Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९


तंतोतंत आडाखे! विविध कारणांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील ठिकठिकाणच्या लढती अत्यंत गुंतागुंतीच्या व चुरशीच्या बनल्या होत्या. परिणामी, मतदानानंतरही नेमके कोण विजयी होईल, त्याबाबत नेमका दावा करणे वा ठोस भाकिते करण्यास जाणकार म्हणविणारी मंडळीही धजावत नव्हती. अशावेळी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला लोकसत्ता ‘वृत्तान्त’ने साऱ्या शक्याशक्यतांचा विचार करून काही गृहितकांच्या आधारे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या सहाही मतदारसंघांमधील निकाल कसे असतील, कुणाच्या विजयाची किती प्रमाणावर शक्यता आहे, दुसऱ्या, तिसऱ्या वा चवथ्या क्रमांकावर कोण असतील, त्याचे विवेचन प्रसिद्ध केले होते. ते एवढे तंतोतंत जुळले की, प्रत्यक्षात निकाल जसजसे जाहीर होऊ लागले तसतसा अभिनंदनपर दूरध्वनी व एस.एम.एस. यांचा ओघ वृत्तान्त चमूकडे सुरू झाला. अनेकांनी तर, ‘दुसऱ्या दिवशी इतरांनी जे निकाल प्रसिद्ध केले ते एकाअर्थी तुम्ही आदल्याच दिवशी दिले’, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली, हे विशेष.

वादळी पावसामुळे मोठे नुकसान
प्रतिनिधी / नाशिक

रविवारी रात्री उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात धुळे येथे घराची भिंत कोसळून एक बालिका ठार झाली तर नाशिकच्या मनमाड परिसरात १६ घरे कोसळून १५ जण जखमी झाले. पावसाचा सर्वाधिक तडाखा कांद्याला सहन करावा लागला असून ठिकठिकाणी कांदा चाळी कोसळल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने जळगाव जिल्ह्यात केळीबागा व ऊसही आडवा झाला आहे.

तापमान घटल्याने दिलासा
प्रतिनिधी / नाशिक

वादळी वाऱ्यासह अनेक भागात पावसाने लावलेली हजेरी आणि आद्र्रतेचे प्रमाण वाढण्याबरोबरच वातावरणात निर्माण झालेला गारवा यामुळे साधारणत महिनाभरापासून उष्णतेच्या तडाख्यात सापडलेल्या उत्तर महाराष्ट्राची सुटका झाली आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात मध्यंतरी ४२ ते ४५ अंशाच्या पुढे झेपावलेला पारा सोमवारी झपाटय़ाने खाली उतरल्याने सर्वानाच दिलासा मिळाला आहे. सोमवारी नाशिकचे तापमान ३२ अंशापर्यंत खाली आले.

मनसेची ‘दीवार’ अन् गोडसेंचे ‘राज’!
अभिजीत कुलकर्णी

दीवार! केवळ नांव उच्चारताच प्रथम आठवतो तो शशीकपूरच्या खर्जातल्या स्वरातला ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग. हा संदर्भ यंदा नाशिक मतदारसंघात मनसेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो. समर्थ व्यक्तिरेखा, तोंडी असलेले भारदस्त संवाद आणि आवेशपूर्ण अभिनय या जोरावर चित्रपटभर पडलेला अमिताभचा प्रभाव ‘अंडर प्ले’ करणाऱ्या शशी कपूरच्या या एका डायलॉगने जसा धुवून निघतो, तशी काहिशी गत या निवडणुकीच्या बाबतीत येथे पहावयास मिळते.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक लावणी महोत्सव
नाशिक / प्रतिनिधी

‘ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर’ थिरकण्यासाठी येथील मुंबईनाका युवक मित्र मंडळ व बाबाज् थिएटरतर्फे २३ व २४ मे रोजी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अकलुज लावणी स्पर्धेतील विजेत्या लावण्यवतींची अदा पाहण्यासाठी रसिकांना ‘या रावजी, बसा भावजी’ असे प्रेमळ आर्जव करण्यात आले असल्याची माहिती बाबाज् थिएटरचे प्रशांत जुन्नरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुलांचे भावविश्व
गौरव मातृत्वाचा !

आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी पालक हल्ली अधिक जागरूक होत आहेत. पण, गतिमान जीवनशैलीमुळे अनेकदा इच्छा असूनही त्यांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधता येत नाही. त्यामुळे मुलांबाबत केवळ जागरूक राहण्यापेक्षा त्यांचे मित्र बनून मुलांना ‘सकारात्मक’ बनविण्याची खरी गरज आहे. त्या अनुषंगाने, बालरोगतज्ज्ञ व बाल-आहरतज्ज्ञ या नात्याने गेली अनेक वर्षे मुले आणि त्यांचे पालक यांच्या सततच्या संपर्कात असणाऱ्या डॉ. शामा कुलकर्णी ‘नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून दर मंगळवारी मुलांच्या भावविश्वाचा वेध प्रस्तुत मालिकेतून घेत आहेत.

