १८ मे/वार्ताहर
दैठणा पोखर्णी परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. पोखर्णी येथे झोपडीवर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला व दोघे गंभीर भाजले. सिंगणापूर परिसरात रस्त्याच्या बाजूचे झाड अंगावर पडल्याने दोन जण ठार झाले. तालुक्यातील पोखर्णी शिवारात भुईमुगाचे क्षेत्र जास्त असल्याने त्याच्या काढणीसाठी परजिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणावर मजूर आले आहेत. या परिसरात काल सायंकाळी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पाऊस चालू झाला.

अधिक्य घटले; गड राखला!
प्रमोद माने

औरंगाबाद शिवसेनेचा गड असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले. या वेळी मात्र खासदार चंद्रकांत खैरे यांचे मताधिक्य कमी झाले आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत ते १ लाख २१ हजार ९२३ मतांनी निवडून आले होते. यंदा त्यांची आघाडी ३३ हजार १४ मतांवर आली. औरंगाबाद मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंतचे हे तिसरे कमी मताधिक्य आहे.

कलंक पुसला
गणेश कस्तुरे

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात काँग्रेस उमेदवाराचा पराभव (लातूर आणि सोलापूर)हा गेल्या दोन निवडणुकांपासून लागलेला कलंक यंदा नांदेडकरांनी धुऊन काढला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार भास्करराव पाटील खतगावकर यांना विजयी केले. मुख्यमंत्री, त्यांची पत्नी अमिता चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी राबविलेली नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा, विकासाच्या मुद्दय़ावर जनतेने दिलेली साथ, विरोधकांच्या (अप)प्रचाराला बळी न पडण्याची मतदारांनी घेतलेली भूमिका यामुळेच काँग्रेसचा एकतर्फी विजय झाला.

अनवाणी
निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, पर्यावरण मित्र होणं या आपल्या गोष्टी किती वरवरच्या आहेत ते काही वेळा पटतं, जेव्हा आपण निसर्गाच्या तावडीत सापडतो किंवा खरोखरीच सगळे मुखवटे आणि फोलपटं उतरवून स्वत:ला त्याच्या स्वाधीन करतो तेव्हा! जगण्याचं आव्हान आपण शहरी लोकांनी किती कोमट करून टाकलंय ते अशा वेळी उमजायला लागतं.

स्थलांतरित कार्यालये ‘स्वगृही’
हिंगोली, १८ मे/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे ठेवण्यासाठी प्रशासकीय इमारतीत असलेल्या सुमारे ३६ सरकारी कार्यालये तात्पुरती इतरत्र स्थलांतरित करण्यात आली होते. परिणामी जनतेच्या कामांची गैरसोय होऊन प्रशासकीय कामकाज थंडावले होते. आता ती कार्यालये परतीच्या मार्गावर असून साहित्याची ने-आण करण्याचा भरुदड कर्मचाऱ्यांच्या माथी बसणार आहे.

विलासरावांच्या केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा
लातूर, १८ मे/वार्ताहर

राज्यात काँग्रेसला प्रचंड यश मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी श्री. देशमुख दिल्लीत आहेत. काल एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘पक्षश्रेष्ठ जी जबाबदारी देतील ती आपण आतापर्यंत पार पाडलेली आहे.

घर हलवा; वाहून गेल्यास आम्ही जबाबदार नाही
पालिकेच्या नोटिशीने गुंठेवारीतील अधिकृत मालमत्ता क्षणात ठरल्या अनधिकृत!
औरंगाबाद, १८ मे/प्रतिनिधी
गुंठेवारी कायद्यानुसार नियमित करण्यात आलेल्या मालमत्ता अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न पालिकेने बजावलेल्या एका नोटीसमुळे समोर आला आहे. गुंठेवारीच्या नियमानुसार विहित शुल्क भरून नागरिकांनी आपल्या मालमत्ता अधिकृत करून घेतल्या. यासाठी पालिकेने मोहीमच हाती घेतली होती. मात्र आता पावसाळा जवळ येताच या अधिकृत झालेल्या मालमत्तांना पालिकेने नोटीस बजावली असून ‘आपण अनधिकृतपणे बांधलेले घर तातडीने हलवावे’ अशा आशयाच्या नोटिसा जारी केल्या आहेत.

सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना पकडले
उस्मानाबाद, १८ मे/वार्ताहर
अटक टाळण्यासाठी एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच घेताना येडशी पोलीस दूरक्षेत्राचा सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पंढरीनाथ गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी पकडले. अंबेजवळगा येथील शेतकऱ्याने त्याच्या चुलत भावाविरोधात तक्रार दिली होती. या तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी गायकवाडने १४ मे रोजी एक हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास अटक करून कारवाई करण्याची धमकीही त्यांनी दिली. या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. आज सकाळी सापळा रचून श्री. गायकवाड यांना त्या शेतकऱ्याकडून लाच घेताना पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक युनूस शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप कुलकर्णी, मुख्य हवालदार गोविंद मोरे, सूर्यकांत आनंदे यांनी ही कारवाई केली.

