Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

विखेंविरोधात रिपाइं आक्रमक; दोन्ही काँग्रेसमध्येही जुंपली
कोपरगाव, शेवगाव, जामखेडला विखे पिता-पुत्रासह नेत्यांच्या पुतळ्याचे दहन
कोपरगाव, १८ मे/वार्ताहर
खासदार बाळासाहेब विखे, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पुतळ्यांचे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दहन केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रामदास आठवले यांच्या पराभवास विखे पिता-पुत्र जबाबदार असून, त्यांची पदे काढून घेण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आधी स्वत:चे घर तपासावे - विखे
राहाता, १८ मे/वार्ताहर

रामदास आठवले यांच्या पराभवाच्या कारणावरून मंत्रिपदाचे राजीनामे मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आधी स्वतचे घर तपासावे व नंतरच इतरांच्या घरात डोकवावे, असा टोला लगावत राष्ट्रवादीचे प्रचारप्रमुख राजीनामा देणार आहे का? असा प्रश्न शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विचारला.

‘पाचपुते यांनीही राजीनामा द्यावा’विखे, थोरात गद्दार - कळमकर
नगर, १८ मे/प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आघाडीचा धर्म न पाळता गद्दारी केली. रामदास आठवले व शिवाजी कर्डिले यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राधाकृष्ण विखे, थोरात व बबनराव पाचपुते या तिघांनीही मंत्रिपदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

‘काँग्रेस-रिपाइं युती जिल्ह्य़ात संपुष्टात’
अकोले, १८ मे/वार्ताहर

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कटकारस्थान करून शिर्डीत रामदास आठवलेंचा पराभव केल्याचा आरोप करून पराभवास जबाबदार असणाऱ्या बाळासाहेब विखे यांची काँग्रेसमधून, तर शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘प्राथमिक शिक्षक बँक संचालकांवर कारवाईसाठी याचिका दाखल करणार’
नगर, १८ मे/प्रतिनिधी

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बजाज अलियांझच्या नावाखाली बनावट विमा पॉलिसी देऊन शिक्षकांची मोठी आर्थिक फसवणूक केली. सुमारे ३ ते ४ कोटींचा हा घोटाळा आहे. त्यामुळे बँकेच्या संचालकांवर कारवाई करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. संचालक मंडळ बरखास्त होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे जिल्हा प्राथमिक शिक्षक मंडळाचे नेते विष्णू खांदवे व सुभाष खोबरे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

‘मुख्य जलवाहिनीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा’
आयुक्तांचा ‘अ‍ॅक्वा पंप्स’ला आदेश
नगर, १८ मे/प्रतिनिधी
केडगाव पाणीयोजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा अहवाल महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या संबंधित समितीला सादर केला असून, तो केंद्र सरकारकडे जाताच या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी केंद्राकडून वितरित होईल. आयुक्त कल्याण केळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अविनाश पांडकर, उपायुक्त अच्युत हांगे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम, तसेच या योजनेचे काम घेतलेल्या अ‍ॅक्वा पंपस् कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकतीच संयुक्तपणे कामाची पाहणी केली.

संतप्त महिलांनी आयुक्तांसमोर माठ फोडले
दोनच दिवसांत केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
नगर, १८ मे/प्रतिनिधी
केडगावच्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी शेकडो महिलांसह आज रास्ता रोको केला. मनपा आयुक्त कल्याण केळकर यांच्या ‘पाणीपुरवठा दोनच दिवसांत सुरळीत करू,’ या आश्वासनानंतर तब्बल अडीच तास चाललेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.
केडगावात गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिक त्रासले आहेत. नगर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असताना केडगावला मात्र सलग ८-१० दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

थंड रक्ताचा प्राणी!
माझे माध्यमिक शिक्षण तिसगावच्या श्रीवृद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात झाले. विद्यालय व शिक्षक उत्तमच होते. विज्ञान विषय शिकविणारे शिक्षक मनमिळावू व हरहुन्नरी होते. विषय सोपा क रून शिकविण्यात त्यांचा हातखंडा. मधूनमधून ते मजेशीर प्रश्न विचारत. मी शांत व अबोल असल्याने प्रश्नाचे उत्तर माहीत असले तरी कधी हात वर केल्याचे मला आठवत नाही. सरांनी मुद्दामहून प्रश्न विचारलाच तर मात्र मी उत्तरे देई. मी अचूक उत्तरे देतो, पण हात कधी वर करीत नाही याचा सरांना क्वचित प्रसंगी रागही येई.

