Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

तापमान घटल्याने दिलासा
प्रतिनिधी / नाशिक

 

वादळी वाऱ्यासह अनेक भागात पावसाने लावलेली हजेरी आणि आद्र्रतेचे प्रमाण वाढण्याबरोबरच वातावरणात निर्माण झालेला गारवा यामुळे साधारणत महिनाभरापासून उष्णतेच्या तडाख्यात सापडलेल्या उत्तर महाराष्ट्राची सुटका झाली आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात मध्यंतरी ४२ ते ४५ अंशाच्या पुढे झेपावलेला पारा सोमवारी झपाटय़ाने खाली उतरल्याने सर्वानाच दिलासा मिळाला आहे. सोमवारी नाशिकचे तापमान ३२ अंशापर्यंत खाली आले.
नाशिक जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर सोमवारी तापमानात बदल झाले. दिवसभर ढगाळ वातावरण होते. उष्णतेच्या लाटेत अक्षरश भाजून निघालेल्या जळगाव व धुळे जिल्ह्य़ात अशीच स्थिती होती. जळगावमध्ये रात्री दहापासून वादळी वाऱ्यासह दाखल झालेला पाऊस सलग चार ते पाच तास कोसळत होता. धुळे शहरात रस्त्यांवरून पाटासारखे पाणी वाहिले. सोमवारी सकाळपासून या दोन्ही जिल्ह्य़ांसोबत नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरण होते. अधुनमधून सूर्य डोके वर काढत असला तरी सूर्यकिरणांची तीव्रता मात्र फारशी जाणवत नव्हती. रात्रीच्या पावसाने बहुतांश भागात कमालीचा गारवा निर्माण झाला. वातावरणातील याच घडामोडींचा परिणाम तापमान कमी होण्यात झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. यंदा पावसाचे आगमन नेहमीपेक्षा थोडे लवकर होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या पाश्र्वभूमीवर, पुढील काळात तापमान वाढण्याऐवजी कमी होईल. त्याची प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.
राजस्थानकडून वाहत येणारे वारे आणि आद्र्रतेचे प्रमाण कमी झाल्याने एप्रिलच्या अखेरपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र उष्णतेच्या तडाख्यात सापडला होता. या काळात थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकनेही ४२.५ अंशांची नोंद करून गेल्या पाच वर्षांतील सरासरी कमाल तापमानाची पातळी गाठली. भुसावळ व जळगाव येथे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ४७.५ व ४६.५ इतक्या तापमानाची नोंद झाली होती. रणरणत्या उन्हामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. नाशिकच्या हवामान केंद्रात सोमवारी दुपारी ३२.४ अंशांची नोंद झाली. गेल्या सोमवारी येथील कमाल तापमान ३६.४ होते. सप्ताहभरातील आकडेवारीची तुलना केल्यास तापमान चार ते पाच अंशांनी कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वातावरणातील आद्र्रतेचे प्रमाण वाढल्याने उष्णतेचा दाह कमी होण्यास मदत झाली. सोमवारी सकाळी नाशिक शहरात आद्र्रतेचे प्रमाण ६७ टक्के होते. जळगाव, भुसावळ व धुळे येथील तापमानात घट झाली आहे. जळगाव येथे सोमवारी ४२.७ अंशांची नोंद झाली. या ठिकाणीही पाऊस व आद्र्रतेचे प्रमाण वाढल्याने तापमानावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.