Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यातील वीज समस्येवर तीन वर्षांंत मात
महावितरणचे कार्यकारी संचालक उत्तम झाल्टे यांचा विश्वास
नाशिक / प्रतिनिधी

 

राज्यातील वीज टंचाईवर मात करण्यासोबतच पायाभूत विकास आराखडय़ातून वीजवहनाचे जाळे भक्कम करण्याची प्रक्रिया वेगात आली आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षांत राज्यात वीजप्रश्न अस्तित्वात राहणार नाही, असा विश्वास महावितरणचे कार्यकारी संचालक उत्तम झाल्टे यांनी व्यक्त केला. एकलहरे येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
कार्यकारी संचालक झाल्टे यांनी नाशिक ग्रामीण आणि शहर मंडळातील उपस्थित अभियंते, लेखाधिकारी यांच्याशी संवाद साधला. राज्यात नव्हे तर देशात जगात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात अकराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत ९० हजार मेगाव्ॉट विजेची निर्मिती होणार आहे. यासह आशियातील देशांनी एकत्रित येऊन विजेच्या प्रश्नावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे, असे झाल्टे म्हणाले.
ब्रह्मदेशात गॅसची उपलब्धता मुबलक आहे. परंतु हा गॅस बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान ब्रद्मदेशाकडे नाही. दुसरीकडे सुमारे सात लाख लोकसंख्येच्या भूतान देशात तब्बल ८५ हजार मेगाव्ॉट जलविद्युत निर्मिती होऊ शकेल, अशी क्षमता आहे. त्यासाठी एकही घर विस्थापीत होणार नाही, अशी नैसर्गिक अनुकूलता आहे. या पाश्र्वभूमीवर आशियात वीज निर्मितीला चालना देण्यासाठी आणि भारतात जशी नॅशनल ग्रीड आहे, त्याच धर्तीवर येत्या काळात आशिया ग्रीड स्थापन करण्याबाबत नवी दिल्ली येथे आशियाई देशांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती झाल्टे यांनी दिली.
यावेळी संगणकीय सादरीकरणातून झाल्टे यांनी ग्राहकाभिमुख सेवा देण्यासोबतच महावितरणचे अभियंते, अधिकारी म्हणून असलेली कर्तव्ये, कार्यप्रणाली आदींबाबत विशेष मार्गदर्शन केले. याशिवाय फोटो मीटर रिडींग, मान्सूनपूर्व दुरूस्तीचे कामे, वीजगळतीविरुद्ध उपाययोजना आदींबाबत आढावा घेतला. या बैठकीत अधीक्षक अभियंता दत्तात्रय तेल्हारकर यांनी संगणकीय सादरीकरणातून नाशिक ग्रामीण मंडलाने राबविलेल्या नव्या तांत्रिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी अधीक्षक अभियंता बी. के. जनवीर (इन्फ्रा), चंद्रकिशोर हुमणे (प्रभारी, नाशिक शहर) तसेच उपव्यवस्थापक (लेखा) बी. के. धनवे, उपमहाव्यवस्थापक (आय. टी.) पी. के. आहेर, प्रभावी व्यवस्थापक (कर्मचारी) श्रीपत निकम आदींसह कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी, सहाय्यक तसेच कनिष्ठ अभियंते, लेखाधिकारी आदींची उपस्थिती होती. कनिष्ठ अभियंता एस. के. देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.