Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

प्रभाकरनचा जन्म जाफना द्वीपकल्पात उत्तर किनाऱ्यावरील वेलवेट्टीथुराई या शहरात झाला. चार भावंडांपैकी तो एक होता. त्याचे वडील सरकारी अधिकारी होते व त्याने लहानपणीच शाळा सोडली होती. शाळेत एक सामान्य मुलगा असलेल्या प्रभाकरनपुढे नेपोलियन व अलेक्झांडर दि ग्रेट यांचे आदर्श होते. सुभाषचंद्र बोस व भगतसिंग या दोघा भारतीयांनी ब्रिटिशांविरूद्ध जो लढा दिला त्यांचाही आदर्श त्याच्यापुढे होता. लहान असतानाच तो राजकीयदृष्टय़ा सक्रिय झाला. राजकारणात सिंहली लोकांचे तामिळींवर असलेले वर्चस्व त्याला सतावित होते. १९७२ मध्ये त्याने काही तरूण पोरांना घेऊन तामिळ न्यू टायगर्स ही संघटना उभी केली व नंतर १९७५ मध्ये तिचे नामकरण तामिळ टायगर्स ऑफ तामिळ ईलम असे करण्यात आले. वेलिकेड तुरूंगातील हत्याकांड प्रकरणात कुट्टीमनी व जगन या तामिळ वाघांना लष्करी दलांनी ठार केले तेव्हा या संघटनेची आक्रमकता वाढली, ती नंतर वाढतच गेली. १९७५ च्या सुमारास त्याला जाफनाच्या महापौरांच्या खून प्रकरणात अटक झाली. तो त्याच्यावरचा पहिला गुन्हा होता. १९८३ मध्ये त्याने गनिमी युद्ध सुरू केले व आशियातील एका मोठय़ा संघर्षांची सुरूवात झाली. आताच्या संघर्षांत प्रभाकरन मारला गेला, त्याचा लढा संपला पण सिंहलींकडून तामिळींना मिळत असलेली वागणूक व तामिळींच्या इतर मागण्या संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे तामिळ अस्मितेचे स्फुलिंग पुरते विझले असे ठामपणे म्हणता येणार नाही. ल्ल

एलटीटीईचा पराभव का झाला?
श्रीलंकेच्या लष्करी दलांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम या संघटनेच्या बंडखोरांशी ज्या पद्धतीने चौथ्या लढाईत यश मिळवले ते पाहता त्यांच्या युद्धतंत्रातील बदलाची नोंद सगळ्या जगाला घ्यावी लागली आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशाला अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला पकडता आले नाही पण श्रीलंकेने मात्र प्रभाकरनचा शेवट करण्यात यश मिळवले, ही गोष्ट बरेच काही अधोरेखित करणारी आहे. विशेष म्हणजे अल काईदासारख्या संघटनांनी एलटीटीईकडूनच युद्धतंत्राची दीक्षा घेतली आहे यावरून एलटीटीईचे युद्धतंत्र किती प्रगत व विनाशकारी होते याची कल्पना येते अशा संघटनेला गुडघे टेकायला लावणे ही सोपी गोष्ट नव्हती. गेली २५ वर्षे त्यांचे पंधरा हजार बंडखोर गनिमी काव्याने लढत होते. पण नंतर उलट स्थिती झाली. श्रीलंकेचे लष्कर गनिमी काव्याने लढले व प्रभाकरन पारंपरिक पद्धतीत अडकला, त्यामुळे एलटीटीईचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाचे आणखी एक कारण होते ते म्हणजे प्रभाकरन हा आत्मकेंद्री होता. तो सहजासहजी कुणाचे ऐकत नसे. फार तर तो त्याच्या विश्वासू सहकाऱ्यांशी डावपेचांची चर्चा करीत असे. दुसरे कुणी काही सांगितले तर त्याला पटायचे नाही त्यामुळे त्याला बदललेल्या परिस्थितीचे भान नव्हते. त्याला त्याच्या संघटनेतील राजकीय बुद्धिमत्ता असलेल्या लोकांचा वापर करता आला नाही. महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात तामिळ बंडखोरांचा हिंसाचार मोडून काढण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रभाकरनला धुंदी चढली होती. त्यात त्याने या धोक्याकडे दुर्लक्ष केले व आत्ममग्न राहिला. त्याने अध्यक्षीय निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने तामिळी लोक विक्रमसिंगे यांना मतदान करू शकले नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या वागण्यात सुसंगतता नव्हती. २००२ ची शांती प्रक्रिया हा एलटीटीईचा विजय आहे अशा भ्रमात तो राहिला. मानवी हक्कांची पायमल्ली तर मोठय़ा प्रमाणात झाली. त्याने त्याच्या सैन्यात मुलांची, महिलांची भरती केली होती. राजपक्षे यांनी एलटीटीईची आंतरराष्ट्रीय रसद व गुप्तचर मदत संपवली होती. त्यामुळे त्यांची आर्थिक नाकेबंदी झाली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केल्याने त्याने भारताची तामिळांबाबत असलेली सहानुभूती गमावली होती, त्यामुळे भारताचा आधारही संपलेला होता. भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल सतीश नंबियार यांच्या मते फोनसेका यांनी श्रीलंकेच्या लष्करी दलांमध्ये नवीन जान आणली व त्यांना प्रेरित केले त्याचाही फायदा लष्कराला झाला व एलटीटीई निष्प्रभ ठरली. त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. ज्या मानवी संरक्षक फळीचा आधार एलटीटीईने घेतला त्याच नागरिकांना त्यांनी गोळ्या घालायला सुरुवात केली त्यामुळे जनतेची सहानुभूतीही त्यांनी गमावली होती. लष्कराने या बंडखोरांना विखरायला लावले व नंतर त्यांच्यावर आघात केले. हे करताना लष्कराची फळी कमकुवत होऊ दिली नाही.

