Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

जीवनदर्शन
कृतज्ञता: आत्म्याचे संगीत

 

कृतज्ञता हे आत्म्याचे संगीत आहे, असे म्हटले जाते. आपण कमावलेले फारच कमी असते. आपल्याला मिळालेले कितीतरी पटीने अधिक असते. त्याची जाणीव असली म्हणजे माणसाच्या ओठावर नेहमी कृतज्ञतेचे शब्द खेळत असतात. जी व्यक्ती कृतज्ञ असते ती अंतरी आनंदी असते. कृतघ्नता ही जखमी आत्म्याची प्रतिक्रिया असते. तिचा दाह होरपळून काढणारा असतो. म्हणूनच शेक्सपियरने म्हटले आहे की, कृतघ्नता ही बोचऱ्या उत्तर वाऱ्यापेक्षा अधिक क्रूर असते. आत्मकेंद्रित माणूस कृतघ्न असतो. तो सर्व काही गृहित धरीत असतो. जे आपल्याला मिळते, तो आपला वारसाहक्क आहे, असे त्याला वाटू लागते. अशी व्यक्ती मुळात असमाधानी आणि अतृप्त असते. माणसाच्या कृतघ्नतेचा अनुभव प्रभू ख्रिस्तालाही आला. एकटा प्रभू येशू गॅलिलीहून जेरुसलेमला निघाला होता. वाटेवर असताना दहा कुष्ठरोग्यांनी त्याला पाहिले. येशूच्या जवळ जाण्याची त्यांना हिंमत झाली नाही. कारण त्यांना लोकवस्तीत येण्याची बंदी होती. त्यांनी दुरूनच आरोळी ठोकून विनंती केली, ‘अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा.’ त्यांची ती आर्त वाणी ऐकून येशूचे मन द्रवले. तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणाला,‘‘तुम्ही मंदिरात जा आणि स्वत:ला याजकांना दाखवा व सर्व धार्मिक सोपस्कार पुरे करा.’’ ते निघाले. वाऱ्याची जोरदार लाट यावी आणि आकाशातील मळभ दूर सरावे आणि लख्ख प्रकाश पडावा तशी त्यांची गत झाली. नवजात बालकासारखी आपली त्वचा कोमल झालेली त्यांना जाणवली. ते सद्गदित झाले. दहापैकी नऊजण ज्यू होते. म्हणजे येशूचे जातिबांधव होते. फक्त एकच सॅमॅरिटन होता. ज्यू आणि सॅमॅरिटन कधी एकत्र येत नव्हते. सॅमॅरिटन धावतधावत येशूकडे माघारी आला आणि त्याने त्याचे आभार मानले. येशूने त्याला विचारले, ‘दहाचे दहाजण शुद्ध झाले का? मग नऊजण कुठे आहेत?’ माणसाची कृतघ्नता ही देवाच्या काळजातील वेदना असते, तर कृतज्ञता ही माणसाच्या मनातील प्राजक्तफुले असतात. ते आत्म्याचे संगीत आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कुतूहल
विश्वनिर्मितीचे सिद्धान्त- २
विश्वाच्या निर्मितीबद्दल इतर कोणते सिद्धांत सुचविले गेले आहेत?

