Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९


मध्य रेल्वेची तयारी बरी; पण प्रत्यक्षात येईल तेव्हा खरी!
प्रतिनिधी

यंदा मध्य रेल्वेने जानेवारीपासूनच पावसाळ्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. नालेसफाईखेरीज रेल्वेमार्गातील लाखो क्युबिक मीटर कचरा व डेब्रिज तसेच कित्येक टन जुन्या सामानाची विल्हेवाट लावली आहे. कच्चे-पक्के नाले बनविण्याशिवाय ठिकठिकाणी अत्याधुनिक सिग्नल बसविले आहेत. दरवर्षीप्रमाणे सखल भागात पंप तैनात ठेवले जाणार आहेत. तरीही यंदा पावसाळ्यात रेल्वेमार्गात पाणी तुंबल्याने किंवा सिग्नल यंत्रणा निकामी झाल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिस्टीममध्ये बदल घडवून आणण्यासाठी..
प्राजक्ता कुवळेकर

‘‘माझे मित्र-मैत्रिणी असोत किंवा नातेवाईक, प्रत्येक जण थोडय़ाफार प्रमाणात अधून मधून सिस्टीमला दोष देत असताना मला मात्र कायम वाटायचे की, या सिस्टीममध्ये उतरून बदल घडवून आणावा. त्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय होते. एकतर प्रशासकीय अधिकारी बनणे किंवा राजकारणात जाणे, मी पहिला पर्याय निवडला.’’ पॉलिटिकली करेक्ट गोष्टी बोलण्यापेक्षा स्वत:ला पटणारी मते पूजा मोकळेपणाने मांडत होती. यू. पी. एस. सी. परीक्षेत पूजा टिल्लू राज्यात चौथी आली आहे.

तस्करी परदेशी मोटरबाइकस्ची
मोटर बाईकचे आकर्षण कुणाला नसते? मोटरबाईक परदेशातील असेल ती चालविण्यातील मजा काही औरच. शिवाय प्रतिष्ठाही. ती अशा करीता की, या बाईकच्या किमतीत एक चांगली कार विकत घेता येऊ शकते. परंतु ही बाईक मिरविताना सर्वांच्या खिळलेल्या नजरा आणि स्वत:ला मिळणारा आनंद याला ही बाईक खरेदी करणारा महत्त्व देत असतो. सिनेअभिनेता जॉन अब्राहम वा सलमान खान वांद्रयातील रस्त्यांवर अशा बाईकस् खासा मिरविताना दिसतात ते उगीच नव्हे.. एखाद्य कॉलेजात अशी बाईक दिसली की, त्याभोवती लगेचच तरुण-तरुणींचा घोळका जमतो.

बीएमसीच्या जागेवरील झोपडय़ांना ठाणे पालिकेची मान्यता?
संजय बापट

वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील गांधीनगर भागात जलवाहिन्यांवर बांधल्या जात असलेल्या झोपडय़ांबाबत प्रारंभी मुंबई महापालिकेकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या ठाणे महापालिकेने आता या झोपडय़ा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी तसे आदेशही निर्गमित केले आहेत. मात्र, एकीकडे ही कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे मात्र बीएमसीच्या जागेवरील झोपडय़ांना करआकारणी करून त्यांना मान्यताच देण्याची दुटप्पी भूमिका पालिकेने घेतल्याचे आढळून आले आहे.

नवीन शाळांचे २४ हजार प्रस्ताव!
तुषार खरात
शिक्षणक्षेत्राचे दिवसेंदिवस बाजारीकरण होत चालल्याची ओरड होत असली तरी संस्थाचालकांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा चिंताजनक प्रकार समोर आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून नवीन शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे राज्यभरातून तब्बल २४ हजार प्रस्ताव आले आहेत. एवढय़ा अफाट संख्येने प्रस्ताव आल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

‘निवडक चिन्ह' चे राज ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी

चित्रकलाविषयक समीक्षा लेखनाचे मराठीतील एक सशक्त व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चिन्ह' या नियतकालिकातील लक्षणीय लेखांच्या ‘निवडक चिन्ह' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार १९ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजता जहांगीर आर्ट गॅलरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. मेघना, पेठे, कविता महाजन आणि संजय पवार यांची यावेळी ‘चिन्ह चळवळ आणि चित्रकला' या विषयावर भाषणे होणार आहेत. स्वाती पाटणकर कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहेत. १९८७ ते ८९ या तीन वर्षांतील अंकातील बाबुराव सडवेलकर, अंबिका धुरंदर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रभाकर बरवे, भरत दाभोळकर, रणजीत देसाई, दीप्ती नवल, ललिता लाजमी, भारती आचरेकर, पंढरीनाथ सावंत, एस.एम. पंडित, रणजीत देसाई, अच्युत पालव, सुहास बहुळकर, नि़ळू दामले, मंगेश कुळकर्णी आदी मान्यवरांच्या लेखांचा समावेश या संग्रहात आहे.

आज इंटरनॅशनल एड्स कॅंडललाइट
प्रतिनिधी
हृतिक- सुझान रोशन, नंदिता दास, शोभा डे, कुमार मंगलम बिर्ला या दिग्गजांच्या उपस्थितीत हिरोज प्रोजेक्ट आणि मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १९ मे रोजी शिवाजी पार्क येथे ‘इंटरनॅशनल एड्स कँडललाईट मेमोरिअल’ आयोजित करण्यात आले आहे. एड्सबद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने ‘टुगेदर, वुई आर द सोल्यूशन’ या संकल्पनेवर आधारित ही चळवळ जगभरातील ११५ देशांमध्ये राबविली जात आहे. मुंबईतील ४० संस्था यात सहभागी होणार आहेत. नॅकोच्या प्रमुख डॉ. सुजाता राव याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.