Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

म्हाडाची लॉटरी आज फुटणार!
मुंबई, १८ मे / प्रतिनिधी

 

शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या तीन हजार ८६३ घरांसाठीची चार लाख ३३ हजार अर्जदारांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या संगणकीय सोडतीसाठी म्हाडाने जय्यत तयारी केली आहे. सर्व ४२ संकेतांसाठी (कोड) १५ आरक्षित प्रवर्गांच्या एकूण ४३३ सोडती चार सत्रात काढल्या जाणार असून या सोडतींचे निकाल प्रत्येक सत्रानंतर म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत. या सोडतीसाठी उद्या लोकांची तोबा गर्दी उसळेल हे लक्षात घेऊन सभागृहाबाहेर तीन हजार लोकांसाठी मंडप उभारण्यात आला असून दोन मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. लोकांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचा मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खासगी वाहिन्यांनाही थेट प्रक्षेपणाची परवानगी देण्यात आली आहे.
सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणाऱ्या चार सत्रांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्रवेशिका जारी करण्यात आल्या असून प्रत्येक सत्राअखेरीस अशा प्रवेशिका धारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. म्हाडा वेबसाईटवर या प्रत्येक सत्रात कोणकोणत्या संकेतांसाठी सोडत काढली जाणार आहे त्याचा उल्लेख करण्यात आला असून त्यानुसारच लोकांनी सोडतीच्या ठिकाणी यावे व विनाकारण होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी गौतम चॅटर्जी यांनी केले आहे.
या संगणकीय सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जांचा तपशील तीन जणांच्या देखरेख समितीच्या उपस्थितीत आज सायंकाळी भरण्यात आला. त्यानंतर संगणक तसेत इतर सामुग्री सील करण्यात आली असून ती उद्या सकाळी या समितीच्या उपस्थितीत उघडली जाणार आहे. या सोडतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस यांची सिस्टिम ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोडतीसाठी लागणाऱ्या संगणक प्रणालीची सुरक्षितता तसेच गुणात्मक दर्जा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग (निटी) व टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने प्रमाणित केला आहे. वेबसाईटचा पत्ता - www.mhada.maharashtra.gov.inकिंवा www.mhada.com.

सोडतीसाठी होणारी चार सत्रे पुढीलप्रमाणे
* सत्र एक - कोड क्र. २०७, २०८, २०९, २१६, २१७, २१८, २१९ - सकाळी ९ ते ११ (प्रवेशिका लाल)
* सत्र दोन - २१०,२११,२१२, २३५,२३६,२३७ - स.११.३० ते दु. १.३० (प्रवेशिका हिरवी)
* सत्र तीन - २१३,२१४, २१५, २२८,२२९,२३०,२३१, २३२,२३३,२३४ - दु. २.३० ते सायं. ४.३० (प्रवेशिका पिवळा) ल्ल सत्र चार - २००, २०१, २०२, २०३, २०६, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, १९०-अ, १९१ - अ, १९२-अ, १९३-अ, १९५-अ, १९६- अ - सायं. ५ ते ७ (प्रवेशिका निळी)