डॉ. एकनाथ ब्राह्मणकर यांचा गौरव
नाशिक / प्रतिनिधी

येथील डॉ. एकनाथ ब्राह्मणकर यांना महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेतर्फे ‘कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट एज्युकेशन अ‍ॅक्युमेन अवॉर्ड देऊन नुकतेच गौरविण्यात आले. गोरेगाव येथील न्यू झील्ड होस्टेल येथे नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते ब्राह्मणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ब्राह्मणकर यांनी मालेगाव, अमळनेर व धुळे येथे नऊ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेचे ते माजी अधिष्ठाता आहेत. १९६८ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. १९६९ ते १९९६ या कालावधीत त्यांनी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सिन्नर, पिंपळगाव बसवंत, सटाणा व देवळाली कँप येथील महाविद्यालयांचे प्राचार्यपद भूषविले. ब्राह्मणकर यांनी आतापर्यंत ३२ ग्रंथांचे लेखन केले आहे. पुणे विद्यापीठाच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ब्राह्मणकर यांना मिळालेला पुरस्कार वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी आहे. वाणिज्य परिषदेच्या वतीने हिंदुजा वाणिज्य महाविद्यालय, मुंबईव्दारे सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हिंदुजा समुहाचे दास मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू ए. डी. सावंत, प्राचार्य टी. ए. शिवरे, विठ्ठल कामत, प्रा. पंडित पलांडे आदी उपस्थित होते.

वाहतूक बेटे निर्मितीची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

वाढती लोकसंख्या, रहदारी, अनियंत्रित वाहतूक व्यवस्था या कारणांनी शहरातील वाहतूक व्यवस्था ढासळली आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध ठिकाणी सिग्नल, वाहतूक बेटे तयार करण्यात यावीत, अशी मागणी आ. डॉ. वसंत पवार यांनी केली आहे.
शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड या भागात बहुतेक सहकारी, राष्ट्रीयकृत, खासगी बँका, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात रहदारीचे प्रमाण जास्त आहे. शहरातील सामान्य जनता सुरक्षितपणे रस्त्यावर वावरू शकेल यासाठी शहरात मखमलाबाद नाका, पतंग हॉटेल चौक, सिनेमॅक्स चौक, गोदावरी बँक सर्कल, मविप्र कॅम्पस, रावसाहेब थोरात सभागृह चौक या ठिकाणी सिग्नल व्यवस्था त्वरित कार्यान्वित करण्याची गरज पवार यांनी पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांना निवेदनात व्यक्त केली आहे. या वाहतूक बेटामुळे वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल तसेच नाशिकच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने सदर घटना नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद असेल. हा चौक विकसित करण्यासाठी येणारा खर्च संस्थेतर्फे केला जाणार असून याबाबत महानगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सदर चौकाचे ‘मविप्र मॅरेथॉन चौक’ असे नामकरण करून त्याठिकाणी वाहतूक बेट तयार करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी पवार यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

सिन्नरजवळील अपघातात वरपित्यासह दोघे ठार
प्रतिनिधी / नाशिक

लग्नसोहळा आटोपून राहुरीकडे परत निघालेल्या वऱ्हाडींच्या अल्टो कारला रविवारी मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात झालेल्या अपघातात वरपित्यासह दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिलांसह एका मुलाचा समावेश आहे. नुकतीच सिन्नर तालुक्यातल्याच नांदुरशिंगोटे नजीक अशीच घटना घडून त्यातही विवाह समारंभ आटोपून परतणाऱ्या कुटुंबियांतील चार जण ठार झाले होते. रामदास हरिभाऊ गव्हाणे (५०) व त्यांचे वडील हरिभाऊ गव्हाणे (७०, दोघेही रा. कुक्कुडवेढे) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये गीतांजली हापसे (२५), वेदांत हापसे व दीपिका मोरे यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रामदास गव्हाणे यांच्या मुलाचा विवाह रविवारी सायंकाळी नाशिक येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांच्या मुलीशी पार पडला. वऱ्हाडी मंडळी रात्री राहुरी तालुक्यातील आपल्या गावाकडे परतण्यास निघाली. यावेळी रामदास गव्हाणे अल्टो कारद्वारे आप्तांना घेऊन निघाले होते. रात्री दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी शिवारात समोरून भरधाव येणाऱ्या मालमोटारीने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात रामदास गव्हाणे व हरिभाऊ गव्हाणे जागीच ठार झाले तर कारमधील अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

श्रीराम बँकेच्या अवसायकांपुढे कर्जवसुलीला वेग देण्याचे आव्हान
प्रतिनिधी / नाशिक

श्रीराम सहकारी बँकेचे अवसायक शरद जरे यांनी राजीनामा दिल्यामुळे सेवानिवृत्त सहलेखा परीक्षक पी. डब्ल्यू. पाटील यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक व इतर पदांची जबाबदारी असल्याने अवसायक म्हणून आपल्याला पूर्णवेळ देता येत नसल्याच्या कारणास्तव जरे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाच्या मनमानी व नियमबाह्य़ कारभारामुळे श्रीराम सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली होती. रिझव्‍‌र्ह बँकेने श्रीराम बँकेकडून दंडही वसूल केला होता. अखेर रिझव्‍‌र्ह बँकेने बँकेला अवसायनात काढले. बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नवीन अवसायक म्हणून नियुक्त झालेले पाटील कर्जवसुलीला कसा वेग देतात याकडे ठेवीदार व खातेदारांचे लक्ष लागले आहे.