Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

‘राजशी कोणत्याही परिस्थितीत समझोता नाही’
सरांचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी धुडकावला
मुंबई, १८ मे/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत समझोता होणार नाही, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला केवळ एका जागेचा घाटा झाला आहे. मुंबई, ठाणे येथे शिवसेनेला फटका बसला असला तरी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता व्यूहरचना करण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
उद्धव व राज या दोन भावांना एकत्र आणण्याकरिता भाजप, शिवसेनेचे काही नेते व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते प्रयत्न करीत आहेत. मनसेने मुंबई ठाण्यात मतविभाजन केल्याने युतीचा पराभव झाला हे स्पष्ट दिसत आहे. याच भागात विधानसभेचे ६० मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीत युतीला पुन्हा फटका बसू नये याकरिता भाजपमधील काही नेते उद्धव व राज यांनी एकत्र येण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनीही या दोन ठाकरेबंधूंनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली होती. परंतु जोशी यांना तातडीने शिवसेना भवनात बोलावून घेण्यात आले व राज यांच्याबरोबर समझोता करण्याची शक्यता फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर मनोहर जोशी यांनी सारवासारव करीत आपण असे बोललोच नाही, असा खुलासा केला. जोशी यांच्यावर गेल्या दोन महिन्यात असा खुलासा करण्याची ही तिसऱ्यांदा वेळ आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनाही शिवसेना कमजोर होऊन काँग्रेस प्रबळ झालेली चांगलेच खटकले आहे. मुंबई व ठाण्यातील शिवसेनेच्या गडात भविष्यात पडझड होऊ नये याकरिता या दोन भावांनी एकत्र यावे याकरिता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रयत्न करीत आहेत. केंद्रात काँग्रेसला उत्तम यश मिळाले आहे. विलासराव देशमुख यांच्यासारखे शरद पवार विरोधक राष्ट्रवादीला फारसे महत्व दिले जाऊ नये याकरिता प्रयत्नशील आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे नेते स्वबळावर विधानसभा लढण्याची भाषा करू लागले आहेत. काँग्रेसने खरोखर अशी भूमिका घेतली तर मनसेमुळे शिवसेनेला अपशकुन होऊ नये, असे राष्ट्रवादीलाही वाटते.
उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी राज यांच्याशी समझोत्याची शक्यता फेटाळली. राज ठाकरे यांनी शिवसेनेतील पदांचा राजीनामा दिला त्या घटनेपासून त्यांनी शिवसेना सोडून स्वतचा पक्ष स्थापन करण्यापर्यंतच्या काळात उद्धव व राज यांनी बरोबर काम करावे याकरिता अनेक शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते. राज यांनी मुंबई, ठाणे हा शहरी भाग सांभाळावा व उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात आपले नेतृत्व ठसवावे, असा प्रस्ताव दिला गेला होता. तो त्यावेळी फेटाळला गेला. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत महापूर आला व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राज यांच्या दादरच्या निवासस्थानी राहायला गेले होते. त्यावेळीच राज शिवसेनेवर नाराज होते. बाळासाहेबांशी चर्चा करूनच राज यांनी पक्ष काढल्याची एक चर्चा बराच वेळ चालू होती. ग्रामीण भागात उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळालेले यश आणि राज यांच्या मनसेचा मुंबई-ठाण्यातील वाढता प्रभाव लक्षात घेता दोन्ही ठाकरे यांनी वेगळे होऊन भविष्यात महाराष्ट्र काबीज करण्याची ही रणनिती तर नाही ना? अशी शंका व भीती काहीजण व्यक्त करू लागले आहेत. ‘रिलायन्स’च्या अनिल व मुकेश यांच्यातील कलहसुद्धा अंबानी समुहाच्या शेअर्सचे भाव वाढविण्यासाठी कृत्रिमरित्या घडवून आणला होता, अशी तेव्हा चर्चा होती. हा त्यातलाच राजकीय प्रकार नाही ना ? अशीा चर्चा होती. परंतु बहुतेक राजकीय निरीक्षकांच्या मते उद्धव व राज एकत्र येणे शक्य नाही.