Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

नवी मुंबईच्या मताधिक्यावर पालकमंत्री नाखूश
जयेश सामंत

ठाणे लोकसभा मतदारसंघात दणदणीत असा विजय संपादित केल्यानंतरही ठाणे जिल्ह्णााचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई या आपल्या होम पीचमधून शिवसेना, तसेच मनसेच्या पारडय़ात गेलेल्या सुमारे एक लाख १५ हजार मतांचे आता स्कॅनिंग सुरू केले आहे. ऐरोली तसेच बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आपण कोठे कमी पडलो, याकडे नाईक यांनी स्वत: लक्ष घातले आहे. नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघांतून संजीव नाईक यांना तब्बल एक लाख २४ हजार मते मिळाली आहेत. मीरा-भाईंदरसारख्या मतदारसंघातून एकीकडे २२ हजार मतांचा लीड मिळत असताना, नवी मुंबईत ४४ टक्क्यांच्या घरात मतदान जाऊनही सुमारे ३५ हजार मतांचा मिळालेला लीड हा राष्ट्रवादीला फारसा सुखाविणारा ठरलेला नाही.

खासदार शिवसेनेचा, प्राधान्य शेकाप कार्यालयाला!
पनवेल/प्रतिनिधी - पुनर्रचित मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार शिवसेनेचे गजानन बाबर यांनी सोमवारी पनवेल शहराला भेट दिली. मात्र शिवसेनेची शाखा गाठण्यापूर्वी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. बाबर साडेबारा वाजता पनवेलमध्ये येणार, असे पत्रकारांसह सर्वाना कळविण्यात आले होते; परंतु त्यांना पनवेलला पोहोचेपर्यंत अडीच वाजून गेल्याने नाराजीचे वातावरण होते. शेकाप कार्यालयाला भेट देऊन शिवसेनेची शाखा गाठेपर्यंत त्यांना तीन वाजले, त्यामुळे खासदारांचा पहिल्याच दिवशी लेटमार्क लागला, अशी प्रतिक्रिया पत्रकारांमध्ये उमटली.

यावर्षीही वाजणार आपत्कालीन व्यवस्थेचे तीनतेरा?
उरण/वार्ताहर : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीस विविध शासकीय निर्णयक्षम अधिकारीच गैरहजर राहिल्याने यावर्षीही आपत्कालीन व्यवस्थेचे तीनतेरा वाजणार, असे चित्र दिसत आहे. उरण तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेऊन कोणकोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार दिलीप वाळंज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीसाठी गटविकास अधिकारी सी. पी. पाटील, सा. बां. विभागाचे उपअभियंता पी. एन. देसले, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एल. झेड. घोटेकर, नायब तहसीलदार अमर पाटील, विविध ग्रा. पं. सरपंच, ग्रामसेवक, नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते.

रिलायन्स मोबाइलच्या ८० कंत्राटी कामगारांना नारळ
पनवेल/प्रतिनिधी - पनवेलजवळच्या पळस्पे गावात असणाऱ्या रिलायन्स मोबाइलच्या गोदामातील १२० पैकी ८० कामगारांना अचानक नोकरीवरून कमी केल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कामगारांना त्वरित कामावर न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. पळस्पे येथील रिलायन्सच्या या गोदामात कंत्राटी पद्धतीने काम चालते. कंत्राटदार बदलण्याचे कारण सांगून व्यवस्थापनाने अचानक ८० स्थानिक कामगारांना नोकरीवरून कमी केले. नवीन कंत्राटदाराने त्यांना सेवेत न घेतल्याने या कामगारांनी मनसेच्या नेत्यांकडे धाव घेतली. मनसेचे नवीन पनवेल शहराध्यक्ष सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली अविनाश पडवळ, अतुल चव्हाण, ज्ञानेश्वर येरुणकर, यतीन देशमुख, पराग बालड आदी कार्यकर्त्यांनी व्यवस्थापक नितीन कांबळे यांना जाब विचारला. मात्र कांबळे यांनी कामगारांवर अवास्तव आरोप केल्याने वातावरण तापले. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून शुक्रवारी बैठक घेण्याची सूचना केली. या बैठकीत कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला.