Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

वादळी पावसामुळे मोठे नुकसान
प्रतिनिधी / नाशिक

 

रविवारी रात्री उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात धुळे येथे घराची भिंत कोसळून एक बालिका ठार झाली तर नाशिकच्या मनमाड परिसरात १६ घरे कोसळून १५ जण जखमी झाले. पावसाचा सर्वाधिक तडाखा कांद्याला सहन करावा लागला असून ठिकठिकाणी कांदा चाळी कोसळल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने जळगाव जिल्ह्यात केळीबागा व ऊसही आडवा झाला आहे.
धुळे शहर व परिसरात रात्री साडे दहाला वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. वडजाई-पिंप्री येथे घराची भिंत कोसळून त्याखाली ललिता सुरेश सोनवणे (१०) या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सुनीता सुरेश भील (१३) ही गंभीर जखमा झाली. मुली झोपेत असताना ही घटना घडली. सुनीता हिच्यावर धुळे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील अनेक घरे व जिल्हा परिषदेच्या शाळांचे पत्रे उडाले. नाशिक जिल्ह्य़ात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने उघड्यावर ठेवलेल्या तसेच चाळींमध्ये असलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. काही भागात गारपीटही झाली. मनमाड, लासलगाव, येवला भागात वादळी वाऱ्यात मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली. वादळात कांदा चाळी व शेडचाही निभाव लागू शकला नाही. मनमाड परिसरास पावसाने चांगलेच झोडपून काढले. प्रारंभी पावसाचा जोर कमी असला तरी वाऱ्याने आठवडे बाजारातील ग्राहक व विक्रेत्यांची धावपळ उडविली. मनमाड-मालेगाव रोडवरील कांदा चाळी पूर्णत जमीनदोस्त होवून हजारो क्विंटल कांदा भिजला. करी, माळेगाव गावांमध्ये वादळी वाऱ्याने १५ घरे कोसळून १३ जण जखमी झाले. अनेक घरांचे व शाळांचे पत्रे उडून गेले. राज्यमार्गावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. वादळी वाऱ्याची तीव्रताच धडकी भरवणारी होती. रात्री एक ते दोन या कालावधीत नाशिक शहर परिसरातही अचानक सोसाटय़ाचा वारा वाहू लागला. त्याचा वेग इतका जबरदस्त होता की खिडक्यांची तावदाने खुल्या असणाऱ्या घरांमधील हलक्या स्वरुपाच्या काही वस्तूही खाली पडू लागल्या. त्या आवाजाने जागे झालेल्या नागरिकांची वादळी वाऱ्याचा वेग पाहून अक्षरश: झोप उडाली.
वादळी वारा व पावसाने जळगाव जिल्ह्य़ातही दाणादाण उडविली. पावसामुळे केळी व ऊस पिकाचे नुकसान झाले असून ठिकठिकाणी वृक्ष कोसळल्याने कुठे वाहतूक ठप्प तर कुठे वीज पुरवठा खंडित झाला. शहरात रात्री साडेआठच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वारे सुरू झाले. अर्धा ते पाऊण तास हा प्रकार चालल्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्री ठप्प झालेला वीज पुरवठा सोमवारी दुपापर्यंत पूर्ववत झाला नव्हता. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून १८.७ मिलीमिटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. यावल, फैजपूर, रावेर, मुक्ताईनगर, सावदा, अमळनेर तालुक्यांमध्ये पावसाने तडाखा दिला. यावलच्या साकळी, गिरडगाव, किनगाव, चुंचाळे गावात गारा पडल्याने केळी व ऊस पिकाचे नुकसान झाले. मागील आठवडय़ात काही तालुक्यांमध्ये वादळी पाऊस झाल्याने शेतीचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच हा दुसरा फटका बसला आहे.