Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

छप्पर फाड के!
शेअर बाजारात गोल्डन मन्डे..
मुंबई, १८ मे / व्यापार प्रतिनिधी

 

केंद्रात पुन्हा कॉँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार येणार असल्याने शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी आली. एकाच दिवसात ‘सेन्सेक्स’ तब्बल २१०० अंशांनी वधारल्याने एवढय़ा मोठय़ा भरारीचा एक नवा इतिहास नोंदविला गेला. शेअर बाजाराच्या इतिहासात आजचा दिवस ‘गोल्डन मन्डे’ म्हणून गणला जाईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाही ३.०८ टक्क्यांनी वधारुन ४७.८८वर स्थिरावला.
सोमवारी सकाळी १० वाजता शेअर बाजार सुरु झाला त्यावेळी काही क्षणातच खरेदीच्या जबरदस्त मागणीमुळे ‘सेन्सेक्स’चा पारा चढू लागला आणि १० टक्क्यांच्यावर गेल्याने ‘सर्किट ब्रेकर’ लागला. त्यामुळे शेअर बाजाराचे कामकाज एक तास बंद ठेवण्यात आले. पुन्हा एक तासाने कामकाज सुरु झाल्यावरही शेअर बाजारातील स्थिती कायम होती. त्यामुळे पुन्हा ‘सर्किट ब्रेकर’ लागला. शेवटी एकाच दिवसात दुसऱ्यांदा ‘सर्किट ब्रेकर’ लागल्याने शेअर बाजाराच्या नियमांनुसार शेअर बाजाराचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
सेन्सेक्स आज दिवसभरात तब्बल २११०.७९ अंशांनी वधारुन (१७.३४ टक्के) १४२८४.२१ अंशांवर स्थिरावला.
आजच्या खरेदीत प्रामुख्याने विदेशी वित्तसंस्थांचा सहभाग होता. अशा प्रकरे शेअर बाजाराने यापूर्वीचे सेन्सेक्सच्या वाढीचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत. २५ जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्सचा ११३९.९२ अंशांचा वाढीचा विक्रम होता. तो विक्रम आज मोडण्यात आला. शेअर बाजारात आज सर्वच कंपन्यांचे समभाग तेजीत होते.यात डी.एल.एफ.(२७ टक्के), युनिटेक (२९ टक्के) यांचा समावेश होता. बँकिंग समभागात आय.सी.आय.सी.आय. बँक (२० टक्के), स्टेट बँक (२१ टक्के) यांच्या समभागांनी चांगलीच उसळी घेतली होती. त्याशिवाय लार्सन (२९ टक्के), भेल (३३ टक्के), एन.टी.पी.सी. (१२ टक्के), टाटा स्टील (१६ टक्के) हे समभाग जबरदस्त तेजीत होते.