Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

वीजकपात टळणार ?
अतिरिक्त विजेची हमी; दर मात्र वाढण्याची शक्यता
पुणे, १८ मे/ प्रतिनिधी
पुणे व पिपरी-चिंचवड शहराला अखंड वीजपुरवठय़ासाठी खासगी क्षेत्रातून अतिरिक्त वीज खरेदीच्या निविदा मागविताना यंदा ‘महावितरण’ने संबंधितांना ठरलेली वीज पुरवविण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे शहराला अखंड विजेची हमी मिळण्याची चिन्हे असले, तरी देशातील वाढते वीजदर लक्षात घेता या अतिरिक्त विजेसाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे.

तेंडुलकरांच्या अखेरच्या दिवसांतील लिखाणाचे आज प्रकाशन
उलगडणार पुण्यातील १९४० नंतरचे समाजजीवन
पुणे, १८ मे/विशेष प्रतिनिधी
गांधीहत्या झाली तेव्हा पुण्यात घरे कशी पेटली होती.., स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात केलेल्या व्याख्यानातील अंगारशब्द कसे फुलत होते..,राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते कम्युनिस्टांपर्यंतच्या चळवळींकडे तरुण कसे ओढले जात होते.., वास्तववादी, रसरशीत जीवनानुभव मांडणाऱ्या दिग्गज साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी अखेरच्या दिवसात लिखाण केले होते ते त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळातील. या लेखनातून पुण्यातील १९४० नंतरचे समाजजीवन उलगडत जाते, ते ‘तें’च्या दृष्टिकोनातून.

‘नायजेरियन फ्रॉड’च्या घटनांमध्ये वाढ; तपासात अपयश
पुणे, १८ मे/प्रतिनिधी
लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून ईमेलद्वारे नागरिकांची फसवणूक होणाऱ्या ‘नायजेरियन फ्रॉड’च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. एकीकडे फसवणूक करणाऱ्या भामटय़ांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे, तर दुसरीकडे ‘नायजेरियन फ्रॉड’ विषयीची माहितीसुद्धा पोलिसांकडे स्वतंत्रपणे संकलित करण्यात आलेली नाही.

‘कसब्या’तील पीछेहाट भाजपाच्या जिव्हारी
पुणे, १८ मे/प्रतिनिधी

‘कसबा’ या भाजपा-सेना युतीच्या अभेद्य किल्ल्यात अनिल शिरोळे यांना अवघी आठ हजार मतांची आघाडी मिळाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. त्या नाराजीतूनच ‘ही आघाडी नसून पीछेहाट आहे,’ अशीही प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. ‘कसब्या’च्या बालेकिल्ल्यात भाजपाला किमान २० ते कमाल २५ हजार मतांची आघाडी अपेक्षित होती. तेवढी आघाडी मिळणार, असा विश्वासही कार्यकर्ते सातत्याने व्यक्त करत होते.

‘स्थायी समितीला २०० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचा अधिकार आहे का?’
विरोधी पक्षनेते म्हणतात, ‘कायद्याचे बोला’!
पिंपरी, १८ मे / प्रतिनिधी
स्थायी समितीला २०० कोटी रुपये मंजूर करण्याचा अधिकारच नाही, असा कायद्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी उपस्थित केला आहे. पालिका आयुक्तांनी ठेवलेला मूळ १०० कोटी रुपये कर्जाचा तसेच त्यास १०० कोटी रुपयांची उपसूचना देण्याचा प्रस्तावच चुकीचा असल्याचे बारणे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीपासून दूर राहण्याचा आठवले समर्थकांचा निर्णय
शिर्डीतील पराभवाच्या निषेधार्थ पिंपरीत निदर्शने
पिंपरी, १८ मे / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा पराभव हा जातीयवादाच्या भावनेतून करण्यात आला आहे, असा आरोप करीत आठवले समर्थकांनी िपपरीत आज निदर्शने केली. त्याचप्रमाणे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर राहण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.

