Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

(सविस्तर वृत्त)

गावागावात ‘देवराई’ निर्माण होण्याची गरज - मारुती चितमपल्ली
नाशिक / प्रतिनिधी

 

जोपर्यंत गावागावात देवराई निर्माण होत नाही, शहरा-शहरात तपोवन निर्माण होणार नाही, तोपर्यंत निसर्गातील अनेक संकटांना तोंड देण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ पंचवटी, नेचर क्लब ऑफ नाशिक व सायन्स फिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथे ‘देवराईचे महत्व’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर वनसंरक्षक व्ही. के. मोहन, पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, वैद्य विक्रांत जाधव, प्रा. आनंद बोरा, सचिन शहा उपस्थित होते. इन्स्टिटय़ुट ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात चितमपल्ली यांनी वृक्षतोडीसंदर्भातील विविध मुद्यांवर मत व्यक्त केले.
शहरात व शहराबाहेर हजारो वृक्ष तोडली जातात, पण शोभेची झाडे लावून शहर सुंदर करण्याचा प्रकार घातक असून वड, उंबर, पिंपळ, कदम्ब, कडुलिंब आदी वृक्षांचे रोपण होणे आवश्यक आहे. महामार्गावर निवडूंग, जाट्रोफा, अगेव, शेर आदी झाडे दुभाजकांमध्ये लावल्यास या वृक्षांमुळे कार्बन डायऑक्साईड कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साडेतीन हजार देवराई होत्या. देवराई म्हणजे स्थानिक देवतांच्या नावाने उभारलेले मंदीर. या मंदिरांजवळ लावलेली दाट वृक्षझाडी तोडल्यास कोप होतो म्हणून अबाधित राहिलेली वृक्षराजी म्हणजे देवराई. शेकडो जातींच्या औषधी वनस्पती, दुर्मिळ झाडे आदींचे संगोपन करण्याशिवाय देवराईला पर्याय नाही असे ते म्हणाले.
यावेळी प्रसिद्ध निवेदक प्रदिप भिडे यांचे निवेदन असणारी व गोरेगावच्या प्रबोधन संस्थेने तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली. याच कार्यक्रमात पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांचा अमृतमहोत्सवानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी नाशिककरांच्या वतीने चितमपल्लींना त्यांच्या छायाचित्रांचा अल्बम भेट दिला.