Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मुलांचे भावविश्व
गौरव मातृत्वाचा !

 

आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी पालक हल्ली अधिक जागरूक होत आहेत. पण, गतिमान जीवनशैलीमुळे अनेकदा इच्छा असूनही त्यांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही. त्यामुळे मुलांबाबत केवळ जागरूक राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून मुलांना ‘सकारात्मक’ बनविण्याची खरी गरज आहे. त्या अनुषंगाने, बालरोगतज्ज्ञ व बाल-आहरतज्ज्ञ या नात्याने गेली अनेक वर्षे मुले आणि त्यांचे पालक यांच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या डॉ. शामा कुलकर्णी ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून दर मंगळवारी मुलांच्या भावविश्वाचा वेध प्रस्तुत मालिकेतून घेत आहेत.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’
आपली भारतीय संस्कृती ही प्रेमाच्या पायावर उभी आहे. आज कुठे तरी या वात्सल्याचा, या अनमोल संस्कारांचा ठेवा निस्तेज पडत चालला आहे. ‘वेस्टर्नायझेशन’ चा पगडा इतका वाढत चालला आहे की आत्मपरीक्षण करण्यासाठी थांबायलाच कोणी तयार नाही. भारतीय आणि परकीय संस्कृती यांची तुलना केली तर भारतात तीन चतुर्थाश पिढय़ा एकत्र नांदतात, तर दुसऱ्या देशात चौदा वर्षांनंतर मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहावे लागते. भारतात चाळीशीचा मुलगाही आई-वडिलांना लहानच वाटतो. घरात वडीलधारे असल्यास चाळीशीचा मुलगा क्षुल्लक खर्चसुद्धा आई-वडिलांच्या परवानगीने करतो. परंतु जसजशी विभक्त कुटुंबव्यवस्था व आर्थिक सुबत्ता येत चालली तशी या पैशाची कोठेतरी नशा चढते, पैसे कमविण्याचे व्यसन जडते. आई-वडील चोवीस तास अत्याधुनिक साधने, ऊंची फर्निचर, कारचे नवे मॉडेल मिळविण्याच्या चिंतेत व्यस्त होतात आणि ती निरागस पिले एकटी पडतात. जीवन यांत्रिकपणे सुरू होते. घडय़ाळाच्या काटय़ांप्रमाणे चक्र सुरू राहाते. ज्या वयात बाळाने कुशीत मातेचे दुध प्यायचे, त्या वयात बाळ, बाटली, चार भारी खेळणी पाळणाघरात पोहचविले जातात. जे वय सकाळी नऊपर्यंत घरात मस्त झोपण्याचे, त्या वयात सात वाजताच घरटय़ापासून दूर पळावे लागते.
आईचे दूध, ‘एक ममतेचा झरा’ ज्यामुळे ‘आय.क्यू.’ वाढतो. ज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मूल लांब राहते. निरोगी, सुदृढ मूल तयार होते. परंतु या स्पर्धेच्या युगात घराबाहेर पडणाऱ्या आईचे बाळ या गोष्टींपासून वंचित राहते. त्याच क्षणी एक असुरक्षिततेची भावना वरचे दूध पिणाऱ्या बाळांमध्ये निर्माण होते.
तीच आई सायंकाळी थकून जाते. तिला घरातील सर्व नात्यांना तृप्त करायचे असते. तिला आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श कन्या, आदर्श समाजसेविका अशा असंख्य भूमिका निभावयाच्या असतात. अशावेळी कोणी आपल्या किरकिऱ्या मुलाला नेऊन खेळवेल तर बरे, हा विचार नकळत तिच्या मनात येतो. ही एक काम करणाऱ्या सर्वसामान्यत: महिलांची शोकांतिका असते.
प्रत्येक स्त्रीने हे लक्षात घ्यायला हवे की, मातृत्व एकदा स्वीकारल्यावर मूल वाढवायचे असते, जाणीवपूर्वक घडवायचे असते. त्यात जगातील फार मोठा आनंदाचा खजिना असतो. हा वात्सल्याचा झरा लपवायचा नसतो. तो अभिमानाने फुलवायचा असतो. जगवायचा अन् जगायचा असतो. आपल्या गुलाबाला आलेली पहिली कळी, आपल्या आंब्याच्या झाडाचा पहिला आंबा आपल्याला आनंद देत नाही का?