प्रवरा परिसरात वादळी पावसामुळे एक कोटींचे नुकसान
एकजण ठार; ११ जनावरे मृत्युमुखी
राहाता, १८ मे/वार्ताहर
काल (रविवारी) रात्री प्रवरा परिसरात व तालुक्यात चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाल्याने विजेच्या धक्क्य़ाने एकजण ठार, तर वादळाने उडालेल्या पत्र्यांमुळे तीनजण गंभीर जखमी झाले. सहा गायी व पाच शेळ्या मृत्युमुखी पडल्या. वादळामुळे मोठय़ा प्रमाणात विजेचे खांब कोसळल्याने प्रवरा परिसरातील अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांचे हाल झाले. परिसरात एक कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गुंतागुंत अधिकच वाढणार!
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील दोन्ही जागांचे निकाल सत्ताधाऱ्यांना हादरा देणारे ठरले. जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सत्ता असली, तरी विरोधकांच्या भूमिकेत भाजप-शिवसेना युती नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी व त्यांचे अंतर्गत गट-तटच एकमेकांचे खरे विरोधक आहेत. त्यामुळे युतीला विरोधकांच्या भूमिकेत फारसा वाव नाही आणि त्यांच्या सदस्यांची संघर्ष करण्याची मानसिकताही नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेस अंतर्गत विखे गटाविरुद्ध थोरात गट व राष्ट्रवादी एक होते. त्यांच्यात कुरबुरी, कुरघोडी होत होत्या. त्यातूनच युतीच्या सदस्यांच्या पदरात काही लाभ पडत होते.

पाण्याबाबत आमची काही विशेष तक्रार नाही..
सावेडीतील नगरसेवकांकडून ‘अपेक्षाभंग’!
नगर, १८ मे/प्रतिनिधी
पाणीप्रश्नावर वारंवार मोर्चे काढून महापालिका कार्यालयावर धडकणाऱ्या सावेडीतील बहुसंख्य नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत ‘आमची काही विशेष तक्रार नाही,’ असे सांगत आयुक्त कल्याण केळकर यांना अवाक् केले. पाणीपुरवठय़ासंदर्भात सातत्याने होणाऱ्या आंदोलन, मोर्चामुळे त्रस्त झालेल्या आयुक्तांनी या प्रश्नाचा फडशा पाडण्याचे ठरवून विभागनिहाय बैठका त्या त्या क्षेत्रातील नगरसेवकांच्या उपस्थितीत घेण्याचे जाहीर केले. सावेडी प्रभाग समितीची पहिलीच बैठक आज त्यांच्या दालनात झाली.

वादळाचा राहुरीत शाळांना फटका
देवळाली प्रवरा, १८ मे/वार्ताहर
रविवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे राहुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह घरांचे, संसारोपयोगी वस्तूंचे मिळून ७२ हजारांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.निंभेरे येथील जि. प. शाळेचे पत्रे उडून ७ हजारांचे नुकसान झाले. निंभेरे गावातील संपतराव यांच्या राहत्या घराचे १६ पत्रे व ८ लोखंडी पाईप उडून १० हजारांचे, तर जिजाबापू सिनारे यांचे ५ हजारांचे नुकसान झाले. मालुंजे खुर्द (कारवाडी) येथील जि. प. शाळेचे पत्रे उडून ११ हजार ५००, तसेच ७ हजार ५०० असे १९ हजारांचे नुकसान झाले. लाकडी बल्ल्या १० हजार ५००, टीव्हीचे १२ हजार, संगीत पेटी २ हजार ५००, लाऊड स्पिकर ४ हजार, पन्हाळी पाईप २ हजार असे ५० हजारांचे नुकसान झाले. मालुंजे खुर्द येथील गट क्रमांक ६१/१ मधील अशोक पवार यांच्या राहत्या घराचे नुकसान झाले. छप्पर ५० हजार, टीव्ही १२ हजार, सूर्यफूल ३ पोते (५ हजार ४००), गहू पोती, फॅन २ असे २२०० रुपये असे ७२ हजारांचे नुकसान झाले. माहेगाव (कारवाडी) येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले.

‘आठवले यांच्या पराभवास विखेंना जबाबदार धरणे चूक’
जिल्हा काँग्रेस समितीचे पत्रक
नगर, १८ मे/प्रतिनिधी
आठवले यांच्या शिर्डीतील पराभवास बाळासाहेब विखे यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. समाजातील दोन घटकांमध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे, असे पत्रक जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आज प्रसिद्धीस देण्यात आले.शिर्डी लोकसभा मतदारसंघात आठवले यांचा पराभव झाल्यानंतर काहीजणांनी त्यास विखे यांना जबाबदार धरून त्यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला. ही खेदाची व दु:खाची बाब आहे, असे पत्रकात म्हटले आहे. विखे हे काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे संपूर्ण राज्यभर ते दौरे करीत होते. असे असूनही त्यांनी आठवले यांच्यासाठी अनेक सभा घेऊन प्रामाणिकपणे प्रचार केला. सत्य योग्य वेळी लोकांसमोर येईल. परंतु जिल्ह्य़ातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व विशेषत विखे यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वानी अशा प्रकारांमुळे प्रक्षुब्ध न होता शांतता पाळावी. विद्वेषी राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. पत्रकावर काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष वसंत देशमुख, सुभाष गुंदेचा, गोपाळराव झोडगे यांची नावे असून, वसंतराव कापरे यांची सही आहे.