जलतरण तलावात मुलाचा मृतदेह सापडला
लातूर, १८ मे/वार्ताहर
आदर्श कॉलनीत अष्टविनायक जलतरण तलावात काल सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की अष्टविनायक जलतरण तलावात लहान मुलाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती न्यू आदर्श कॉलनीतील कृष्णा भागवत अंकुलवार यांनी दिली. पोलिसांनी त्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नव्हती. शिवाजी चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टेम्पो उलटून एक जण ठार
बोरी, १८ मे/वार्ताहर
टेम्पो उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार व तीन जण जखमी झाले. बोरी-जिंतूर रस्त्यावरील रिडज फाटय़ाजवळ काल रात्री हा अपघात झाला. जखमींपैकी मुंजा बाबाराव अंभुरे (वय १८, चांदजा) यास परभणीस उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्याचे निधन झाले. इतर तीन जखमींची नावे समजली नाहीत. चांदज येथील मंडप सजावटीचे साहित्य घेऊन टेम्पो (क्रमांक एमएच १४ एफ २१२०) निवळीहून बोरीमार्गे चांदजकडे येत होता. रिडज फाटय़ाजवळ तो काल रात्री उलटला. टेम्पोवर चार-पाच मजूर बसले होते. टेम्पो उलटल्याने सर्व जण खाली पडले. अंगावर साहित्य पडल्याने सगळे दबले गेले. रामा बाबाराव अंभुरे यांनी फिर्याद दिली. टेम्पो चालक फरारी झाला.

विशाखापट्टणम ते शिर्डी रेल्वे औरंगाबादमार्गे
औरंगाबाद, १८ मे/खास प्रतिनिधी

उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती संख्या पाहता आठवडय़ातून दोनदा विशाखा पट्टणम ते शिर्डी ही नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. जून महिन्यापर्यंत ही गाडी औरंगाबादमार्गे जाणार आहे. रविवारी आणि गुरुवारी ही गाडी औरंगाबादकरांसाठी उपलब्ध असणार आहे. येत्या २० मे पासून ही गाडी आठवडय़ातून दोनदा विशाखापट्टणम ते शिर्डी धावणार आहे आणि २१ मे पासून शिर्डीहून विशाखा पट्टणमला जाणार आहे. राजामुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, बोलारम, कामरेड्डी, निझामाबाद, बासर, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, नगरसोल, मनमाड, कोपरगाव, पुणतांबा व शिर्डी असा या रेल्वे गाडीचा मार्ग असणार आहे. एकूण १८ डब्बे या नवीन रेल्वे गाडीला असणार आहेत, अशी माहिती मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.

रोजंदारी सफाई कामगारांचे उपोषण
परभणी, १८ मे/वार्ताहर

परभणी नगरपालिका रोजंदारी सफाई कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळाला नाही. थकीत पगाराच्या मागणीसाठी सफाई कामगारांनी आजपासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगरपालिकेमध्ये गेल्या १८ वर्षांपासून अनेक सफाई कामगार रोजंदारीवर काम करतात. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या कामगारांना कामाचा मोबदला अत्यल्प मिळतो. तोही पाच महिन्यांपासून न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेवली आहे. अनेकदा पालिकेकडे थकीत मजुरीची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच या कामगारांनी रोजंदारीची रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. पालिका प्रशासनाने रोजंदारी सफाई कामगाराच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आज सोमवारपासून कामगार उपोषणास बसले आहे. सफाई कामगारांना सेवेत कायम करावे, तसेच पगार प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर दिलीप पाईकराव, दिलीप चौरंगे, चांदू आराटे, लक्ष्मीबाई लोंढे, कुशावर्ती गायकवाड, जिजाबाई उबाळे, भीमराव पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्नीचा खून करून आरोपी ठाण्यात हजर
हिंगोली, १८ मे/वार्ताहर

सेनगाव तालुक्यातील खुडज शिवारात पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून आरोपी पोलीस पाटलाला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. राजाराम श्रीपती बंदुके याने सोमवारी सकाळी त्याची पत्नी गंगुबाई (वय ५०) हिचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. खून केल्यानंतर गावात जाऊन पोलीस पाटलास केलेल्या कृत्याची देऊन त्यांच्या समवेत नरसी नामदेव पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी पंचनामा करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‘सामूहिक विवाहसोळ्यात सर्वधर्मीय ७१ जोडपे विवाहबद्ध होणार’
लोहा, १८ मे/वार्ताहर
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने लोह्य़ात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात यंदा ७१ वधू-वर विवाहबद्ध होणार आहेत. त्यासाठी शाही मंडप व सर्व व्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांत १६२ विवाह या सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडले आहे. यंदा २१ मे रोजी याच सामूहिक विवाहसोहळ्यात माझा मुलगा डॉ. प्रमोद, पुतण्या, भाचा, भाची, साडूभावाचा मुलगा या कुटुंबातील नातलगांचाही विवाह होणार आहे. या विवाहसोहळ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

