Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

श्रीलंका लष्कराची चढाई प्रभाकरन ठार
कोलंबो, १८ मे/पीटीआय

 

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडविणारा तसेच श्रीलंकेमध्ये तामिळी अस्मितेचे रक्षण करण्याच्या नावाखाली गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ दहशतवादाचे थैमान घालणारा एलटीटीईचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन हा लष्कराचा वेढा मोडून नाटय़मयरित्या निसटून जाण्याच्या प्रयत्नात असताना लष्कराने आज त्याला ठार केले. राजीव गांधी यांची हत्या २१ मे १९९१ रोजी घडविण्यात आली होती. योगायोग असा की १८ वर्षे उलटत असताना या घटनेच्या तारखेच्या आसपासच म्हणजे १८ मे रोजी प्रभाकरनलाही ठार करण्यात आले.
एलटीटीईचा पुरता बीमोड करण्यासाठी व या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील प्रदेशावर कब्जा मिळविण्यासाठी श्रीलंका लष्कराने निर्णायक कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान एलटीटीई भोवतालचा फास श्रीलंका लष्कराने आणखी आवळला होता. एलटीटीईचा सर्वच आघाडय़ांवर धुव्वा उडाला होता परंतु प्रभाकरन मात्र अजूनही लष्कराच्या हाती लागत नव्हता. तो श्रीलंकेबाहेर पळाला की अजूनही एलटीटीईचे वर्चस्व असलेल्या भागात लपून आहे याबाबत निश्चित काहीच माहिती हाती लागत नव्हती. अज्ञात ठिकाणी लपलेला प्रभाकरन व त्याच्या सहकाऱ्यांनी श्रीलंका लष्कराच्या वेढा मोडून नाटय़मयरित्या पलायन करण्याचे ठरविले. एका शस्त्रसज्ज व्हॅनमध्ये प्रभाकरन व त्याचे प्रमुख साथीदार बसले होते. त्यांच्या रक्षणासाठी एलटीटीईचे सशस्त्र बंडखोर एका बसमधून या व्हॅनच्या मागे चालले होते. लष्कराचा वेढा मोडून निसटण्याचा हा डाव लक्षात आल्यानंतर सैनिकांनी या ताफ्याच्या दिशेने गोळीबार केला. एलटीटीईचे बंडखोर व लष्करामध्ये सुमारे दोन तास गोळीबार सुरू होता. प्रभाकरन व त्याचे साथीदार बसलेल्या व्हॅनवर लष्कराने केलेल्या रॉकेटच्या माऱ्यात प्रभाकरनचा अंत झाला. प्रभाकरनचा मोठा मुलगा चार्ल्स अँथनी व एलटीटीईचे तीन प्रमुख नेते पोट्टू अम्मन, सुसाई, नाडेसन हे देखील श्रीलंका लष्कराने केलेल्या गोळीबारात ठार झाले.
दरम्यान गेली अनेक दशके सुरू असलेल्या संघर्षांचा दारूण शेवट झाला असून शस्त्रे खाली ठेवण्याशिवाय आपल्याकडे आता अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही अशी घोषणा एलटीटीईने रविवारी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरन व एलटीटीईचे महत्वाचे साथीदार श्रीलंका लष्कराबरोबरील संघर्षांत ठार झाले. प्रभाकरन याचा मोठा मुलगा चार्ल्स अँथनी लष्कराच्या वेढय़ातून निसटून जाण्याचा प्रयत्न करीत असताना मारला गेला. या घटनेनंतर त्या परिसरात लष्कराने हाती घेतलेल्या शोधमोहिमेत त्याचा मृतदेह हाती लागला.