त्याचे आदर्श होते नेपोलियन आणि अलेक्झांडर
गेली अनेक वर्षे आपण वेलुपिल्लई प्रभाकरनचे नाव ऐकतो आहोत. काही दशकांपासून चाललेल्या त्याच्या लढय़ाने आज अखेरचा श्वास घेतला. एक मोठा संघर्ष संपला. श्रीलंका सरकारने बरोबर वेळ साधून अचूक तंत्राचा अवलंब करीत तामिळ ईलमचा लढा संपवला . प्रभाकरन हा जगातील सर्वात खतरनाक अशा लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम या संघटनेचा नेता. त्याची तुलना पोल पॉट किंवा ओसामा बिन लादेन या दहशतवाद्यांशी केली जायची, पण त्याच्या समर्थकांसाठी तो दहशतवादी नव्हता तर खंदा लढवय्या होता. तामिळींच्या हक्कांसाठी लढणारा सैनिक होता. गेली तीन दशके लढा देणाऱ्या प्रभाकरनपुढे आदर्श होते ते नेपोलियन बोनापार्ट व अलेक्झांडर दि ग्रेट यांचे. त्याने अनेकदा खुनाचे प्रयत्न तसेच मृत्यूला हुलकावणी दिली, एकांडय़ा शिलेदारासारखा अल्पसंख्य तामिळींसाठी तो लढत राहिला. एकवेळ असे दिसायला लागले होते की, प्रभाकरन जिंकतोय, उत्तर श्रीलंकेतील एका छोटय़ाशा प्रांतावर त्याने कब्जा जमवला होता. तेथे त्याने न्यायालये स्थापन केली, पोलीस दलही एलटीटीईचेच, बँकाही तामिळ ईलमच्या होत्या. जिथे हे सगळे घडत होते ते ठिकाण कोलंबोपासून फार लांब नव्हते. पण त्यानंतर प्रभाकरनने युद्धबंदीचे अनेक करार मोडले. राजकीय तोडग्यासाठी नॉर्वेने सुरू केलेले प्रयत्नही फसले. यावर्षी श्रीलंकेच्या लष्कराने जी व्यूहरचना केली होती ती मात्र प्रभाकरनला भेदता आली नाही. आज तो अॅम्ब्युलन्समध्ये बसून पळून जात असताना त्याला लष्कराने गोळ्या घातल्या. आताच्या निकराच्या लढाईत प्रभाकरनने गळ्यात सायनाईडची गोळी बांधलेली होती व अंगरक्षकांना त्याने असे सांगितले होते की, मी पकडला जाऊ नये यासाठी वेळ आल्यास मला ठार करा व ओळखू येऊ नये यासाठी जाळून टाका. श्रीलंका सरकारसाठी प्रभाकरन हा दहशतवादी होता पण तामिळींसाठी तो बंडखोर अशा तामिळी राष्ट्रवादाचे प्रतीक होता. जगभरात त्याचे समर्थक होते ते त्याची छबी असलेले पोस्टर्स, कॅलेंडर्स, घडय़ाळे वापरीत असत. त्याने संरक्षणासाठी नागरिकांच्या वस्त्यांचा वापर केला होता. ईशान्य श्रीलंकेत जेव्हा शेवटची लढाई झाली तेव्हा एलटीटीईने याच सुरक्षा फळीतील पळणाऱ्या नागरिकांना गोळ्या घातल्या. प्रभाकरनचे साथीदार सांगतात की, एकवेळ अशी आली होती की, प्रभाकरन हा लढा सोडायला तयार होता व राजकीय तोडग्यासाठी त्याने तयारी दर्शवली होती. २००२ मध्ये त्याने पत्रकार परिषद घेतली होती, त्यात त्याने त्याचा हिरवा पोशाख उतरवून समेटाची तयारी दर्शवली होती. एलटीटीई ही दहशतवादी संघटना आहे हे त्याला मान्य नव्हते. त्याच्या मते ती स्वातंत्र्याची चळवळ होती. एलटीटीईच्या या लढय़ाने आजपर्यंत ७० हजार लोकांचे बळी घेतले, त्यात सिंहली होते व तामिळीही होते.