परवा माझ्याकडे एक माता मुलाची कौतुकाने तक्रार करीत होती. ‘आमचा सोनू म्हणतो, (दोन वर्षांचा) उदबत्तीने चटका देऊ ?’ तिच्या या म्हणण्यावर मी जरा दचकलेच. ‘अगं असे म्हणतो?’
माता - ‘हो पण फक्त आजीलाच, माझ्या सासूला. इतरांना नाही म्हणत !’
मी - ‘अगं, पण हे धोक्याचे आहे.’
माता - ‘नाही, तो काही तसे करीत नाही, पण तो कसा शिकला देव जाणे !’
मी - ‘हे आपोआप होत नाही. तुमच्यापैकी कोणी करीत असेल’
माता - ‘हो म्हणा, तसं त्यानं ऐकलं नाही की मी त्याला भीती दाखवते. एकदा खूपच रडत होता, तर मी त्याला चटका पण दिला होता.’
आता या केसमध्ये त्या मातेनेच त्याला क्रौर्याचा पहिला धडा दिला. या मुलाला जगातील आनंदाची, प्रेमाची जाणीव होण्यापूर्वीच त्याच्या मनात राग, सूड, क्रौर्याच्या विषवृक्षाचे बीज पेरले गेले. याप्रमाणे बालपणातील भावनांच्या जखमा तशाच ठसठसत राहतात. त्या पौगंडावस्थेत अक्राळविक्राळ रुप धारण करतात. पौगंडावस्थेत मुलांच्या शारीरिक अवस्थेत बदल सुरू होतो.
पौगंडावस्था म्हणजे टीन एज-थर्टीन, फोर्टीन ते नाइन्टीन. who प्रमाणे व्याख्या म्हणजे १० ते १९ वर्षे. हा खरे तर दुर्लक्षित वयोगट. छोटय़ा मुलांची काळजी आपण घेतो. मान धरणे, पालथे पाडणे, चालणे यांचे कौतुक करतो. चालताना मूल पडले तरी टाळ्या वाजून प्रोत्साहन देतो. मग त्यावेळी चुकले तर का नाही धपाटा घालत ?
तसेच टीन एज हाही एक वाढीचा टप्पा. या वयातही प्रेमाची, आईने जवळ घेऊन मायेने हात फिरविण्याची गरज असते. पण त्याच वेळी नेमके आपण त्यांचा त्रिशंकू करतो. धड न मोठे ना लहान. एखाद्या प्रसंगी ‘तू यात नाक खुपसू नको. तुला त्यातलं काय कळतं?’ असं म्हणतो तर कधी ‘एवढा घोडा वाढला पण इतकं साधं कसं कळत नाही ’ असं म्हणतो. या वयातील हा Identity Crisis फारच भयानक. कोणी आपलं नाही असं त्यांना वाटतं. पालक पैसे फेकून कर्तव्य करतात, पण यामुळे त्यांच्यातील मन, बाल्य, निरागसपणा कोमेजतो.
ही मुले टीव्हीच्या सान्निध्यात नको ते पाहतात. तीच दुनिया त्यांना खरी वाटते. घरात आई-वडील नसताना रिकामे मन सैतानाचे घर होते. टीव्ही झाला की कॉम्प्युटर गेम त्यांना खिळवून ठेवतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात प्रेमळ धाक लावणारे आजी-आजोबा नाहीत, त्या मुलांनी करायचे काय ?