‘व्यसने व अनितीमुळे समाजाचा ऱ्हास’
नगर, १८ मे/प्रतिनिधी
व्यसनाधिनता आणि अनिती हे समाजाच्या ऱ्हासास कारणीभूत आहे. सुखी जीवनासाठी सर्वानी भारतीय जीवनपद्धतीच्या अवलंब करावा, असे आवाहन कीर्तनकार इंदुरीकरमहाराज यांनी केले.सारसनगरमागील भगवानबाबानगरात नव्याने बांधलेल्या मंदिरात आज विठ्ठल-रुक्मिणी, संतश्रेष्ठ वामनभाऊ, भगवानबाबा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात इंदुरीकर बोलत होते. अनिष्ठ प्रथा, रुढी, अंधश्रद्धा, अवडंबर आदींवर त्यांनी आपल्या खास शैलीत प्रबोधन केले. मुलाकडच्यांनी हुंडा घेऊ नये. मुलींनी व्यसनाधीन तरुणाशी विवाह करू नये. महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन तळीरामांना वठणीवर आणावे, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, सकाळी होमहवन, कलशपूजन, महाआरती, मूर्ती प्रतिष्ठापना आदी कार्यक्रम झाले. महाप्रसाद वाटप करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या प्रतिष्ठान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संत भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सीनापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ
नगर, १८ मे/प्रतिनिधी
पावसाळापूर्व काम म्हणून महापालिकेने आज सीना नदीपात्राच्या साफसफाईस सुरुवात केली. वारुळाचा मारुती, तसेच भिंगार नाल्यातील साचलेला गाळ व वाढलेली झुडपे आज काढण्यात आली. सीना नदीचे पात्र अनेक ठिकाणी अतिक्रमणे, तसेच झाडेझुडपांमुळे अरुंद झाले आहे. मोठा पाऊस झाला की पाण्याचा फुगवटा वाढून परिसरातील वसाहतींना पुराचा धोका निर्माण होतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असताना मनपा प्रशासन मात्र दर वर्षी लाखो रुपयांच्या निविदा काढून हे काम खासगी ठेकेदारांकडून करून घेत असते. सीना नदीपात्राबरोबरच शहरातील, विशेषत मध्यभागातील गटारे, नाल्या, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या रस्त्यांकडेच्या पन्हाळी स्वच्छ करण्याची गरज आहे. त्याकडे मनपा दुर्लक्ष करते. ही गटारे व नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच संपल्यामुळे थोडय़ाशा पावसातही शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर, चौकांत पावसाचे पाणी साचून तळी निर्माण होतात.

मोटरसायकलवरील दोघांचा जीपची धडक बसून मृत्यू
नगर, १८ मे/प्रतिनिधी
काळ्या-पिवळ्या जीपची धडक बसून मोटरसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी तीनच्या सुमारास नगर-सोलापूर रस्त्यावर दहिगाव शिवारात झाला. नगर तालुका ठाण्यात जीपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वैभव विजय पिपाडा (वय २५) व दत्तात्रेय ठकाजी पाचरणे (वय २२, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदे) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. राजमल पृथ्वीराज लुणिया (रा. घोगरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
वैभव व दत्तात्रेय मोटरसायकलवरून (एमएच १६, एएफ ६८५०) नगरकडून येत होते. सोलापूरकडून आलेल्या जीपची धडक बसून ते जागीच ठार झाले. अपघातानंतर जीपचालक पळून गेला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास हवालदार खैरे करीत आहेत.

आगरकर मळा भागात महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले
नगर, १८ मे/प्रतिनिधी
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळविण्याच्या सावेडी भागात सर्रास घडणाऱ्या घटना आता शहराच्या इतर भागातही घडू लागल्या आहेत. रेल्वे स्टेशनलगतच्या आगरकर मळा भागात आज सायंकाळी अशाच घटनेत महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे गंठण चोरटय़ांनी पळविले. या संदर्भात श्रीमती लता रंगनाथ डागवाले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आगरकर मळ्यातील विशाल कॉलनीत संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. डागवाले अहमदनगर महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. आगरकर मळ्यातील बेल्हेश्वर कॉलनीतील घराकडे त्या पायी जात असताना मोटरसायकलवर भरधाव आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे गंठण ओढून नेले.