महास्फोटाच्या सिद्धांताला महत्त्वाचा पर्याय मानला गेलेला ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ फ्रेड हॉयल, थॉमस गोल्ड आणि हरमन बाँडी यांनी मांडला. इ.स. १९४८ साली मांडल्या गेलेल्या या सिद्धांतानुसार विश्व प्रसरणशील मानले असले तरी काळानुसार विश्वाचे स्वरूप बदलत नाही. या प्रारंभहीन आणि अंतहीन विश्वाची घनतासुद्धा कसलाही बदल न होता कायम राहाते, तसंच विश्वातील दीर्घिका आणि तारे ज्या गतीने नष्ट होतील त्याच गतीने त्यांची निर्मितीही होत राहाते. महास्फोट सिद्धांतावर आधारित प्रारूपाप्रमाणे या प्रारूपानुसारही विश्व हे प्रसरण पावत आहे. पण ही स्थिती कायम ठेवण्याकरिता विश्वात सातत्याने पदार्थाची निर्मिती होत असली पाहिजे. हॉयलने आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या चौकटीत अशी निर्मिती शक्य असल्याचे दाखवून दिले. इ.स. १९६५ साली शोधल्या गेलेल्या सर्वव्यापी प्रारणांचे स्पष्टीकरण देता येत नसल्यामुळे हा सिद्धांत मागे पडत गेला. इ.स. १९९३ मध्ये फ्रेड हॉयल, जॉफ्री बर्बिज आणि जयंत नारळीकर यांनी हा सिद्धांत नव्या रूपात मांडला. या नव्या आवृत्तीनुसार विश्व जरी प्रसरण पावत असले तरी त्याबरोबरच त्याचे आवर्ती आकुंचनही होत असले पाहिजे.
विश्वाच्या निर्मितीबद्दल सुचविली गेलेली आजची सर्व प्रारूपे ही सापेक्षतावादावर आधारित आहेत. विश्वाच्या प्रसरणशीलतेचा शोध लागण्याच्या अगोदर खुद्द आईनस्टाईननेही एक प्रारूप सुचविले होते. इ.स. १९१७ सालच्या या प्रारूपानुसार विश्व हे स्थिर असून, आईनस्टाईनला त्यात कोणताही बदल अभिप्रेत नव्हता. यानंतर इ.स. १९३२ साली आईनस्टाइन आणि डी सिटर या दोघांनी मिळून मांडलेल्या प्रारूपात विश्वाचं प्रसरण गृहित धरलं असलं तरी हे प्रसरण कालांतराने थांबण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
रामानुज अय्यंगार
आपल्या ईश्वरप्रेरित आवाजाने तीन दशके लोकांच्या अंतर्मनावर प्रभाव पाडणारे रामानुज अय्यंगार यांचा जन्म १९ मे १८९० रोजी झाला. त्यांचे वडील वेद, फलज्योतिष आणि संगीताचे जाणकार होते. तो वारसा त्यांनी चालवला. तामिळ व संस्कृतवर प्रभुत्व मिळविणाऱ्या रामानुजांनी पुदुकोट्टाई मलयापाय्यर, नरसिंह अय्यंगार यांच्या हाताखाली संगीताचे धडे गिरवले. शिवाय एकांतात तासन्तास त्यांनी रियाज केला. एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने गायनाची संधी त्यांना मिळाली. त्याचे त्यांनी सोने केले. १९२० च्या सुमारास मद्रासमध्ये त्यांच्या संगीताचे जलसे गाजू लागले. १९५५ च्या आकाशवाणी संगीत संमेलनाची सुरुवात त्यांच्या गायनाने झाली. भरदार आवाज, श्रृतीची शुद्धता, तामिळ रचनांना अग्रस्थान, तसेच राग आलापतासारख्या एखाद्या बाबीवर भर न देणे ही त्यांच्या गायकीची वैशिष्टय़े! त्यांची गायनशैली ‘अरियकुडी बानी’ म्हणून प्रसिद्ध होती. मध्य लय ही त्यांची खासियत. जवळजवळ तीन दशकांहून अधिक काळ कर्नाटकी गायनामध्ये ते अग्रस्थानी होते. जी. एन. बालसुब्रह्मणयन, पुदुकोट्टाई हे दिग्गज त्यांचे चाहते होते. श्रुती या संगीताला वाहिलेल्या नियतकालिकाने त्यांच्या गायकीविषयी भरभरून लिहिले. गुरुकुल पद्धतीने संगीत शिक्षण देण्याच्या त्यांनी शाळा काढल्या. यातून राजन अय्यरसारखे गायक त्यांनी घडवले. यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘संगीत रत्नाकर’, ‘संगीत कलानिधी’, ‘आस्थाना विद्वान’, ‘संगीत कला शिखामणी’, तसेच १९५२ साली राष्ट्रपती, तर १९५७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यामुळेच कर्नाटकी संगीताला संगीत जगतात एक स्वतंत्र अशी ओळख प्राप्त झाली. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका आजही उपलब्ध आहेत.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
सुरेश शहाणा झाला