तालेरा रुग्णालयाच्या विस्तारीकरणास अखेर मुहूर्त
‘स्थायी’च्या बैठकीत साडेचार कोटींचा प्रस्ताव
पिंपरी, १८ मे / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी अखेर एकदाचा मुहूर्त सापडला असून त्यासाठी जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या उद्या (मंगळवार) होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

हिमोफिलीया - राजवंशीय आनुवंशिकता
मोफिलीया ही एक आनुवंशिक जनुकीय व्याधी असून ज्यामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया (रक्तक्लथन) होण्याच्या क्षमतेला बाधा असते. आपल्या रक्तद्रावात फायब्रिनोजेन नावाचे ग्लोब्युलिन (प्रथिन) असते. त्याच्यावर होणाऱ्या कॅल्शिअम आयनांच्या उत्प्रेरण कार्यामुळे त्याचे फायब्रिनात रूपांतर होते. फायब्रिन हे तंतूमय असते. अशा प्रकारे फायब्रिनची निर्मिती म्हणजे रक्तक्लथन प्रक्रियेची पूर्णता होय. या रक्तक्लथनासाठी आवश्यक असे निरनिराळ्या प्रकारचे रक्तक्लथनकारक (clotting factors) आपल्या शरीरात असतात.

आजार शोधणारे भ्रमणध्वनी
बरेचदा आपल्यावर बिकट प्रसंग ओढवले. जिथं कुठलीही वैद्यकीय मदत मिळणं सहज शक्य नाही, अशा ठिकाणी आपण किंवा आपल्याबरोबरचं कुणीतरी आजारी पडतं. नेहेमीच्या गोळ्यांनी ताप कमी होत नाही. आजाराची लक्षणंही नेहेमीच तापाची नसतात. अशा प्रसंगी आपण गडबडून जातो. कुणाचीही अशी गडबड होऊ नये म्हणून डॅनिअल फ्लेचर या अभियंत्याने भ्रमणध्वनीचा वापर करून आजाराचा पत्ता लावायचं एक तंत्र शोधून काढलंय. त्याच्या भ्रमणध्वनीतच त्यानं थोडी सुधारणा केली. त्याला एक परिदर्शकासारखी जोडणी बसवली.

अलेझांड्रो व्होल्टाची कथा
कहाणी बिनतारी संदेशवहनाची -११

गॅलव्हिनीच्या बेडकांशी संबंधित विजेच्या प्रयोगांना थोतांड मानणाऱ्या अलेझांड्रो व्होल्टाचा जन्म १७४५ साली कोमो इथं झाला. त्याला लहानपणी पाद्रयांनी शिकवलं. तो इतका हुशार होता की पुढे जाऊन त्यानंही पाद्रीच बनावं यासाठी त्याच्या शिक्षकांनी चक्क त्याला चॉकलेट्स वगैरेंची ‘लाच’ द्यायचा अयशस्वी प्रयत्न करून बघितला. पण त्याच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी त्याची शाळाच बदलून टाकली! शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला विजेशी संबंधित गोष्टीविषयी अभ्यास करावासा वाटला.

डोळ्यांवर उपचारांसाठी मूलपेशींचा वापर
डो ळे ही निसर्गाने दिलेली फार मोठी देणगी आहे. आज जगात असंख्य लोक असे आहेत, की जे हे सुंदर जग त्यांच्या डोळय़ांनी पाहू शकत नाहीत. त्यातील काहींना जन्मानेच तर काहींना अपघातामुळे अंधत्व आलेले आहे. अशा लोकांपैकी काहींना नेत्रदानामुळे दृष्टी लाभू शकते व त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण होऊ शकतो. यात आता मूलपेशी संशोधनामुळे मोठय़ा प्रमाणात बदल घडून येण्याची शक्यता आहे. अलीकडेच नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मूलपेशींचा वापर करून काही लोकांना दृष्टी प्राप्त करून देण्यात आली. आतापर्यंत तरी अशा रुग्णांना दात्यांच्या डोळय़ांतील कॉर्निआचा वापर करून दृष्टी मिळवून दिली जात होती.