सैरभैर भटकणारे मन एकटेपणाने पिसाळते. उच्चभ्रू घराण्यातील मुले मॅनर्सच्या नावाखाली एकमेकांशी बोलतही नाहीत. त्यांना खरी मैत्री माहीत नाही. त्यांना शेअरिंग (एकमेकांना देणे-वाटून घेणे) माहीत नाही. आज प्रश्न फक्त झोपडपट्टीपुरता किंवा अमेरिकेचा नसून सर्व पालकांचा प्रश्न झाला आहे. पालक कष्ट करतो, पण पुढे काय ? याचसाठी इतिहास शिकायचा. १९४७ पूर्वी एक काळ असा होता, प्रत्येक घरात जन्माला आलेले मूल ‘मी स्वातंत्र्य मिळवणारच’ या विचाराने झपाटलेले होते. ही मुलेही पौगंडावस्थेतून गेलीच ना ? पण त्यांच्यापुढे ध्येय होते, बांधिलकी होती. ‘माझा शब्द’ याला महत्व होते. तत्वांना महत्व होते. त्यांना ब्रह्मचर्यात अभिमान वाटे. आज या मुलांना कोणी तरी अशी दिशा द्यायला हवी. त्यांना आपण Creativity Aims, Goals द्यायला हवे !
आज पैसा, घर, बंगला, गाडी हे ध्येय नसले म्हणून काय झाले ? कोणत्याही क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करणे व नाव कमावणे हे ध्येय का असू नये ? त्याचबरोबर ही मुले टीव्ही सोडून जर मैदानी खेळ खेळतील तर आपल्याला कोठे तरी हार-जीत स्वीकारावी लागते ही खिलाडू वृत्ती येईल. इगोखेरीज प्रेमभावना, संघभावना येईल. मैदानी खेळामुळे मुले शरिराने आणि मनाने निकोप होतील. तसेच चौरस आहारामुळे शरीर निरोगी राहते. हॉटेलच्या फॅशनमुळे विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे अ‍ॅनिमिया झाल्यास चिडचिडेपणा वाढतो. एकाग्रता कमी होते. Obesity च्या दुष्परिणामांना सामोरे जाण्यास भाग पडते. मूलांना पोळी-भाजी नको वाटते, तर पालक परोठे, मेथी परोठे चालतात आणि त्याला पोषणमूल्य आहे. तसेच इडली, डोसा-सांबर यांतूनही डाळ, तांदूळ, सर्व भाज्या खाल्ल्या जातात ते द्यावे. आता सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निखळ प्रेम !
प्रेमाचा धाक हा सर्व दुष्प्रवृत्तींना लगाम घालतो. लेखात मातृत्वाचा उल्लेख केला याचा अर्थ फक्त आईच जबाबदार आहे, असा नाही. मातृत्व हा शब्द भावना, वात्सल्य या अर्थाने वापरला आहे. वडिलांच्या ऱ्हदयातसुद्धा खोल कोठे तरी एक प्रेमळ वात्सल्याचा झरा लपलेला असतो. पुरूषप्रधान संस्कृतीत पुरूषांना भावना व्यक्त करण्यास मर्यादा घातल्या गेल्या आहेत. पण हे वात्सल्य मात्र ‘माझं बाळ तो’ म्हणून मुलाला थोपटणारं वात्सल्य, सुख-दु:ख, यशापयशात सुंदर अथवा कुरूप, अव्यंग व सव्यंग मुलांवर सारखेच प्रेम करणारे वात्सल्य. क्षमाशील वात्सल्य. नि:पक्षपाती वात्सल्य. गाडी कधीच रुळावरून घसरू देत नाही. हे अध्याऱ्हत असून मात्र मुलांना कळणार नाही, म्हणून दिवसभर तुम्ही लांब असा किंवा जवळ, रागवा, शिक्षा करा, पण झोपण्यापूर्वी त्या वात्सल्याची आठवण ठेवून त्या मुलाला जवळ घ्या ! दिवसभराचे सर्व विसरून प्रेमाने झोपू द्या ! या वात्सल्यमंत्राने कितीतरी मुले दात खायची थांबतील. गादीत शू करेनाशी होतील. एकदा अनुभूती तर घ्या ! मग या सगळ्यांवर काही उपाय आहे का ? होय ! नक्कीच. म्हणून तर आपण पालक शाळा घेतो. पॅरेटिंग प्रोग्राम घेतो. ही झाली छोटीशी पालकत्वाची कहाणी. 'Precention is better than cure' असे आमचे वैद्यकीय शास्त्र सांगते. आपले मूल पौगंडावस्थेतून सहीसलामत युवावस्थेत जाण्याकरिता सर्व पालकांना ही पालकत्वाची गुरूकिल्ली !
०२५३ - २३२२००१
९८२३०५८५२७