Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मनसेची ‘दीवार’ अन् गोडसेंचे ‘राज’!
अभिजीत कुलकर्णी

 

दीवार! केवळ नांव उच्चारताच प्रथम आठवतो तो शशीकपूरच्या खर्जातल्या स्वरातला ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग. हा संदर्भ यंदा नाशिक मतदारसंघात मनसेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो. समर्थ व्यक्तिरेखा, तोंडी असलेले भारदस्त संवाद आणि आवेशपूर्ण अभिनय या जोरावर चित्रपटभर पडलेला अमिताभचा प्रभाव ‘अंडर प्ले’ करणाऱ्या शशी कपूरच्या या एका डायलॉगने जसा धुवून निघतो, तशी काहिशी गत या निवडणुकीच्या बाबतीत येथे पहावयास मिळते. प्रचाराचा धडाका, सलमान खानपासून रवीकिशनपर्यंत सेलिब्रिटीज्चा दणका, शरद पवारांपासून आर. आर. आबांपर्यंत अतिरथी-महारथींचे पाठबळ आणि दस्तुरखुद्द भुजबळ साहेबांनी नाशकात ठोकलेला तळ.. या सगळ्याला मनसेच्या हेमंत गोडसे यांच्याकडे जणू शशी कपूरसारखे एकच उत्तर होते, ते म्हणजे ‘मेरे पास राज है’ ! अर्थात, हा संदर्भ केवळ या प्रसंगापुरताच मर्यादित आहे, चित्रपटातील पात्रांच्या व्यक्तिरेखांचा प्रत्यक्ष उमेदवारांच्या प्रतिमेशी संबंध जोडण्याचा त्यात अजिबात हेतू नाही, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांना राष्ट्रवादीने नाशिकमधून रिंगणात उतरवल्यावर या मतदारसंघाला कधी नव्हे ती झळाळी प्राप्त झाली. त्यातच विरोधकांनी सुरू केलेला विखारी जातीय प्रचार, त्यामुळे भावनावश झालेले भुजबळ, पाठोपाठ शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी पडझड रोखण्यासाठी नाशकात लावलेली हजेरी अन् दुसरीकडे राज यांनी मनसेच्या प्रचाराचा नाशकात फोडलेला नारळ, मतदारसंघात घेतलेल्या तब्बल पाच सभा, त्यामुळे तापत गेलेले वातावरण याच्या परिणामी राज्यभरात नाशिकची लढत लक्षवेधी ठरत होती. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना एवढी एकमेव जागा लढवीत असल्याने त्या पक्षाच्या दृष्टीने जरी ही लढत प्रतिष्ठेची असली तरी वास्तवात सुरुवातीपासून सेना लढतीत फार मागे पडली होती आणि राष्ट्रवादी व मनसेमध्येच सामना रंगेल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, त्याची जाणीव भल्याभल्यांना झाली नव्हती. (लोकसत्ता ‘वृत्तान्त’ने मात्र अगदी प्रथमपासून या बाबीची दखल घेतली होती, एवढेच नव्हे तर याच अनुषंगाने गेल्या ४ एप्रिलच्या अंकातच ‘उरात धडकी भरविण्याची धमक’ या शीर्षकाखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते.)
निवडणूक म्हटल्यावर सगळ्याच शक्यशक्यता विचारात घ्याव्या लागतात. त्या लक्षात घेऊनच कुठे काही कमतरता राहू नये, याची काळजी भुजबळ घेत होते. पक्षातील नाराजांचा गट विरोधी कारवाया करत असल्याचे लक्षात आल्यावर तर भुजबळांनी सारी सूत्रे स्वत:कडे घेत वैयक्तिक ताकदीवरच विजय मिळवायचा चंग बांधला. परिणामी, विजयासाठी जे जे करावे लागते ते ते सारे त्यांनी केले. मग त्यासाठी ठिकठिकाणी घेतलेल्या शेकडो चौकसभा असोत, की शरद पवारांपासून रामदास आठवले अन् विनायक मेटेंपर्यंतच्या नेत्यांचे प्रचार दौरे असोत कशातच काही कमी ठेवली नाही. दुसरीकडे वसंत गीते, अतुल चांडक, नितीन भोसले, सचिन ठाकरे, उत्तरा खेर प्रभृतींनी स्थानिक पातळीवर राबविलेली मनसेची शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा, गीते यांनी आपल्या व्यापक संपर्काचा उपयोग करीत अक्षरश: पिंजून काढलेला मतदारसंघ आणि मनसेच्या पोल मॅनेजर्सनी राज यांच्या प्रचारसभांची केलेली व्यूहरचना मनसेची भक्कम पायाभरणी करीत होती. त्यातच राज यांच्या हरएक सभेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि नवमतदारांचा राज यांच्याकडे असलेला ओढा कमाल दाखवीत होता. नेमकी हीच बाब इतर मंडळी जरी नजरेआड करीत होती तरी कदाचित भुजबळांसारख्या कसलेल्या राजकारण्याने ते हेरले असावे आणि म्हणूनच त्यांनी अखेरच्या सत्रात युवकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने मराठमोळ्या विजय गोखलेंपासून बॉलिवूडमधील अर्जुन रामपाल, सलमान खान, रवीकिशन, रवीना टंडन असे एकापाठोपाठ एक सेलिब्रिटीज् नाशकात आणले असावेत..
या सगळ्यामुळेच वर उल्लेख केलेल्या दीवार मधल्या प्रसंगाची राहून राहून आठवण येते. या चित्रपटात आपल्या भावासमोर मोठय़ा आवेशात मेरे पास ये है, मेरे पास वो है, म्हणणाऱ्या अमिताभला निरुत्तर करण्यासाठी शशी कपूरकडे जसे ‘मेरे पास माँ है’ हे एकमेव अस्त्र होते, तसेच प्रचाराच्या या गदारोळात मनसेच्या हेमंत गोडसे यांच्याकडे एकमेव अस्त्र होते, ते म्हणजे ‘मेरे पास राज है’! शशी कपूरबद्दल सहानुभूती वाटली तरी ‘पॅ्रक्टिकली’ बहुसंख्यांना अमिताभ भावतो व त्यामुळेच हा चित्रपट त्याचा म्हणून ओळखला जातो, तद्वतच व्यवहार्यपणे विचार करणाऱ्या मंडळींनी अखेर भुजबळांना थोडे का होईना, झुकते माप दिल्याने ही निवडणूक त्यांची म्हणूनच ओळखली जाणार. पण, मतदारांची सहानुभूती मोठय़ा प्रमाणावर मनसेला असल्याचे लपून राहिले नसल्याने आणि जिव्हारी लागणाऱ्या या पराभवामुळे त्यामध्ये येत्या काळात वाढच होणार असल्याने उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या - खास करून सेना-भाजप युतीच्या मध्ये किमान नाशकात तरी मनसेची भक्कम ‘दीवार’ उभी असणार, हे निश्चित..