आष्टीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
बीड, १८ मे/वार्ताहर

आष्टी शिवारात वीज पडून काल एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच गोठय़ात बांधलेला बैलही ठार झाला. वादळी वाऱ्याने बँडपथकाची जीपही उलटली. धानोरा, आष्टी, कडा येथे काल जोरदार वादळी पाऊस झाला. आष्टी तालुक्यातील कडा, आष्टी, धानोरा परिसरात टप्प्याटप्प्याने वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलाच कहर केला. पिंपळा येथील पोलीस पाटील रामभाऊ खटके सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतात पाऊस येऊ लागल्याने कांदे झाकण्यासाठी आपल्या खटकेमळा येथे गेले. वीज पडून ते मृत्युमुखी पडले. आष्टी शिवारातील माऊलीनगर भागात रामभाऊ सुरवसे यांनी गोठय़ाच्या दारात बांधलेला बैलही वीज पडून गतप्राण झाला. आष्टीतील ‘हॉटेल सुमीत’समोर लग्नकार्यासाठी जात असलेल्या बँडपथकाची जीप उभी होती. वादळी वाऱ्यामुळे ही जीप चक्क उलटली. एवढय़ा प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज कंपनीचे प्रचंड नुकसान झाले.

वादळी पावसाने किनवट तालुक्याला झोडपले
नांदेड, १८ मे/वार्ताहर

किनवट तालुक्यातल्या वाई बाजार परिसरात रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. वीज खांब वाकल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. गोकुळ येथील अर्जुन पवार (वय ३०) यांच्या डोळ्यांत उडून आलेला पत्रा घुसल्याने ते जखमी झाले. सायफळ येथील प्रल्हाद ठाकरे (वय ४०), सतीश पुनवटकर (वय २७) यांच्या अंगावर पत्रावर ठेवलेले दगड पडल्याने ते जखमी झाले. या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.परिसरातल्या अनेक झोपडय़ांचे नुकसान झाले.

विखे पिता-पुत्रांविरुद्ध घोषणा
नांदेड, १८ मे/वार्ताहर
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आय.टी.आय. परिसरात निदर्शने करून विखे पिता-पुत्रांविरुद्ध घोषणा दिल्या. प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तीस-चाळीस कार्यकर्ते सहभागी झाले. ‘आठवलेंच्या विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी काँग्रेसचे बाळासाहेब विखे व शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पराभवासाठीच प्रयत्न केले. या पिता-पुत्रांसह मंत्री बाळासाहेब थोरातही पराभवास जबाबदार आहेत. या तिघांविरुद्ध पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करावी; अन्यथा विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार उभे करून ताकद दाखवून देऊ,’ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

पवार, विखे यांच्या पुतळ्याचे दहन
बीड, १८ मे/वार्ताहर
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पराभवास कारणीभूत असणाऱ्या सोनिया गांधी, शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या पुतळ्याचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काल दहन केले. श्री. आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी राज्यातील ४७ मतदारसंघात दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांचेइमानेइतबारे काम केले. पण आठवले यांचा पराभव करून फुले, शाहू, आंबेडकरांच्या चळवळीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सोनिया गांधी, शरद पवार, विखे यांनी केला आहे. ही बाब निषेधार्ह आहे. आठवले यांच्या पराभवास कारणीभूत असणाऱ्या नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आला. या प्रसंगी संदीप हजारे, शाहू डोळस, राजू जोगदंड, हिरामण वडमारे आदी उपस्थित होते.

जालन्यातील प्रकल्पांमध्ये तीन टक्के जलसाठा
जालना, १८ मे/वार्ताहर
जिल्ह्य़ातील ४६ लघुसिंचन प्रकल्प आणि ७ मध्यम प्रकल्पात मिळून सरासरी तीन टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. यापैकी जिल्ह्य़ातील लघुसिंचन प्रकल्पातील जलसाठा सरासरी दोन टक्के एवढा आहे. सात मध्यम प्रकल्पांतील जलसाठा सरासरी ४.७२ टक्के आहे. कल्याण प्रकल्पात दोन टक्के तर जुई मध्म प्रकल्पात अडीच टक्के जलसाठा आहे. उध्र्व दूधना, जीवरेखा, गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी जोत्याच्या खाली आहे.

कुपोषित बालकांवर उद्या उपचार
गंगाखेड, १८ मे/वार्ताहर
तालुक्यातील १३ कुपोषित बालकांवर उद्या (मंगळवारी) औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती सभापती राजेश फड यांनी दिली. या बालकांसमवेत पंचायत समितीचे सभापती, गट विकासअधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी ताई, बालकांचे पालक हेही औरंगाबादला सोबत जाणार आहेत. तालुक्यातील कुपोषित व हृदयरोगाने त्रस्त बालकांचा प्रश्न उपस्थित करीत सभापती श्री. फड यांनी प्रशासनाला गांभीर्याची जाणीव करून दिली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासकीय खर्चातून संबंधित बालकांच्या उपचाराची जबाबदारी उचलली आहे.

साडेतीन लाखांची चोरी
जालना, १८ मे/वार्ताहर

शहरातील सुनील पंजाबी यांचे घर फोडून साडेतीन लाख रुपये किमतीचे हिरे व सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. पंजाबी बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून ही चोरी झाली. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.