उपकेंद्रातील बिघाडामुळे कोथरूडमध्ये वीज खंडित
पुणे, १८ मे/ प्रतिनिधी

महापारेषण कंपनीच्या फुरसुंगी येथील अतिउच्चदाब विद्युत उपकेंद्रामध्ये बिघाड झाल्याने कोथरूड भागातील वीजपुरवठा आज सकाळपासून विस्कळीत झाला होता. त्याचप्रमाणे सहकारनगर भागात वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्याने या भागातील वीजपुरवठा पहाटे तीन ते सकाळी दहा या वेळेत बंद होता. फुरसुंगी वीजउपकेंद्रातील बिघाडामुळे डहाणूकर कॉलनीमधील वीजपुरवठय़ावर प्रामुख्याने परिणाम झाला. सकाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, वीजवाहिन्या अतिरिक्त भार सहन करू न शकल्याने चक्राकार पद्धतीने वीजकपात करण्यात आली. त्यामुळे डेक्कन जिमखाना, कर्वेनगर, सहकारनगर, गांधी भवन, सुंदरनगरी, बावधान, मुळशी आदी भागातील वीजपुरवठय़ावर परिणाम झाला. पर्वती विभागातील सहकारनगर भागामध्ये वीजवाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्याने या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

चिंचवडमध्ये बसवर दगडफेक
पिंपरी, १८ मे / प्रतिनिधी

चिंचवड गावडे कॉलनी येथे मनपा-चिंचवडगाव बसवर आज दुपारी चौघा तरुणांनी अचानक दगडफेक केली. दगडफेकीमागील कारण समजू शकलेले नसून पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर प्रल्हाद शिंदे (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे तक्रारदार बस चालकाचे नाव आहे. शिंदे हे आपले सहकारी वाहक निमगुडे यांच्यासह मनपा-चिंचवड गाव बसवर काम करीत होते. बस चिंचवडच्या गावडे कॉलनी येथे आली असता पाठीमागून अॅक्टिव्हा गाडीवरून आलेल्या चौघांनी अचानक दगडफेक केली. या दगडफेकीत बसचे सतराशे रुपयांचे नुकसान झाले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

‘नित्यप्रेरणा’ पुस्तकाला ‘चेतना पुरस्कार’
पुणे, १८ मे/प्रतिनिधी
अनंत सुर्वे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार डॉ. प्रकाश तुपे लिखित ‘रहस्ये अंतराळातील’ या पुस्तकाला तर विश्वनाथ नरवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘चेतना पुरस्कार’ भारतीय विचार साधना प्रकाशनच्या ‘नित्यप्रेरणा’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. येत्या २८ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष मुकुंद अनगळ यांनी आज ही माहिती दिली. ग्रंथालयाच्या ‘केशव’ सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) द. बा. शेकटकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

उपेक्षित मुलांसाठी ‘संतुलन’तर्फे शिबिर
पुणे, १८ मे/प्रतिनिधी
संतुलन संस्थेतर्फे दगडखाण क्षेत्रातील शिक्षणापासून व सर्व सोयीसुविधांपासून उपेक्षित मुलांसाठी शिबिर शाळेचे आयोजन १५ ते १८ मे दरम्यान करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन लक्ष्मीबाई कुऱ्हाडे यांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आले. या शिबिरात सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास हा केंद्रबिंदू ठेवून मैदानी खेळांमध्ये झांज, लेझीम, योगासने. कौशल्यामध्ये अभिनय, नेतृत्व, कागदाची करामत, टाकावूपासून टिकाऊ वस्तू बनविणे, चर्चासत्रामध्ये लिंग समभाव, आरोग्य व सुरक्षा, व्यक्तिमत्वाची जडणघडण, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मृदुला जोशी, निरंजन जोशी, अ‍ॅड. बस्तू रेगे, डॉ. संतोष शित्रे, अ‍ॅड. पल्लवी रेगे आदींनी शिबिरात मार्गदर्शन केले. या शिबिरात पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्य़ातील दगडखाणीतून सुमारे शंभर मुले-मुली सहभागी झाली.

‘होप क्लिनिक ’ मध्ये आज मोफत रक्तदाब तपासणी शिबिर
पुणे, १८ मे / प्रतिनिधी

जागतिक उच्चरक्तदाब नियंत्रण दिनानिमित्त भवानी पेठेतील होप क्लिनिक येथे १९ मे रोजी मोफत रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉ. अमोल देवळे या शिबिरात रुग्णांची तपासणी करणार आहेत. ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, उच्च रक्तदाबामुळे अनेक आजार उद्भवतात. रक्तदाब नियंत्रित ठेवल्यास हृदयरोग आणि मधुमेहासारखे आजार नियंत्रित ठेवता येतात.

