Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

प्रादेशिक

‘वॉल स्ट्रीट जर्नलचे-एक्स्प्रेस समुहाचे मुंबई-नवी दिल्लीतून संयुक्त प्रकाशन
मुंबई, १८ मे/ व्यापार प्रतिनिधी
अग्रगण्य आंतरराष्ट्रीय वाणिज्य दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल एशिया’ने आजपासून भारतात प्रकाशनाला सुरुवात केली. एक्स्प्रेस समूहाबरोबर झालेल्या विशेष सामंजस्यातून या दैनिकाच्या मुंबई आणि नवी दिल्ली अशा स्थानिक आवृत्त्या आल्या आहेत. यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय व व्यापार जगतातील घडामोडींच्या अस्सल, विश्वासार्ह व विश्लेषणात्मक मांडणीचे दालन भारतीय वाचकांसाठी खुले झाले आहे.

चांगला मित्र, सहकारी गमावला -अमिताभ बच्चन
मुंबई, १८ मे / प्रतिनिधी
एक चांगला मित्र, सहकारी आणि चित्रपटाचे एक युग मी गमावले, अशा शब्दात अमिताभ बच्चनने प्रकाश मेहरा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ब्लॉगमध्ये अमिताभने लिहिले आहे की, प्रकाश मेहरा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती आणि लवकरच अतिदक्षता विभागातून त्यांना सर्वसाधारण विभागात हलविण्यात येणार होते. अचानक झालेल्या प्रादुर्भावामुळे ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’ झाले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

एसआयडीच्या परीक्षेत हर्षवर्धन कविटाके टॉपर!
ठाण्याचा स्वानंद राजपूत दुसरा, २८ महिलांची निवड

राजीव कुळकर्णी, ठाणे, १८ मे
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने आपला गुप्तचर विभाग अधिक सक्षम व्हावा, यासाठी ‘वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी’ पदासाठी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत हर्षवर्धन कविटाके राज्यातून अव्वल तर ठाण्याचा स्वानंद राजपूत हा दुसरा आला आहे. स्वानंद याला हर्षवर्धन एवढेच म्हणजे ३१० गुण मिळाले असले तरी वय व शैक्षणिक अर्हतेच्या निकषामुळे तो ‘टॉपर’ ठरू शकला नाही.

राष्ट्रपतींनी मागवली ‘विक्रांत’संबंधीची माहिती
मुंबई, १८ मे/ प्रतिनिधी

नौदलाचे तरंगते संग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएमएस विक्रांतच्या संवर्धनाबाबत नेमकी काय कारवाई केली आहे, याची माहिती राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी मागवली आहे. आयएनएस विक्रांत ही देशाची पहिली विमानवाहू युद्धनौका १९९७ मध्ये नौदलामधून निवृत्त झाल्यावर तिचे रुपांतर नौदलाच्या तरंगत्या संग्रहालयात करण्यात आले. मात्र ही नौका १२ वर्षे सुक्या गोदीत ठेवण्याऐवजी पाण्यामध्येच उभी असल्याने गंजू लागली आहे. या नौकेच्या संवर्धनासाठी ३० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिल्यानंतरही अद्याप ही नौका सुक्या गोदीत हलविण्यात आलेली नाही. या नौकेचे संरक्षण व्हावे यासाठी मालाडच्या एम. डी. शहा महिला महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि याच विषयावर प्रबंध लिहिलेल्या सोनिया राणे यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पत्र लिहून याबाबत पावले उचलावी अशी विनंती केली. राष्ट्रपतींनी त्यांच्या पत्राची दखल घेत संरक्षणखात्याकडून विक्रांतविषयी आतापर्यंत केलेल्या सर्व कारवाईची माहिती मागवली आहे.

अक्षयकुमारला अटक आणि सुटका
मुंबई, १८ मे / प्रतिनिधी

फॅशन शोमध्ये अश्लील वर्तन केल्याबद्दल चित्रपट अभिनेता अक्षयकुमार याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आणि नंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, परदेशातून मुंबईत दाखल झालेला अक्षयकुमार थेट पोलीस ठाण्यात आला. येताना त्याचे वकीलही त्याच्या सोबत होते. भारतीय दंड संविधानाच्या २९४ व ३४ कलमांखाली त्याला अटक करण्यात आली व जामिनावर सोडून देण्यात आले. गेल्या महिन्यात अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्नालासुद्धा याच कलमांतर्गत अटक करून जामीनावर सुटका करण्यात आली होती. ‘लॅकमे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवॉक करताना अक्षयकुमारने केलेल्या अश्लील वर्तनाबद्दल एका समाजसेवकाने तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांतर्फे या प्रकरणाबाबत कारवाई करण्यात आली.

कोकण रेल्वेवर राजधानी एक्स्प्रेस!
मुंबई, १८ मे / प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांकडून असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन हजरत निजामुद्दीन ते कोचुवेली या स्थानकांदरम्यान येत्या २२ मे ते ७ जून या कालावधीत सहा विशेष राजधानी एक्स्प्रेस गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील या विशेष राजधानी एक्स्प्रेस दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता हजरत निजामुद्दीनहून निघतील व तिसऱ्या दिवशी पहाटे ५.४५ वाजता कोचुवेलीला पोहचतील. तेथून रविवारी संध्याकाळी १९.१५ वाजता परतीच्या प्रवासाला निघून या गाडय़ा तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३५ वाजता निजामुद्दीनला पोहोचतील. या १२ डब्यांच्या गाडय़ांना दोन्ही दिशांच्या प्रवासात वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.