प्रभाकरन कोण होता?
वेलुपिल्लई प्रभाकरनचा जन्म जाफनाजवळच्या वेलवेट्टीथुराय शहरात झाला. त्याचे लाडके नाव थंबी म्हणजे (लहान भाऊ). मार्शल आर्ट्समध्ये पारंगत. १ ऑक्टोबर १९८४ मध्ये माधी वधानी हिच्याशी विवाहबद्ध. त्याचा हा विवाह चेन्नईत तिरुपोरूर येथे झाला. त्याच्या मुलीचे नाव द्वारका, मुले चार्लस अँथनी व बालचंद्रन. यातला चार्लस शेवटच्या लढाईतही आघाडीवर होता.

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम
लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम म्हणजेच एलटीटीई या संघटनेची स्थापना प्रभाकरनने १९७५ च्या सुमारास केली. श्रीलंकेत अल्पसंख्य तामिळींवर सिंहली बहुसंख्याक लोकांचे अत्याचार व दडपशाही यातून तामिळ अस्मितेची ही चळवळ उभी राहिली पण ती पुढे हिंसाचारामुळे दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली.जंगलात राहून गनिमी काव्याने लढण्याचे त्याचे तंत्र होते. आत्मघातकी बॉम्बर ही संकल्पना त्यानेच प्रथम आणली. त्यासाठी तरुण महिलांचा उपयोग केला. या संघटनेला युरोप व जगातील इतर काही देशांकडून अर्थपुरवठा होत होता. या संघटनेचे वैशिष्टय़ म्हणजे टायगर्स( भूदल), सी टायगर्स (नौदल) व एअर टायगर्स (हवाई दल) अशा तीनही सेना त्यांच्याकडे होत्या ब्लॅक टायगर्स हे आत्मघाती पथक होते. सुमारे चार हजार महिलांनी आत्मघाती बॉम्बस्फोटात मरण पत्करले. एलटीटीई ही जगातील अत्यंत धोकादायक व क्रूर हल्ल्यांचे युद्धतंत्र वापरणारी दहशतवादी संघटना आहे व त्यांच्यापासूनच अल काईदासारख्या संघटनांनी प्रेरणा घेतली ,असे एफबीआय या अमेरिकी गुप्तचर संस्थेने म्हटले आहे.