राज्य शासनाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टीतर्फे धरणे
पुणे, १८ मे/ प्रतिनिधी

दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यास राज्य शासन पूर्णत: अयशस्वी ठरले असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात आज धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पंढरीनाथ आवाड व पुणे शहर अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी दलित अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे उपजिल्हाधिकारी कदम यांना देण्यात आले. या प्रसंगी रवींद्र गायकवाड, रामदास तोटे, बाळासाहेब जगताप, मल्लिक कोतले, विठ्ठल सकट, राजू पारिख उपस्थित होते.

दंत उपचारपध्दतीतील अत्याधुनिक सुविधा
पुणे, १८ मे/ प्रतिनिधी

‘हिरडय़ांच्या विकारावरील विविध उपचार, दंतारोपण व अन्य दंतशस्त्रक्रिया लेसरच्या साहाय्याने वेदनाविरहित पद्धतीने करता येणार आहे. हे तंत्रज्ञान डेन्टारिया डेन्टल स्पेशालिटी सेंटरने उपलब्ध केले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. परेश गांधी यांनी दिली.डॉ. गांधी यांच्या दंत वैद्यकीय सेंटरला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बाजीराव रस्ता येथील त्यांच्या सेंटरमध्ये लेसर मशिन व डेन्टल एम्प्लॅन्ट मशिन बसवण्यात आले आहे. याचे उद्घाटन डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते करण्यात आले.

तरुणाची आत्महत्या
पिंपरी, १८ मे / प्रतिनिधी
मोरवाडी पिंपरी येथील लालटोपीनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तरुणाने बायको नांदत नसल्याच्या कारणाने आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घरामध्ये गळफास लाऊन आत्महत्या केली. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पांडुरंग ओव्हाळ (वय २५, रा. लालटोपीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मागे एक मुलगी, एक मुलगा, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. त्याची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून चिंचवड आनंदनगर झोपडपट्टी येथे माहेरी गेली होती. ती सासरी नांदण्यासाठी परतत नव्हती. आज सकाळी तो तिच्याकडे गेला. मात्र, तिने सासरी येण्याच्या मुद्दय़ास प्रतिसाद दिला नाही. याचा राग मनात धरून रमेशने आज दुपारी घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या या कृत्यास कोणासही जबाबदार धरू नये’ असे नमूद केले आहे. अधिक तपास संत तुकारामनगर पोलीस चौकीचे फौजदार बाळकृष्ण नलावडे करीत आहेत.

इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू
पिंपरी, १८ मे / प्रतिनिधी

हिंजवडी येथील एका इमारतीवरून पडल्याने आज सकाळी एका इसमाचा मृत्यू झाला. सुनील बबनराव हुलावळे (वय ४०, रा. मुद्रा हॉटेलशेजारी, हिंजवडी) असे इमारतीवरून पडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. इमारतीच्या टेरेसवर झोपण्यासाठी सुनील गेले होते. ते सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या एका बाजूला बाल्कनी खाली बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यांचे बंधू अरुण हुलावळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सुनील यांना तातडीने थेरगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा आठ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार एस. एम. पवार करीत आहेत.

इमारत कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
शिरूर, १८ मे/वार्ताहर
शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावरील इंदिरा गांधी पुतळ्यासमोर असलेली इमारत पाया खचल्याने कोसळली. कोसळलेल्या इमारतीचा काही भाग पुणे-नगर रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे-नगर रस्त्यावर चंदनमल साखला यांची दुमजली इमारत आहे. इमारतीच्या खालच्या भागात ऐश्वर्या साडी सेंटर हे दुकान आहे. या इमारतीच्या शेजारील इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास या इमारतीचा पाया खचत असल्याचे निदर्शनास आले. याच दरम्यान इमारत कोसळली. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. इमारत खचत असल्याचे लक्षात येताच इमारतीतील लोकांनी बाहेर धाव घेतली. इमारत खचल्याने या ठिकाणी असणाऱ्या ऐश्वर्या साडी सेंटरचे फर्निचर व दुकानातील कपडय़ांचे मोठे नुकसान झाले. इमारत कोसळत असल्याचे वृत्त समजताच या परिसरात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.

