Leading International Marathi News Daily

मंगळवार, १९ मे २००९

राज्य


मुरुडच्या किनाऱ्यावर संध्याकाळी ढग भरुन येत आहेत. जोरदार वाऱ्याने नारळाची झाडेही झुकत आहेत. यावर्षी पाऊस लवकर पडेल याची लक्षणे दिसत आहेत. (छाया: सुधीर नाझरे)

पुरेशा निधीअभावी महाड तालुक्यातील धरणे तहानलेली!
महाड, १८ मे/वार्ताहर

कोकणामध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक असले, तरी पडलेले पाणी साठवून त्याचा योग्य वापर करण्यासाठी पाणी साठविण्याची व्यवस्था नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणे अशक्य आहे. महाड तालुक्यातील नागेश्वरी धरण, सवाद- धारवली धरणाची कामे केवळ निधी नसल्याने बंद आहेत. या धरणांची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर आज तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता, परंतु तालुक्यातील समस्या सोडविण्यापेक्षा सत्तेकडे अधिक लक्ष देणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटत नाही आहे.

माथेरानसाठी कर्जत आगाराला दोन नव्या मिनी बसेस उपलब्ध
कर्जत, १८ मे/वार्ताहर
कर्जत ते माथेरानदरम्यान सुरू करण्यात आलेल्या बस वाहतुकीकरिता एस.टी. महामंडळातर्फे कर्जत एस.टी. आगाराला दोन नवीन मिनी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या बसेसमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे या घाटमार्गावर त्यांच्या ऐवजी नव्या मिनी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, ही प्रवाशांची मागणी अखेर महामंडळाने पूर्ण केली आहे. मुळातच गेल्या अनेक दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कर्जत तसेच नेरळपासून थेट माथेरानमधील दस्तुरी नाक्यापर्यंतच्या मिनी बस वाहतूक सेवेला गतवर्षी ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्यात आल्यामुळे माथेरानकरांनी आपल्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांची अखेर पूर्तता झाली होती.

सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नीलेश राणेंचे वर्चस्व
रत्नागिरी, १८ मे/खास प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी भाजप-सेना युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांच्यावर आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये प्रमुख उमेदवारांना पडलेली मते सोबत देत आहोत. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त राजापूर मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार सुरेश प्रभू जेमतेम सुमारे ६०० मतांची आघाडी मिळवू शकले आणि त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित झाला. त्याचप्रमाणे कुडाळ व कणकवली मतदारसंघांनी राणे यांना निर्णायक आघाडी मिळवून दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दप्तरनोंदीत त्रुटी आढळल्याने तलाठी निलंबित
पुणे, १८ मे / खास प्रतिनिधी

दप्तरनोंदीमध्ये गंभीर त्रुटी, नोंद मंजूर नसताना सातबारा उताऱ्यावर पक्क्य़ा नोंदी आणि नोटीस बजावण्यात दिरंगाई करणाऱ्या लोणीकंदच्या तलाठय़ावर हवेलीच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी संबंधित तलाठय़ाची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
एच. बी. चाटे असे निलंबित करण्यात आलेल्या तलाठय़ाचे नाव आहे. विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी हवेली तालुक्यातील लोणीकंदच्या तलाठी कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली. या तपासणीमध्ये तलाठय़ाने दप्तरनोंदीमध्ये गंभीर त्रुटी केल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यात प्रामुख्याने नोंद मंजूर नसताना सातबारा उताऱ्यावर नोंद करणे, फेरफार नोटीसवर स्वाक्षऱ्या नसणे, नोंदी प्रलंबित ठेवणे, नोटीस न बजावणे अशा त्रुटी आढळून आल्या. या प्रकाराची दखल घेऊन बंड यांनी संबंधित तलाठय़ाला निलंबित करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. कटारे यांना दिले. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. तसेच चाटे याची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही दिले.

महादेव थोरात यांचे निधन
नगर, १८ मे/प्रतिनिधी

दुसऱ्या महायुद्धातील सेवानिवृत्त सैनिक महादेव लक्ष्मण थोरात यांचे आज येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. लष्करातील निवृत्तीनंतर त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागात दीर्घ काळ नोकरी केली. प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले. थोरात यांच्यामागे पुण्यातील चिंतन ग्रुपचे प्रमुख अभिनंदन, तसेच खो-खो पटू व महाराष्ट्राचा माजी कर्णधार निर्मल, सामाजिक कार्यकर्ते स्वागत व अशोक हे चार पुत्र व सुना, नातवंडे आहेत. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.