तनय फार वैतागला होता. शाळेत येताना आज अगदी दादागिरीची कमालच झाली होती. वर्गातल्या शरदने त्याची सायकल हाताने थांबवली. शरद दांडगट होता. वर्गात वयाने सगळय़ांत मोठा होता. त्याच्या आवाजात जरब होती. लहानखुऱ्या चणीचा तनय सायकलवरून खाली उतरला. शरद गुरकावला, ‘दप्तर उघड आणि गणिताच्या गृहपाठाची वही काढ.’ मुकाटय़ाने तनयने वही काढली. शरदने त्याची मानगूट पकडून त्याला बाजूच्या देवळाच्या पायरीवर बसायला सांगितले. स्वत:ची गृहपाठाची वही त्याच्यासमोर ठेवून म्हणाला, ‘हं, पटकन यात तुझ्या वहीतला आजचा गृहपाठ उतरव आणि कुठे आवाज नाही काढायचा. लक्षात ठेव.’ तनयला फार अपमानास्पद वाटले. पण करतो काय? मुकाटय़ाने त्याने गृहपाठ उतरवला. पण त्याचवेळी त्याने मनाशी ठरवले, ‘मुख्याध्यापकांच्या कानावर हा प्रकार घालायचा. हे अतिच होतंय.’ तनय शाळेत येऊन सायकल स्टँडवर सायकल ठेवून मुख्याध्यापकांच्या कार्यालयाकडे निघाला होता. शरद त्याच्या मित्रांच्या घोळक्यात ऐटीत पारावर बसला होता. ‘अरेच्चा, चांगलाच नालायक आहे हा. माझी तक्रार करायला निघालाय’, शरद पुटपुटला. शेजारी बसलेल्या सुरेशला म्हणाला, ‘सुरेश, तू मित्र ना माझा? मी काय सांगतो ते करणार?’ सुरेश शरदचा अगदी भक्त होता. आपण शरदसारखे व्हावे, सगळय़ांनी आपल्याला घाबरावे, हे त्याचे स्वप्न! तो तत्परतेने म्हणाला, ‘मित्रा, अजमावून तर बघ! त्या तन्याच्या नाकाडावर एक ठोसा दे चांगला. तर तू माझा खरा मित्र!’ सुरेश सरसावला. आपली इनामदारी सिद्ध करायची संधी तो घालवणार नव्हता. त्याने तनयला असा ठोसा मारला की, तो तिरीमिरी येऊन कोसळला. त्याचा चेहरा रक्ताने माखला. मुलं गोळा झाली. शरद तिथून केव्हाच सटकला होता. चौकशी झाली. सुरेशला बालसुधार केंद्रात तीन महिने पाठवायचा ट्रस्टींनी निर्णय घेतला. आईवडील त्याच्यावर संतापले. मित्र तुटले. अभ्यास बुडाला. सुरेशला पश्चात्ताप झाला, पण उशीर झाला होता. आपली कधी एखाद्याशी वादावादी होते. आपल्या सायकलला कुणाचा धक्का लागतो. आपली काही चूक नसताना आपल्याला दोषी धरले जाते. घरी आपल्याला उगीचच बोलणी बसतात.. असे अनेक प्रसंग येतात. आपणच बरोबर आहोत हे तावातावाने पटवून देणे किंवा शांतपणे निघून जाणे हे दोन पर्याय आपल्या जवळ असतात. जेव्हा आपली बाजू ठामपणे मांडणे अगदीच आवश्यक असेल तेव्हा गप्प बसणे चुकीचे, पण प्रत्येक गोष्टीत ‘अरे’ला ‘का रे’ करण्यापेक्षा ‘जाऊ दे’, ही वृत्ती ठेवणे योग्य ठरते.आजचा संकल्प - उठसूट स्वत:च बरोबर असल्याचा आग्रह मी धरणार नाही. अगदी आवश्यक असेल त्याचवेळी माझी बाजू हिरीरीने मांडेन.
ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com