स्टेट बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध आंदोलनाचा इशारा
पाटस, १८ मे / वार्ताहर
दौंड येथील स्टेट बँकेतील कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागतात. वारंवार लक्ष वेधूनही सुधारणा होत नसल्याने, लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व दौंड र्मचटचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिला आहे. स्टेट बँकेचे कर्मचारी ज्येष्ठ नागरिक, निवृत्ती वेतन घेणारे नागरिक, शासकीय धान्याची चलने भरणा करण्यासाठी येणारे स्वस्त धान्य दुकानदार, व्यापारी, ग्राहक यांना अत्यंत अवमानकारक अशी वागणूक देत असतात. बँकेत नवीन खाते उघडण्यास टाळाटाळ केली जाते. नेट बँकिंग सुविधा अन्य बँकेत नसल्याने व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव स्टेट बँकेत व्यवहार करावे लागतात. मात्र नाहक त्रास दिला जातो. शहरामध्ये बँकेने एटीएम सुविधा करावी अशी सतत मागणी असूनही टाळाटाळ केली जाते. अशा बँकेबद्दलच्या ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत.

आढळराव यांचे राजगुरुनगरमध्ये जोरदार स्वागत
वाडा, १८ मे / वार्ताहर
एकच वादा. शिवाजी दादा. जय भवानी जय शिवाजी - अशा घोषणा देत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खेड तालुक्यातील जनतेने जोरदार स्वागत केले. खेड तालुक्याने पुन्हा एकदा आढळराव पाटील यांना डोक्यावर घेतले असून, सत्ताधाऱ्यांना विचार करण्यास भाग पाडले. आढळरावांच्या विजयातील खेड तालुक्यातील तरुणाईने व शेतकरी बैलगाडा मालकांनी सर्वत्र जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. सध्या लग्नसराई असल्याने खासदार आढळराव पाटील यांची विजयाबाबत लग्न मंडपातूनही चर्चा रंगत आहेत. ‘आढळरावांनी तर सत्ताधाऱ्यांची आता पाचावर धारण बसवली अशा गप्पांना उत आला आहे. राजगुरुनगर येथे खासदार आढळराव पाटील यांचे शहरातील आणि तालुक्यातील जनतेने नागरिकांनी जंगी स्वागत केले.

डॉ. बुरांडे, गोळे यांना पुरस्कार
भोर, १८ मे / वार्ताहर
येथील अंधश्रद्धा निर्मूलन शाखेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे व ज्येष्ठ सभासद वसंतराव गोळे यांचा राज्य शाखेच्या वतीने पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.डॉ. बुरांडे हे समितीच्या कामात गेली १२ वर्षे कार्यरत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन दिवाळी अंकासाठी बुरांडे यांनी विशेष कार्य केले असून २००७ मधील निधी संकलनामध्ये १८० शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. वार्तापत्राच्या कामाबद्दल ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र साथी’ हा पुरस्कार त्यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव, अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, संपादक प्रा प. रा. आर्डे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. गोळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे १०० वर्गणीदार केल्याबद्दल जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते ‘शतकवीर’ हा पुरस्कार देण्यात आला.

आणे येथील विवाहिता बेपत्ता
नारायणगाव, १८ मे / वार्ताहर

आणे येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. नंदा भारत भुसेवाड (वय २६) रा. आणे असे तिचे नाव आहे. नंदा हिची उंची १६२ सेंमी असून रंगाने गोरी, कुरुळे केस, सडपातळ बांधा, गळय़ात सोन्याचे मंगळसूत्र, काळपट रंगाची चमकीची साडी व अंगात काळय़ा रंगाचे ब्लाऊज असा पेहराव असून या विवाहितेसंदर्भात काही माहिती मिळाल्यास नारायणगाव पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२१३२/२४२०३३ वर संपर्क साधावा.