Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक लावणी महोत्सव
नाशिक / प्रतिनिधी

 

‘ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर’ थिरकण्यासाठी येथील मुंबईनाका युवक मित्र मंडळ व बाबाज् थिएटरतर्फे २३ व २४ मे रोजी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अकलुज लावणी स्पर्धेतील विजेत्या लावण्यवतींची अदा पाहण्यासाठी रसिकांना ‘या रावजी, बसा भावजी’ असे प्रेमळ आर्जव करण्यात आले असल्याची माहिती बाबाज् थिएटरचे प्रशांत जुन्नरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाभानगरच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी पाचला होणार आहे.
अकलुज येथे दरवर्षी होणाऱ्या लावणी महोत्सवाप्रमाणे नाशिकमध्येही असा महोत्सव आयोजित करण्यात यावा, यासाठी आपण गेल्या चार-पाच वषार्ंपासून प्रयत्नशिल होतो, अखेर अकलुज लावणी स्पर्धा व मुंबईनाका युवक मित्र मंडळाच्या सहकार्याने आपली इच्छा पूर्णत्वास जात असल्याचे जुन्नरे यांनी सांगितले. ग्रामीण भागातही सध्या रसिकांकडून चित्रपटांमधील ‘आयटम साँग’ च्या धर्तीवर तमाशा कलावंतांनी नृत्य करावे, असा आग्रह धरण्यात येत असल्याने लावणीतील अस्सल नजाकत पाहावयास मिळणे दुर्मिळ झाले आहे. लावणी हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक अनमोल ठेवा असल्याने तिचा अस्सलपणा टिकविण्यासाठी काही संस्था आजही धडपडत असून लावणीचे वेगवेगळे प्रकार त्यांच्यातर्फे सादर केले जातात. अशा संस्थांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी अकलुज येथे दरवर्षी लावणी महोत्सव व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. बाजारूपणाला पूर्णपणे फाटा देत लावणीची श्रीमंती दाखवून देणारा हा महोत्सव त्यामुळेच रसिकांमध्ये विलक्षण लोकप्रिय झाला आहे. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखविता यावे, स्पर्धेत पुरस्कार मिळविता यावा म्हणून कलावंतांमध्ये विलक्षण चुरस असते. या स्पर्धेतील विजेत्या कलावंत नाशिक लावणी महोत्सवात सहभागी होणार असल्याने रसिकांना ही एक परिपूर्ण सांस्कृतिक मेजवानीच असेल.
मोडनिंब येथील भाग्यलक्ष्मी थिएटरच्या मोनिका, राजश्री, संगीता ढाकीफळकर, सागर थिएटरच्या कोमल, शामल, सुनीता लखनगावकर, सणसवाडी येथील जय अंबिका थिएटरच्या रेश्मा व वर्षां परितेकर, वैशाली, प्रिती डिंगोरेकर, तसेच जय अंबिका लोकनाटय़ ग्रुप सहभागी होणार आहे. चौफुलाच्या न्यु अंबिका ग्रुपमधील बरखा-अप्सरा जळगांवकर यांची लावणी हे या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. महोत्सवात ८० नृत्यांगणासह १२० कलावंत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना पिंटु सहाणे, रहेमान भाई यांची आहे.
हा महोत्सव यापुढे दरवर्षी भरविण्यात येणार असून याशिवाय दिवाळीत अकलुज येथील लावणी स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर लावणी स्पर्धा आयोजित करण्याचा मानसही जुन्नरे यांनी व्यक्त केला. महोत्सवाच्या प्रवेशिका कालिदास कलामंदिरमध्ये उपलब्ध असून ५००, ३०० आणि २०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कलाप्रेमींनी महोत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जुन्नरे यांनी केले.