तांबेवाडी बनावट इंधन; तीन आरोपींना पोलीस कोठडी
पाथर्डी, १८ मे/वार्ताहर
तालुक्यातील तांबेवाडी शिवारातील डिझेल भेसळ प्रकरणी काल पकडलेल्या तीनही आरोपींना आज न्यायालयाने येत्या २० मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. मागील आठवडय़ात पोलिसांनी तांबेवाडी शिवारात छापा टाकून चार टँकर, एक जीप, रॉकेल व रासायनिक पदार्थाचा साठा जप्त केला होता. या छाप्यात पोलिसांनी एक टँकरचालकाला अटक केली होती. विष्णू बाबासाहेब ढाकणे, सुदाम साहेबराव महानोर, कल्याण ऊर्फ कैलास बाबूराव चोरमले हे आरोपी फरार होते. फरारी आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके नगर व बीड जिल्ह्य़ांत फिरत होते. काल सायंकाळी हे फरारी आरोपी केडगाव येथे असताना गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक रजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना अटक केली. या प्रकरणात आणखी दोन आरोपींची नावे पोलिसांना निष्पन्न झाली. त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. काल पकडलेल्या तीनही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना २० मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तांबेवाडी शिवारात हा उद्योग चालू होता. या ठिकाणी बनवण्यात आलेले बनावट पेट्रोल व डिझेल विशेषत मराठवाडय़ातील पेट्रोलपंपांवर विकले जात होते.

चोरीच्या गुन्ह्य़ातील मोटरसायकल जप्त
संगमनेर, १८ मे/वार्ताहर
संगमनेर कारखाना दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी कैलास सावंत याने चोरीच्या गुन्ह्य़ात वापरलेली मोटरसायकल (एमएच १२ सीपी ५८३) आज सायंकाळी पोलिसांनी जप्त केली. घटना घडल्यापासून ही मोटरसायकल एका ढाब्याच्या मागे बेवारस स्थितीत पडून होती. कारखान्याची सुमारे दीड कोटींची साखर लुटल्याप्रकरणी सावंत सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आरोपी सावंत याने चोरीच्या उद्देशाने संगमनेर येथे ये-जा करण्यासाठी मोटरसायकलचा वापर केल्याची कबुली दिली होती. कारखाना कार्यस्थळाजवळ सावंतचा अड्डा असलेल्या हॉटेल साई रेस्टॉरंट या ढाब्याच्या परिसरात शोध घेतला असता बेवारस स्थितीत पडलेली ही मोटरसायकल मिळाली. मोटरसायकल कोणाच्या नावावर आहे, याची चौकशी सध्या पोलीस करीत आहेत.

टँकर इंधन घोटाळ्यातील आरोपी न्यायालयात शरण
नगर, १८ मे/प्रतिनिधी

गेल्या वर्षी मे महिन्यात उघडकीस आलेल्या पाथर्डी टँकर इंधन घोटाळ्यातील एक आरोपी जगन्नाथ राठी न्यायालयात शरण आला. त्याला दि. २७ मेपर्यंत नियमित अंतरिम जामीन न्यायालयाने आज मंजूर केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांनी हा निर्णय दिला. राठीतर्फे वकील विश्वासराव आठरे व लक्ष्मीकांत पटारे यांनी काम पाहिले. वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने राठी याला २० हजार रुपयांचा अंतरिम जामीन मंजूर केला. गेल्या वर्षी पाथर्डी पंचायत समितीमधील टँकर इंधन गैरव्यवहार उघडकीस आला. १५जणांनी २८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यात राठी याचाही समावेश होता. राठी याची आ. राधाकृष्ण विखे सहकारी वाहतूक संस्था आहे. या संस्थेमार्फत पाण्यासाठी टँकर पुरविले जात होते.

रात्रीच्या वीजकपातीमुळे चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ
वाडेगव्हाण, १८ मे/वार्ताहर

येथील तुकाईमळा, शेळकेमळा, खंदारेमळा, मिरीमळा, तरवडी परिसरात गेल्या वर्षभरापासून बंद असलेला रात्रीचा वीजपुरवठा सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी उपसरपंच संतोष शेळके यांनी दिला आहे. परिसरात रात्रीच्या वीजपुरवठय़ा-अभावी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात गावातील महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन दिले. मात्र, कंपनीचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. परिसरासाठी नवीन डी. पी. देण्याची मागणी बालिका शेळके यांनी केली आहे.