Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

दुसऱ्या इनिंगसाठी पंतप्रधान तय्यार
नवी दिल्ली, १८ मे/खास प्रतिनिधी

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत चौदाव्या लोकसभेच्या विसर्जनाच्या शिफारशीचा प्रस्ताव पारित केल्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना आपला राजीनामा सादर केला आणि पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या इनिंगची तयारी केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ्शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी चौदावी लोकसभा विसर्जित करून नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग प्रशस्त केला.
उद्या सकाळी संसद भवनातील ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची नेता निवडीसाठी बैठक होत असून त्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. या बैठकीनंतर काँग्रेस आणि युपीएच्या घटक पक्षांची बैठक होऊन डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदासाठी निवड तसेच बहुमतासाठी लागणाऱ्या नव्या मित्रपक्षांशी हातमिळवणी करण्याच्या मुद्यावर चर्चा केली जाईल. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, मुस्लीम लीग, व्हीसीके आणि केरळ काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील.
आज सकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ७, रेसकोर्स या निवासस्थानी मावळत्या केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी काँग्रेससोबत निवडणूक न लढलेले राजदचे सर्वेसर्वा, रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पोलाद व रसायन मंत्री रामविलास पासवानही पोहोचले. आम्ही अजूनही युपीएमध्ये आहोत आणि काँग्रेसशी पुढेही मैत्री ठेवू इच्छितो, हे दाखविण्यासाठी राजकीय वजन घटलेले हे दोन्ही नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामील झाले. लालूंच्या राजदचे ४, तर पासवान यांच्या लोजपाचा एकच खासदार निवडून आल्यामुळे त्यांच्या सहकार्य घेण्याचे काँग्रेसवर दडपण राहिलेले नाही. मुलायमसिंह यादव, लालू यादव आणि पासवान या चौथ्या आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसपुढे शरणागती पत्करून बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाच्या आशा पल्लवित झाल्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची गरज नसल्याचे काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांचे म्हणणे आहे.