राजीव गांधी हत्येची प्रभाकरनलाही वाटली होती खंत!
भारतात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना वाढता जनाधार लाभत होता. दिवस होता २१ मे १९९१. तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदूर या आडवाटेवरच्या गावी रात्री राजीवजींचा अनपेक्षित दौरा झाला आणि या दौऱ्यातील सभेतच ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’च्या आत्मघातकी अतिरेक्यांनी भारताच्या राजकीय क्षितिजावरील या सर्वात तरुण नेत्याचा बॉम्बस्फोटात बळी घेतला. या घटनेला १८ वर्षे उलटत असतानाच मे महिन्यातच आणि भारतात लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी वातावरण भारले असतानाच ‘एलटीटीई’चा प्रमुख प्रभाकरन याचीही अखेर झाली आहे! मृत्युसमयी राजीव यांचे वय ४६ होते तर प्रभाकरनचे वय ५४ होते. राजीव गांधी हत्या खटल्यात प्रभाकरन हा मुख्य आरोपी होता. २००२ साली नॉर्वेच्या पुढाकाराने श्रीलंका सरकारबरोबर त्याने शांततेसाठी बोलणी सुरू केली त्यावेळी पत्रकार परिषद घेतली होती. प्रभाकरनची ही शेवटची जाहीर पत्रकार परिषद होती. त्यात राजीव हत्येबाबत प्रश्न येताच ‘ती दुर्दैवी घटना होती’, या एका वाक्यात त्याने उत्तर दिले. याच पत्रकार परिषदेत एलटीटीईच्या घातपातातील निर्णयप्रक्रिया पार पाडणारे बालसिंघम यांनी तर, जे दहा वर्षांपूर्वीच्या त्या घटनेतून बाहेर आलेले नाहीत ते भूतकाळात अडकले आहेत, अशी शेरेबाजी करीत राजीव हत्येबाबतचे प्रश्न उडवून लावले होते. त्याच बालसिंघम यांनी नंतर एका मासिकाला मुलाखत देताना, राजीव यांची हत्या ही घोडचूक होती, अशी कबुली दिली होती. भारत सरकारने त्या हत्येतून निर्माण झालेले पूर्वग्रह दूर ठेवावेत आणि तामिळींच्या हितासाठी आम्हाला साह्य करावे, असे आवाहनही त्याने केले होते.

१९७२- सिलोनचे नाव श्रीलंका झाले. देशात बौद्ध धर्म प्रमुख बनला,त्यानंतरच्या काळात अल्पसंख्य तामिळींत आणखीनच दडपले गेल्याची भावना निर्माण झाली.
१९७६-वेलुपिल्लई प्रभाकरन याने लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम या संघटनेची स्थापना केली.
१९७७- तामिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट हा पक्ष स्थापन झाला. तामिळ बहुल भागात त्यांना चांगले यशही मिळाले. तामिळ विरोधी दंगलीत १०० तामिळ ठार.
१९८१- जाफनात वाचनालयाची जाळपोळ, त्यामुळे तामिळी समुदाय आणखी संतापला.
१९८३- एलटीटीईच्या हल्ल्यात १३ सैनिक ठार, पुन्हा तामिळविरोधी दंगली.
१९८५- श्रीलंका सरकार व एलटीटीई यांच्यातील शांतता बोलणी फिसकटली.
१९८७- श्रीलंका लष्कराने एलटीटीईला जाफनापर्यंत मागे पिटाळले. भारत-श्रीलंका यांच्यात शांतीसैन्य पाठवण्यााचा करार.
१९९०- भारतीय शांती सेना श्रीलंकेतून माघारी. हिंसाचार वाढला.
१९९१-माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूत श्रीपेरूम्पदूर येथे हत्या.
१९९३- एलटीटीईकडून श्रीलंकेचे अध्यक्ष प्रेमदासा यांची हत्या.
१९९४-चंद्रिका कुमारतुंग सत्तेवर. एलटीटीईशी चर्चा सुरू.
२००२- श्रीलंका व एलटीटीई यांच्यात शस्त्रसंधी करार. नॉर्वेची मध्यस्थी.
२००४-तामिळ कमांडर करुणा एलटीटीईतून बाहेर पडला व भूमिगत झाला
२००५- परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरगमार यांची हत्या.
जानेवारी २००८- सरकारने शस्त्रसंधी मोडीत काढली.
जुलै २००८- विदातातिवू हा महत्वाचा तळ ताब्यात घेतल्याचा लष्कराचा दावा.
एप्रिल २००९- मुलायटिवू हा बालेकिल्ला लष्कराच्या ताब्यात.
मे २००९- अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी एलटीटीई पराभूत झाल्याची घोषणा केली.
एलटीटीईला पराभव मान्य.प्रभाकरनचा मुलगा चार्लस अँथनी व अनेक बंडखोर नेते ठार. प्रभाकरनला गोळ्या घातल्या.

एलटीटीईने बळी घेतलेले नेते
माजी पंतप्रधान राजीव गांधी (तामिळनाडूत श्रीपेरूम्बदूर येथे १९९१ मध्ये आत्मघाती स्फोटात हत्या) सिंहली नेते व श्रीलंकेचे अध्यक्ष प्रेमदास, रंजन विजेरत्ने, दामिनी दिसानायके, तामिळ नेते अप्पापिल्लई अमृतलिंगम, योगेश्वरन व त्यांची पत्नी, परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरगमार, उमा माहेश्वरन, सिरी साबरथिनम.