Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

युपीएचे संघाकडून स्वागत
नागपूर, १८ मे / प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत देशभरात जनतेने दिलेला कौल बघता प्रथमच काँग्रेसप्रणित सरकारला बहुमत मिळाले असून ही देशासाठी चांगली बाब आहे. यानिमित्ताने देशात आता पाच वर्ष स्थिर सरकार राहणार असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे स्वागत करीत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एका पक्षाचे सरकार असले की, कुठलेही निर्णय घेताना अडचणी निर्माण होत नाही. राजकीय पक्षात कोणी कोणाचा दुश्मन नसतो. केवळ निवडणुकीपुरते काही वाद असतात. त्यामुळे जे सरकार बहुमतात आले त्याला सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करून देशाचा विकास कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचे महत्त्व वाढणे हे चांगले संकेत असले तरी प्रादेशिक पातळीवर त्या त्या राज्यातील पक्षाचे महत्त्व वाढले पाहिजे. कारण प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकामध्ये त्या त्या राज्यातील स्थानिक पक्षांना महत्त्व दिले पाहिजे, असेही वैद्य म्हणाले. निवडणुकीमध्ये राममंदिर, महागाई असे विषय वारंवार येतात. त्यात गैर काही नाही. कारण, प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे विचार असतात. त्यांचे काही मुलभूत सिद्धांत असतात. त्यामुळे ते वारंवार मांडले गेले तर त्यात गैर काही नाही, असेही वैद्य म्हणाले. भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारांनी नाकारले नाही. काही स्थानिक विषय होते. भारतीय जनता पक्षाला बहुमत का मिळाले नाही, याचे चिंतन पक्षाचे नेते करतील. संघाचे ते काम नाही आणि त्याबाबतीत विचारही करणार नाही. निवडणुकीपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, अशी संघाची भूमिका होती पण, लोकांची मतदान करण्याची अनास्था दिसून आली. यावर आज चिंतन करण्याची गरज आहे, असेही वैद्य म्हणाले. मोहन भागवत यांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती झाल्यावर लालकृष्ण अडवाणी स्वयंसेवक म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. त्यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. लालकृष्ण अडवानी यांनी विरोधी पक्षनेतेपदी राहावे की नाही, हे भारतीय जनता पक्षाचे नेते ठरवतील. संघाशी त्याचा काही संबंध नाही. अडवाणी यांनी संघाच्या वरिष्ठांची भेट घेतली. ती राजकीय भेट नव्हती, असेही वैद्य म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका खरे तर एकत्र व्हायला हव्या. काही राज्यात त्या होत आहेत. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर पैशाची उधळण होणार नाही आणि जनतेच्या दृष्टीने सोयीचे होईल, असेही डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.